राज गायकवाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी,बीदर जेलमध्ये रवानगी

बीदर - शेळी पालन व्यवसायाच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांनी फसवणूक करणा-या जागृती अ‍ॅग्रो फुडस्चा मालक राज गायकवाड ( सांगली) यास बीदर न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली,त्यानंतर राज गायकवाड यांची बीदर न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे.
शेळी पालन व्यवसायामधून पैसे दामदुपट करतो,असे आमिष दाखवून जागृती अ‍ॅग्रो फुडस् कंपनीच्या माध्यमातून सांगलीच्या राज गायकवाड यांनी महाराष्ट्र,कर्नाटकसह अनेक राज्यातील गुंतवणूकदारांकडून पाच हजार ते १० लाख रूपये वसूल केले आहेत.परंतु जेव्हा पैसे दुप्पट देण्याची वेळ आली,तेव्हा त्यांनी टोलवा टोलवीची उत्तरे सुरू केली होती.
या प्रकरणी बीदर जिल्ह्यातील औराद तालुक्यातील संतपूरच्या १० ते १२ गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर,बीदरच्या पोलीसांनी गायकवाड यांस परवा रात्री सांगलीतून उचलून नेले होते.त्याच्याविरूध्द भादंवि ४२० आणि ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
त्यानंतर आज बीदर कोर्टात राज गायकवाड यास हजर करण्यात आले असता,त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.त्यानंतर राज गायकवाड यांची बीदरच्या जेलमध्ये रितसर रवानगी करण्यात आली आहे.
राज गायकवाड यांनी आपले काळे धंदे लपवण्यासाठी जानेवारी २०१५ मध्ये नवजागृती न्यूज चॅनल काढले होते.परंतु अवघ्या सहा महिन्यांतच त्यांनी गाशा गुंडाळला होता.ऐवढेच काय त्यांनी कर्मचा-यांचा तीन महिन्यांचा पगार बुडवला.या प्रकरणी कर्मचा-यांनी पुण्यातील येरवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.उद्या बुधवारी कर्मचा-यांचे पेमेंट न दिल्यास राज गायकवाड,त्यांची पत्नी जाई गायकवाड,भाऊ भास्कर गायकवाड,संचालक सलिम खंडायत,अकाऊंट माणिक शिंदे आणि एच.आर.दीपाली सरवदे यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
कर्नाटक पोलीसांनी राज गायकवाड यांच्याविरोधात फास आवळला असताना,महाराष्ट्राचे पोलीस काय झोपा काढतात का,याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.सांगलीच्या पोलीसांना राज गायकवाड हप्ते देत असल्याची चर्चाही सध्या सुरू आहे.
राज गायकवाड यांनी जागृती चॅनल बंद पडल्यानंतर काही चॅनलला जाहिराती देवून त्यांचे तोंड बंद केले होते.मात्र केवळ बेरक्याने याचा पाठपुरावा केलेला आहे.राज गायकवाड यांच्या अटकेनंतरही महाराष्ट्रातील वृत्तपत्रे आणि चॅनल मूग गिळून गप्प आहेत,याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


बेरक्याच्या दणक्यानंतर पुढारीने आज राज गायकवाड यांच्या अटकेचे वृत्त प्रकाशित केले...