तथाकथित मंडळींना एक खुले पत्र....

पत्रकारांबद्दल हजारो शंका, कुत्सीत प्रतिक्रिया घेऊन जगणार्‍या तथाकथित मंडळींना एक खुले पत्र....
महोदय,,
पत्रकार, म्हटले की अंगावर झुरळ पडल्यागत कपडे झटकणार्‍यांची जमात आपली. ‘पत्रकार म्हणजे साले एकजात सारे सारखेच’, ‘त्याने निवडणूकीत गब्बर पैसा कमावला असणार’, ’पत्रकार नसते तर फार बरे झाले असते’, ‘किती फीडबॅक घेतात हे पत्रकार? यांना फक्त पैसा पाहिजे’ अशा कितीतरी प्रतिक्रिया पत्रकार म्हटल्यावर उमटतात. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि पुण्यापासून ठाण्यापर्यंत या सार्‍या प्रतिक्रिया सारख्याच. मात्र खरेच पत्रकार असा आहे का? पत्रकार किंवा आजची माध्यमं नसती तर खरेच आपले जीवन आजच्यापेक्षा अधिक सुसह्य झाले असते का? जरा शांतपणे आपल्या मनाला हा प्रश्‍न विचारून बघा, जरा आपली आतली गाठ सैल करून पत्रकारांकडे बघा. आपण त्याच्या तोंडावर त्याला ‘या प्रतापराव’ असे म्हणता आणि त्याच्यामागे त्यालाच शिव्या हसडतात, तेव्हा त्याला त्या कळत नाही असे वाटते का तुम्हाला? अरे ज्याचा प्रांतच इन्व्हेस्टिगेशनचा आहे, त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय आकस आहे हे त्याला कळणार नाही का? तरीही तो शांत असतो. तुमच्याबरोबरची लाख दुष्मनी असू देत तरीही वर्तमानपत्रात तुमच्याबद्दल कौतूकाचे शब्द लिहितांना त्याचा हात कचरत नाही. सांगा मग मनाचा मोठेपणा तुम्ही दाखवता का तो? तुमच्या एका प्रतिक्रियेसाठी तो तुम्हाला १० वेळा फोन करतो हा त्याचा गुन्हा आहे का? आणि या बदल्यात काय देता तुम्ही त्याला पाच-दहा हजारांची एक जाहिरात? त्या जाहिरातीपोटी मिळणार्‍या हजार रुपड्यांच्या कमिशनसाठी तो तुमच्याशी संबंध ठेवतोय असे म्हणायचेय का तुम्हाला? एखाद्या ठिकाणी अपघात झाला, आग लागली, दुर्दैवी घटना घडली तर तो कोणताही विचार न करता असेल त्या अवस्थेत घटनास्थळी पोहोचतो, पोलिसांना इन्फॉर्म करतो, मदत करू लागतो, त्याची बातमी करतो, आवृत्ती थांबवायला लावतो हा त्याचा गुन्हा आहे का? तुमच्या नळाला पाणी येत नाही, शेजारी पाजारी कचरा साचलाय, तेव्हा प्रशासनाला जाग आणन्यासाठी त्याची लेखणी सज्ज होते, हा नेमका कोणता गुन्हा आहे? खरेतर तो तुमच्या बुडाजवळ आग लावतोंना म्हणून त्याचे अस्तित्व तुम्हाला सहन होत नाही. हे सारे करण्यासाठी वर्तमानपत्राकडून काय मिळते हे एकदा विचारा त्याला? आयुष्याचं अर्धशतक पत्रकारीतेत घातल्यानंतर अवघे दोन-पाच हजार मानधन मिळवणारे हजारो पत्रकार आज ग्रामीण महाराष्ट्रात आहे. चौदाशे-पंधराशे मानधनात आजही ग्रामीण महाराष्ट्रातली तरुण पत्रकारांची पिढी काम करते. अनेकांना तर मानधनही मिळत नाही, शहरात राहणारा पूर्णवेळ पत्रकार दहा-पंधरा हजार पगाराच्या वर कमवत नाही, हे वास्तव एकदा जाणून घ्या. मग त्याच्याबाबतीत पैशांच्या गप्पा मारा, त्याच्यावर टीकेची झोड उठवा. डेस्कवर काम करणार्‍या लाखो पत्रकारांच्या नशिबी ती रम्य संध्याकाळ आणि नितांत सुंदर पहाट नसते याचा अंदाज तुम्ही कधी केलाय का? एका सुटीसाठी किती भांडावे लागते, दिवाळीत त्याला एखादी सुटी मिळते तेव्हा कुठे जाते तुम्हा सोफेस्टिकेटेड मंडळींचे शहाणपण, स्वत:च्याच लग्नाला दोन दिवसांची कशीबशी रजा मंजूर होते तेव्हा का नाही वाटत तुम्हाला त्याच्याबद्दल कळकळ. जगण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो ते एकदा त्याला विचारा, बायको-मुलांची हेळसांड या एका शब्दाचा अर्थ तो तुमच्यापेक्षा अधिक जाणतो. वर्तमानपत्र, मिडिया हाऊस यांच्या मुख्य कार्यालयात काम करणार्‍या पत्रकारांना एकदा विचारून बघा त्यांची व्यथा? दररोज डेडलाईनची टांगती तलवार घेऊन काम करतांना मन कधी कठोर झालं हे ते देखील विसरलेले असतात. स्वतंत्र केबीनमध्ये बसणार्‍या संपादकांबद्दल का कोण जाणे मात्र आपल्या मनात प्रचंड आकस घेऊन आपण जगतो. संपादक होण्याचा अर्थ ठाऊक आहे का आपल्याला? चिरीमिरी देऊन तो संपादक झालेला नाही, कोणाच्या तरी चिठ्ठीवरनं त्याला संपादक पदी बसविलेलं नाही, आयुष्याची कितीतरी वर्षे त्यांने लेखनी प्रज्वलीत ठेवली आहे. दिवस-रात्र तो लिहिता राहिला, ज्या वयात आपला अभ्यास संपतो त्या वयात त्यांने पुस्तकांशी मैत्री केली. तळहातावर शीर घेऊन तो भिडला, लढला, रांगडेपणा दाखवत अनेकांना वठणीवर आणले, मला नाही वाटत हा त्यांचा गुन्हा आहे. हो कालौघात संपादकीय केबीनमध्ये व्यवसाय घुसला, टार्गेट्‌स आले. मात्र १० रुपये छपाई खर्च असलेला अंक तुम्हाला दोन रुपयात द्यायचा असेल तर त्यांना ते करणे भाग आहे.
असो, बोलता आम्हालाही येतं, लोकांच्या व्यथा मांडतांना आम्हीही आमची व्यथा तुमच्या डोळ्यात पाणी येऊस्तोवर मांडू शकतो, पण खरे सांगतो ‘कि घेतले न व्रत हे आम्ही अंधतेंने’, ठरवून पत्रकार झालोय, ठरवून आम्ही आमची बांधिलकी निभावतो. हो, आणि महत्वाचं म्हणजे ठरवून आम्ही समाजाच्या भल्यासाठी एखाद्याचा गेमही करतो.
तुम्ही पत्रकारांना पुरस्कार नाही दिले तरी चालतील, हार तुरे देऊन त्यांचे सत्कार नाही केले तरी चालतील, मात्र मनाचा सच्चेपणा दाखवत त्यांचा सन्मान करा, त्यांना प्रतिष्ठा द्या. कारण एक सत्य डोळे आणि कान उघडे ठेऊन ऐका, ज्या समाजात पत्रकाराला सन्मानाची वागणूक मिळते त्याच समाजाला सन्मानाने जगता येते. तो लिहितो म्हणून तुमचे जगणे सुरक्षित आहे, त्याच्या लेखनीवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करू नका, त्याच्यावर हल्ले करून त्याला रोखण्याचा प्रयत्न करू नका, पत्रकारांवर हल्ला करणार्‍यांना पाठीशी घालू नका नाहीतर, समाज म्हणून आपल्या जगण्याची राख-रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही.
 
-तुमचाच एक पत्रकार मित्र