सनसनाटीपणाची "कूकरणी"

पंधरा दिवसापासून उपाशी असलेल्या महिलेने पेटवून घेतले. पोटाला अन्न मिळेना म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी सनसनाटी बातमी 'उघडा डोळे बघा नीट 'वर झळकली आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. कारण बातमीच तशी होती. रिपोर्टर नेहमीचाच कलाकार होता. हातभर लाकडाची वावभर धपली काढण्यात हा पटाईत कलाकार. म्हणून आम्ही पामरांनी थोडी माहिती घेतली. जे सत्य समोर आले त्यातून सनसनाटी निर्माण करण्यासाठी या पठ्ठ्याने लबाडी करून "कुकरणी" केल्याचे उघड झाले.
मुद्दा असा की त्या पीडित कुटुंबाने 19 तारखेला जर 18 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ नेला होता. तर 29 तारखेला आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला 15 दिवसांपासून उपाशी कशी? हा साधा प्रश्न कोणालाही पडेल. सध्या 2-3 रुपये किलोनं धान्य मिळते आहे. या महाशयांना हे सगळे माहीतही आहे. तरीही वेगळ्या घटनेला भूकेची फोडणी दिली. आली लहर आणि अतिशयोक्तीचा कहर केला. कारण कर्जबारीपणातून झालेली आत्महत्या याला बातमी वाटेना. काहीतरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी, स्वत:ला चमकून घेण्यासाठी याने सालाबादप्रमाणे भूकेचे मार्केटिंग केले. बातमीचा पोलिसांनी तपास केला. तपासात वेगळ्याच गोष्टी समोर आल्या. महसूलच्या चौकशीतही बातमी खोटी ठरली. साहजिकच "कुकरणी" उघडी पडली. हा साफ तोंडावर आपटला. उरली सुरली झाकायला याने पोलिस, अधिकारी, मंञी इतर पञकार सगळ्यांनाच खोटे ठरवले. सगळे खोटे, मीच खरा म्हणत 'गिरे तो भी टांग ऊपर' केली.
हा सगळ्यांची लाज काढण्यात पटाईत. पण याने सनसनाटीसाठी नौटंकी केल्याने पञकारितेलाच लाज आणली. याच्या बातम्या मुंबईत बसलेले तपासत नाहीत बहुदा. पञकारितेच्या मुल्यांशी बांधिलकी असणाऱ्या 'करां'च्या नाकाखाली याची खोटीनाटी "खिचडी" शिजतेच कशी? याचं गूढ आहे. लोकांना टीव्हीवरून नैतिकतेचे धडे देणारा हा पठ्ठ्या मराठवाड्यातल्या पोरांच्या पीटीसी घरात बसून मारतो. हा पीटीसी घोटाळा करांना माहीत नाही का? अशा सनसनाटी बातम्या देऊन 'उघडा डोळे बघा नीट च्या विश्वासार्हतेला आणि पञकारितेच्या मुल्यांना पायदळी तुडवून वर लोकांनाच अक्कल शिकवण्याचा शहाजोगपणा 'कर' पाहात नाहीत का? हा आम्हा पामरांना पडलेला सवाल आहे.


जाता - जाता :

त्या' महिलेने मृत्यूपुर्व जबाब दिला आहे की,स्टोव्हचा भडका उडून मी भाजले आहे.. आता बोला ? ' उघडा डोळे,बघा नीट'...

पीडित कुटुंबाने 19 तारखेला जर 18 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ नेला होता. तर 29 तारखेला आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला 15 दिवसांपासून उपाशी कशी?