'सकाळ' हा समाजाचा आरसा- पर्यावरणमंत्री कदम

वेब ऑफसेट युनिटचे थाटात उद्‌घाटन

औरंगाबाद : ‘सकाळ‘ समाजाला न्याय देण्याचे काम करत आहे. ‘सकाळ‘ हा सर्वसामान्यांचा असून तो समाजाचा आरसा असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
प्रजासत्ताक दिनापासून (ता. 26) "सकाळ‘ची मराठवाडा आवृत्ती नव्या रंगात, नव्या ढंगात वाचकांसमोर येत आहे. त्यासाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक वेब ऑफसेट छपाई युनिटचे उद्‌घाटन सोमवारी (ता.25) रात्री श्री. कदम यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर आमदार संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, सतीश चव्हाण, संदीपान भुमरे, सुभाष झांबड, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, माजी आमदार अण्णासाहेब माने आदींची विशेष उपस्थिती होती. "सकाळ‘ माध्यम समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील, मराठवाडा आवृत्तीचे उपसरव्यवस्थापक रमेश बोडखे उपस्थित होते.
पालकमंत्री कदम म्हणाले, माध्यम आणि लोकप्रतिनिधी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जे काम आम्ही लोकप्रतिनिधींनी करायचे असते ते "सकाळ‘ करीत आहे. "सकाळ‘ हा कोणत्या पक्षाचा नसून सर्वसामान्यांचा आहे. तो समाजाचा आरसा बनला आहे. सामाजिक बांधिलकी जपून "जिथे शासन कमी, तेथे आम्ही‘ अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. त्यानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दहा कोटींची मदत दिली. बीड, औरंगाबाद जिल्ह्यांत वीस हजार शेतकऱ्यांना धान्यांचे वाटप केले. शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. तो पुसून काढण्याची भूमिका घेतली पाहिजे. वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या उपक्रमांतून "सकाळ‘ ही भूमिका खंबीरपणे बजावीत आहे.
"सकाळ‘च्या मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड यांनी प्रास्ताविक केले. "सकाळ‘च्या वाटचालीची त्यांनी माहिती दिली. सर्व घटकांना बरोबर घेऊन "सकाळ‘ करीत असलेल्या कृतिशील पत्रकारितेचे अनेक दाखले दिले.


एका फोनवर आलो...
‘सकाळ‘ जनतेची सेवा करीत आहे. समाजाला न्याय देण्याचे काम करीत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत विधायक पत्रकारिता करीत आहे. त्यामुळे उद्‌घाटनासाठी फोनवर मिळालेले निमंत्रण क्षणार्धात स्वीकारले. मुंबईत आज कॅबिनेटच्या बैठकीसह महत्त्वाची कामे होती. तरीही कोणताही राजशिष्टाचार न पाळता या कार्यक्रमाला आलो, असे श्री. कदम यांनी सांगितले.


esakal