मी मराठी पुन्हा उभारी घेणार का ?

 मुंबई - मी मराठीच्या मुख्य संपादकपदावरून रविंद्र आंबेकर यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर या चॅनलच्या मुख्य संपादकपदी तुळशीदास भोईटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मी मराठीमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे हे चॅनल पुन्हा उभारी घेणार का,याकडं आता लक्ष वेधलं आहे.
मी मराठीचे मालक महेश मोतेवार चिटफंड प्रकरणी गजाआड झाल्यानंतर या चॅनलला घरघर सुरू झाली.केवळ तीन महिन्यात या चॅनलचे ९० टक्के कर्मचारी सोडून गेले,भाडे तत्वावर घेतलेली ग्राफीक्स मशिन संबंधितांने उचलून नेली,कर्मचा-यांच्या तीन महिन्याच्या पगारी अडकल्या,त्यामुळे मी मराठीचे सर्व बुलेटीन बंद झाले.
मालक गजाआड झाल्यानंतर सर्व परिस्थितीवर मात करण्याऐवजी चॅनलच घश्यात घालण्याचा डाव काहींनी रचला होता.चॅनल कोण आणि कसं खड्ड्यात घातले,याची स्टोरी बेरक्याने दिल्यानंतर पुड्या सोडणा-याची हकालपट्टी करण्यात आली.त्यानंतर मुख्य संपादकपदाची सुत्रे पुर्वी व्यवस्थापकीय संपादक असलेल्या तुळशीदास भोईटे यांच्याकडे आली आहेत.भोईनेंनी सुत्रे स्वीकारताच,ग्राफीक्स मशिन पुन्हा जागेवर आली,याचा अर्थ त्यांना काम कमी आणि पुड्या जास्त सोडणारे नको होते.
भोईटे यांनी मुख्य संपादकपदाची सुत्रे हाती घेताना,व्यवस्थापकांना काही अटी सांगितल्या असून,याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.ही पोस्ट आम्ही जशीच्या तशी पोस्ट करत आहोत....
..............

प्रिय सहकारी,
मी मराठी न्यूज चॅनलच्या मुख्य संपादकपदाची नवी जबाबदारी हे प्रतिकुलतेतील नवं आव्हान आहे.  ती स्वीकारल्यानंतर माझी भूमिका मांडावी असं काहींनी सुचवलं.
मी इतर चॅनलमध्ये, तसंच मी मराठीतही टीव्ही न्यूजच्या क्षेत्रातील काही वेगळे प्रयोग टीमच्या साथीनं यापूर्वी यशस्वीरीत्या केले.
मुख्य संपादक म्हणून माझी तसंच पत्रकार म्हणून तुमचीही एकाधिकारशाही त्यातून अपरिहार्यरीत्या उद्भवणारी मनमानी  टाळलीच पाहिजे. पत्रकारांची मनमानी नसलेली लोकांचा सहभाग असलेली पत्रकारिता हे माझं नेहमीचं आवडतं सूत्र आहे ते आता आणखी पुढे नेऊया.
आता मी मराठी हे चॅनल लोकांचं चॅनल व्हावे, तुम्हीही लोकांचे पत्रकार आणि मीही लोकांचा संपादकच असावं असं मला वाटतं.
केवळ संपादक ठरवेल ते नाही तर संपादकीयबाबतीत  'लोकांकडून, लोकांसाठी, लोकांच्या' सहभागाने चालणारं 'मी मराठी' हे पहिलं चॅनल असेल. 
नवी जबाबदारी स्वीकारताना माझ्यासाठी एक रूपयाही वाढवून घेतलेला नाही, उलट तीन मुद्दे मांडलेत, जे टीमच्या, संस्थेच्या हिताचे आहेत.
1. पत्रकार कर्मचारी पगार, जिल्हा वार्ताहर मानधन दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालं पाहिजे, व्यवस्थापनाने 15 दिवसात करण्यास मान्यता दिली आहे.
(यावेळी सुरूवातीच्या टप्प्यातील सहकाऱ्यांचा 2 तारखेला झालाय, उरलेले तसंच वार्ताहर मानधन लवकरच व्हावे ही अपेक्षा आहे)
2. ग्राफिक्स सिस्टम (मिळाली - कार्यान्वित)
3. वितरण ( हा मोठ्या खर्चाचा, काही कोटींचा मुद्दा आहे. त्यामुळे त्याचा प्राधान्यक्रम तिसरा ठेवलाय. पहिली निकड भागली की या मुद्दयावरही व्यवस्थापन लक्ष घालेल ही अपेक्षा)
4. पहिले तीन मुद्दे जर प्रत्यक्षात आले तर जाहिरात उत्पन्नही वाढेल आणि खर्च किमान राखून चॅनल स्वयंपूर्ण होऊ शकेल.
खरंतर मीही सोडावं असा अनेकांचा आग्रह होता. आहे. माझीही मानसिकता वेगळी नव्हती. मात्र नंतर मी टीमसाठी एक प्रयत्न करण्याचा ठरवलं. व्यवस्थापनाची आर्थिक, तांत्रिक साथ लाभली तसेच तुमची साथ जास्त मिळाली तर टीमवर्कच्या बळावर आपण पुन्हा नव्यानं उभारी घेऊ शकू.
साथ नाही लाभली तर माझं करिअरच पणाला लागणार आहे, पण चॅनलसाठी, टीमसाठी तो धोका मी पत्करला आहे.
आतापर्यंत गेली दोन वर्ष वेगळ्या पदावर काम करताना आपण हे टीमवर्क करून दाखवलंच आहे. आपला Man v/s Machine संघर्ष आहे, आपण  Human touchच्या बळावर यशस्वी होऊ हे न्यूज चॅनल रिलाँचिंगच्यावेळचं  माझं विधान आपल्या मी मराठी चॅनलला वर्षभरातच मिळवता आलेला पहिला क्रमांक, नंतरचा सातत्यपूर्ण दुसरा क्रमांकानं खरं ठरवलं, ते टीमवर्कच्या बळावरच!
अनेक शुभचिंतक आजही धोका पत्करू नये असं जसं आपुलकीनं सांगत आहेत. तसंच एक मोठा वर्ग भावनिक समर्थन देत, वेळप्रसंगी अगदी कार्यालयात येऊन किंवा फिल्डवर काम करून साथ देण्यासाठीही तेवढ्याच आपुलकीनं पुढे येतोय. त्यांना एका पैशाचीही अपेक्षा नाही, हे विशेष!
चांगल्याचाच प्रयत्न करू. यश मिळालं तर उत्तमच, आर्थिक कारणांमुळे नाही मिळालं तरी दु:ख नसेल. उलट प्रतिकुलतेत प्रयत्न केल्याचं समाधान असेल. माझ्या डोळ्यासमोर माझ्या करिअरपेक्षाही चॅनलवर अवलंबून असलेली 200 कुटुंबं तसंच लोकसहभागाच्या पत्रकारितेला प्रत्यक्षात आणण्याच्या वेगळ्या प्रयोगाचं आव्हान आहे!
साथ असू द्या, करून दाखवूच!

आपलाच
तुळशीदास भोईटे
मुख्य संपादक
मी मराठी न्यूज