'टिकेकर'वर आताच 'टीका' का ?

प्रविण बर्दापूरकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभार....
Praveen Bardapurkar



टिकेकर , धनंजय कर्णिक आणि मी ....

'लोकसत्ता'चे माजी संपादक डॉ अरुण टिकेकर यांचं काल निधन झालं .
त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम करुनही मी काल काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही
म्हणून अनेकांना आश्चर्य वाटलं
पण , कारण वेगळं होतं - टिकेकर एकाच वेळी विद्वान संपादक आणि
वाईट्ट बॉस म्हणून आम्हा अनेकांच्या वाट्याला आले .
अनेकांना तर त्यांच्या या खुनशी स्वभावामुळे रस्त्यावर यावं लागलं ..
फक्त चांगलं बोलता आलं नसतं म्हणून काल मी गप्प राहिलो .
आज धनंजय कर्णिकने लिहिलेली पोस्ट आणि त्यावरची माझी प्रतिक्रिया सोबत देत आहे ...अर्थात धनंजय कर्णिकच्या म्हणण्याशी मी पूर्णपणे नाही पण बहुतांशाने सहमत आहे
एक दिवस याहीपेक्षा स्पष्टपणे दिनकर रायकर यांच्याबद्दलही लिहावं लागणार आहे .
दुर्दैवाचा भाग म्हणजे माझं 'दिवस असे की...'हे पुस्तक मी ज्या संपादकांना अर्पण केलं
त्यात हे टिकेकर आणि रायकर हे दोघेही आहेत ...
दुरून डोंगर साजरे असतात , हेच खरं !

Dhananjay Vinayak Karnik
4 hrs · Mumbai ·
गळे काढून झाले. उदोउदो करून झाला. डोळ्यात पाणी येत नसले तरी बळेबळे अश्रूही ढाळून झाले. त्यांनी पाडलेल्या पुस्तकांना अचानक साहित्यमूल्य प्राप्त करून देणारे लेखही लिहून झाले. परंतु जे लिहिले गेले नाही, बोलले गेले नाही ते म्हणजे तो एक अत्यंत हीन प्रवृत्तीचा, शिवाय चारित्र्यहीन माणूस होता. प्रथेनुसार मेलेल्या माणसाबद्दल वाईट लिहिता येत नाही. तो एक संकेत आहे. परंतु ज्या माणसाने पत्रकारितेतील अनेक संकेत पायदळी तुडवले,अनेकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला त्याच्याबद्दल हा संकेत पाळण्यात औचित्य नाही. दिलेल्या बातमीचा सोर्स विचारून रिपोर्टरने ते सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांना तुम्ही ही बातमी कशी दिलीत असे विचारण्याचा थोर मूर्खपणा अंगी असणारा अरूण टिकेकर याच्यासारख्या संपादक पदासाठी लायक नसलेल्या माणसाबरोबर मी सात वर्षे काम केले. शेवटी संयमाच्या मर्यादा संपल्यामुळे मी राजीनामा दिला. त्याला माझ्याबद्दल वाईटसाइट बोलता आले नाही कारण माझ्या अंगावर लोकसत्तात काम करताना चिखलाचा एक शिंतोडाही मी उडू दिलेला नव्हता. परंतु कार्यालयात काम करणाऱ्या कारकून मुलीकडेही वाईट नजरेने पाहणाऱ्या या गलिच्छ माणसाच्या तावडीतून इतर कोणी सुटणे शक्यच नव्हते. त्यांनी आपल्या कार्यकाळात निरलसपणे किंवा मनात कोणताही हेतू न ठेवता एकही काम केले नाही. मी एका विद्वान माणसाच्या विरोधात बातम्या देत असे. त्या प्रशासकीय स्वरुपाच्या असत. मला त्या द्यायला टिकेकराने हरकत घेतली. मी विरुध्द बातम्या देणे बंद केले. त्या विद्वान माणसाचा विरोधक हा दलित होता. त्या विद्वान माणसाच्या विद्वत्तेबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. परंतु प्रकरण संपल्यानंतर टिकेकराने त्या विद्वान माणसाला त्यांचे पुस्तक आपल्याला अर्पण करण्यास सांगितले हे मला कळल्यानंतर टिकेकराच्या दळभद्रीपणाचा राग येण्याऐवजी मला किळस आली.
त्यांनी ज्या प्रकारे तानाजी कोलतेची ससेहोलपट केली, नागेश केसरीला, अरुण खोरेला किंवा मोरेंसह इतर अनेकांना अगतिक व्हायला भाग पाडले हे कुणीही लिहिणार नाही. गंमत अशी की प्रकाश कुळकर्णीसारख्या कष्ट करणाऱ्या संपादकाला त्यांनी ज्या प्रकारे हीन पातळीवर नेऊन लोकसत्तातून बाहेर पडायला भाग पाडले तेच त्यांच्या प्रेतावर अश्रु ढाळायला गेले. चार लोकांत दाखवण्यासाठी हे सारे करीत रहातात काही लोक. सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देण्याचे तंत्र टिकेकराने एवढे विकसित केलेले होते की पत्रकारितेत करियर करण्याच्या हेतूने कष्ट करणाऱ्या एखाद्याला ते जेव्हा, काय रे, नागपूरला जायचे आहे का- असे विचारत तेव्हा तो बापडा भांबावून जात असे. बदलीचे शस्त्र वापरून अनेकांचे कणे मोडायचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. ते मेल्यामुळे अनेकांना दुःखही वाटले नाही, नसेल. सहसा कुणाच्या बाबतीत असे होत नाही. त्यांच्या कुटुंबियांना दुःख झाले असेल. परंतु त्यांच्या जवळ किंवा बरोबर काम करणारे अनेकजण आपल्याला हळहळ वाटली असे खोटे खोटेच दाखवत होते हे निश्चित.
लिहिण्यासारखे बरेच आहे. सध्या एवढेच.

Dhananjay Vinayak Karnik यांच्या या पोस्टवर माझी प्रतिक्रिया- धनंजय , बरोब्बर लिहिलंयस तू . एकिकडे प्रयोगशील , विद्वान संपादक मात्र दुसरीकडे खुज्या उंचीचा आणि किरट्या वृत्तीचा असं त्यांचं दुहेरी-दुभंग व्यक्तिमत्व होतं...स्तुतीप्रियता ही देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणखी बाजू होती आणि ती तशी स्तुती करणारांना त्यांनी कायम उत्तेजन दिलं . ते स्वत:ला स्पष्टवक्ता म्हणवून घेत पण, समोरच्याचा स्पष्टवक्तेपणा पूर्णपणे अमान्य असाणारा हा बॉस होता . त्यांच्या दुसऱ्या दुखऱ्या व्यक्तिमत्वाचे अनेक बळी आहेत हेही खरं आहेच . अरुण खोरेचा तू उल्लेख केलास म्हणून; त्याची कशी फरपट केली टिकेकरांनी आणि अखेर त्याला मी माझ्या मनोरातील रुममध्ये कसा राहण्यासाठी घेऊन गेलो हे तुला तर चांगलंंच ठाऊक आहे! संपादक म्हणून मला अनुभवायला मिळालेले माधव गडकरी , कुमार केतकर , सुरेश द्वादशीवार आणि अरुण टिकेकर ही मी लिहिलेली या चार संपादकांची वर्किंग पोर्ट्रेट प्रकाशित झाली तेव्हा टिकेकर यांनी व्यक्त केलेला संताप त्यांचं बुटकेपण दाखवून देणारा होता आणि तेव्हापासून त्यांनी माझ्याशी बोलणंही बंद केलेलं होतं . काल फक्त चांगलच बोलणं मला तरी शक्य नव्हतं आणि वाईट बोलणं शिष्टाचाराला धरून झालं नसतं म्हणून मी कोठेही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही...असो !


बेरक्याची टीप्पणी



एकीकडे संबंध महाराष्ट्रातील पंत्रकार टिकेकर यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण करून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत असताना,लोकसत्तात काम केलेले धनंजय कर्निक आणि प्रविण बर्दापूरकर यांनी टिकेकर यांच्याबद्दल जे लिहिले आहे,ते योग्य आहे का ?
यावर आता वाचकांनी आपली मते व्यक्त करावीत...
बेरक्या कोणाचीही कमेंट डिलीट करणार नाही...
वाचकांच्या प्रतिक्रिया....
> निधन पावलेल्या व्यक्तीबद्दल असे लिहिणे योग्य नाही....
> जीवंत असताना लिहिले असते तर योग्य ठरले असते...
> दिनकर रायकर यांच्याबद्दलही आताच लिहावे...नंतर लिहू नये...
आता आपण काय म्हणाल ?