ससेहोलपट पत्रकारांचीही...

स्वातंत्र्यपूर्वकाळात जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर, ‘काळ’कर्ते शि.म. परांजपे, ‘केसरी’ व ‘मराठा’ चालवणारे लोकमान्य टिळक, गांधीजी यांसारख्या देशभक्तांनी स्वतःचे वृत्तपत्र चालू कले. यांपैकी कित्येकांना ब्रिटीशांनी जेलमध्येही टाकले, मात्र दुर्दैवाने आज जनतेची फसवणूक करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर केला जात आहे. निर्मल सिंह भगू, सुब्रतो रॉय, महेश मोतेवार, वर्षा सत्पाळकर, शशांक भापकर, पी. के. तिवारी यांसारख्या ‘चिटफंड’वाल्यांनी प्रसारमाध्यमांचा सुनियोजित पद्धतीने वापर केला आहे. आजमितीस हे सर्व 420 आरोपी तुरुंगात खडी फोडत आहेत.
सध्या सर्व आरोपी तुरुंगात असून त्यांची प्रसारमाध्यमे केव्हाही बंद होण्याच्या स्थितीत आहेत. मोठे पॅकेज देवून ‘हायर’ केलेल्या सर्वच पत्रकार, अ‍ॅन्कर व कर्मचार्‍यांची अवस्था फारच दयनीय आहे.
सहारा श्री सुब्रतो रॉय यांनी सहारा चॅनेलचा वापर करीत अक्षरशः अब्जावधी रुपये कमावले. ‘पर्ल ग्रुप’चा निर्मल सिंह भगू यानेही पी 7 या चॅनेलचा पद्धतशीर वापर करून चिटफंडाद्वारे सुब्रतो रॉयपेक्षा जास्त पैसा चिटफंडद्वारे कमावला. पर्लने 6 कोटी ठेवीदारांकडून तब्बल 55 हजार कोटी रुपयांहून अधिक माया कमावली. या राष्ट्रीय घोटाळ्याचे धागेदोरे देश-विदेशातही पसरले आहेत. पर्लचे लाभार्थी, क्रिकेटपटू युवराज, हरभजनसिंग, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू व ‘पर्ल’चा ऑस्ट्रेलियातील बॅ्रण्ड अ‍ॅम्बेसेडर ब्रेट ली हाही ‘ईडी’च्या रडावर आहे.
‘साईप्रसाद’चे शशांक भापकर, ‘समृद्ध जीवन’या चिटफंड व मी मराठी, लाईव्ह इंडिया या चॅनेल्सचे मालक महेश मोतेवार अद्याप तुरुंगात आहेत. ‘मैत्रेय ग्रुप’च्या सर्वेसर्वा व ‘भटकंती’, ‘मैत्रिण’च्या सीईओ वर्षा सत्पाळकर यांचा घोटाळाही अब्जावधी रुपयांच्या घरात आहे.  ‘महुआ’ ग्रुप व भोजपुरी चॅनेल्सचे पी. के. तिवारी हे सर्व चिटफंड कंपनीचे मालक असून आज तुरुंगाची हवा खात आहेत.

या सर्वांची सुरुवात अत्यंत अतिसामान्य परिस्थितीतून झाली आहे. ‘पर्ल’चे निर्मलसिंह भगू हे सायकलवर जावून दुधाचा रतिब घालायचे, तर पुण्याचे मोतेवार रिक्षा भाड्याने घेवून चालवायचे. या सर्वांनी प्रसारमाध्यमांचा खुबीने वापर केला. सेलेब्रिटी पत्रकारांना कामाला ठेवून राजकीय नेत्यांशी ‘जवळीक’ साधली. जनतेची फसवणूक करून त्यांची प्रकरणे ‘दाबली.’ मात्र यामध्ये भरडला गेला तो सामान्य स्टाफवरील पत्रकार, कर्मचारी. त्याची सध्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. पाण्यात राहणार्‍या माशांचे अश्रू कोणालाही दिसत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे जगाचे प्रश्‍न सोडविणारे पत्रकार आज आतून कुठेतरी नैराश्येच्या गर्तेत डुबक्या घेत आहेत. मजिठिया आयोग, व्हेज बोर्ड यांसारख्या प्रश्‍नांवर ‘बॉम्बे युनियन जर्नलिस्ट’सारखी अपवादात्मक संस्था वगळता अन्य कोणत्याही पत्रकार संघटना नाहीत. राजकीय पक्षही पत्रकारांच्या समस्यांकडे दिखावूपणाने बघतात.

मास्टर ऑफ जर्नलिझम करून, पत्रकारितेच्या कथित ग्लॅमरस जगात प्रवेश करणारी अवघे एकवीस, बावीस वर्षांची कोवळी तरुण-तरुणी ‘बूम’ घेवून इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रवेश करतात. मात्र 36 व्या वर्षांत ‘करिअर’च्या नावाखाली चाललेल शोषण त्यांना जाणवते. यापैकी काहीजण नंतर पीआर, प्रिंट मिडीया किंवा इतर ठिकाणी जॉब करतात.

कॉलेजमध्ये मास मिडीयाच्या वर्गात ‘जर्नलिझम’वर पोटतिडकिने बोलण्याचा आव आणणारे कुमार केतकर, भारतकुमार राऊत यांसारखे पत्रकार सामान्यांचा तळतळाट भोगणार्‍या महेश मोतेवारची हुजरेगिरी करतात. ‘दिनविशेष’ सारखे फालतू कार्यक्रमही करतात. हे या विद्यार्थ्यांना पचनी पडत नाही, मग येते ती केवळ निराशा, फ्रस्टेशन आणि त्यातून होणारी ससेहोलपट.


उन्मेष गुजराथी
unmeshgujarathi@gmail.com
9322755 098