जळगावमधील वृत्तपत्रांचा नवा आदर्श...

 "देशदूत"च्या वर्धापनदिन पश्चातसंध्येला आयोजित परिसंवादात सर्व संपादक करणार एकाच व्यासपीठावर विचारमंथन!

आज 24, डिसेंबर -  "देशदूत"च्या जळगाव आवृत्तीचा वर्धापनदिन. उद्या, 25 डिसेंबर, नाताळ! अनेक राजकारणी, अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक जोडून सलग सुटीमुळे बहेरगावी असणार. कार्पोरेटसपासून सर्वत्र डिसेंबर लास्ट वीक कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी निषिद्ध मानला जातो. मात्र, "देशदूत"च्या वर्धापनदिन पश्चातसंध्येला शहर विकासासाठीचा महत्त्वाचा परिसंवाद होत आहे. यानिमित्ताने जळगावमधील वृत्तपत्रे आणि संपादक मिळून महाराष्ट्रातील पत्रकारितेला नवा आदर्श घालून देत आहेत.
एरवी एकमेकांच्या दैनिकात एकमेकांची नावेही छापायला संपादक तयार नसतात. अशा वातावरणात एका प्रतिस्पर्धी दैनिकाच्या वर्धापनदिन पश्चातसंध्येला आयोजित परिसंवादात सर्व संपादक करणार एकाच व्यासपीठावर विचारमंथन करणार, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्याबद्दल देशदूत परिवार, जळगावातील सर्व संपादक आणि परिसंवाद आयोजकांचे हार्दीक अभिनंदन अन या कार्यक्रमाला मनपूर्वक् शुभेच्छा!!
देशदूत वर्धापनदिन आणि त्याच्या पश्चातसंध्येला हा परिसंवाद याची तयारी तशी एकदमच सुरू झाली. महिनाभर आधीच शहरात मोक्याच्या जागी  परिसंवादाचे होर्डिंग्स लागले होते. या परिसंवादाचे आयोजक आहेत, "सकाळ"मधून नुकतेच "देशदूत"मध्ये गेलेले व्यवस्थापक अनिल जोशी यांचे परममित्र सुशील नवाल यांची संस्था मल्टिमीडिया! नवाल हे स्वतः यापूर्वी "देशदूत"चे व्यवस्थापक राहिलेले आहेत. त्यांच्याच संस्थेने यंदा विधानसभा निवडणुकीत जळगांवचे (आजवरचे) सर्वेसर्वा सुरेश जैन यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. जैन यांना "मल्टिमीडिया"च्या सारथ्यात आयुष्यातील सर्वात मोठा, लज्जास्पद आणि मानहानीकारक पराभव पाहावा लागला.
जळगाव शहरावर सर्वाधिक काळ आणि तेही निरंकुश, एकहाती राज्य केले ते याच सुरेश जैन यांनी! मात्र, हे राज्य कसे चालले असावे, हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही. इतकी वर्षे निरंकुश सत्ता उपभोगणारे 3 मार्केटसच्या पलीकडे काहीही करु शकलेले नाहीत. त्या मार्केटसमध्येही कुणी काय न कसा मलिदा लुटला, याच्या सुरस कथा वृत्तपत्रातून येतच असतात. या शहरात ना सर्वसामान्य जनतेसाठी पालिकेने स्वस्तातल्या उत्तम सुविधा उभ्या केल्या ना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नवे उद्योग आणण्यावर भर दिला. नवीन रहिवासी वसाहतीत ना धड अंतर्गत रस्ते आहेत ना धड गटारी!!!
या सर्व पापांचे धनी जे कुणी आहेत, त्यांच्या प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न या परिसंवादातून संपाकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून होऊ नये, हीच अपेक्षा. सध्याच्या राज्यकर्त्यांविरुद्ध काही कारणाने राज्यभरात असंतोष आहे, मात्र जळगाव शहराची वाट लावण्यात त्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. एका तडफदार पालिका आयुक्ताला या शहरात कामच करु दिले गेले नाही. कारण सर्व हफ्तेबाज, दलाल, कमिशनखोर तसेच टेंडरबाज, ठेकेदार याना आयुक्तांनी लगाम घातला. शहराचे वाट्टोळे आणि विकासात अडसर घालणारी "आघाडी" कुणी उघडलीय, ते सारेच जाणून आहेत. बदलत्या वातावरणाचा लाभ घेवून आधीचं पाप भलत्याच कुणाच्या माथी मारण्याचा तसेच शहर लुटून खाल्लेल्या गुन्हेगारांचे उदात्तीकरण किंवा त्यांची प्रतिमानिर्मिती आणि नव्यांची, तसेच प्रशासनाची बदनामी ..... असले काही प्रयत्न होवू नयेत, हीच अपेक्षा.
"इमेज बिल्डिंग" म्हणजेच प्रतिमानिर्मिती हाही एक स्वतंत्र व्यवसाय आहे. पुण्या-मुंबईत अनेक जाहिरात व PR एजन्सीज तसेच काही दलालही अशी कामे "प्रोफेशनल" पद्धतीने करतात. असो. या उत्तम, तळमळीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास पुनश्च शुभेच्छा आणि प्रतिस्पर्धी दैनिकाच्या वर्धापनदिन पश्चातसंध्येला आयोजित परिसंवादात एकत्र येत असलेल्या संपादकांचे पुनश्च अभिनंदन!!! लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेली जळगाव महापालिकेची वेबसाईट व्यवस्थित मेंटेन व अपडेट राहो, तसेच त्यावर पेमेंट ओनलाईन भरण्याची सुविधा लाभो, हीच अपेक्षा. सध्यातरी ही वेबसाईट अतिशय वाईट अवस्थेत आहे.