दै.भास्करचा वार्ताहर लाच घेताना अटक

उस्मानाबाद - उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अर्थसहाय्य तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांना सांगून मंजूर करून देण्यासाठी म्हणून ५०० रूपयांची लाच स्विकारणारा दैनिक सुराज्य आणि दैनिक भास्करचा पत्रकार विष्णू वसंत उघडे (रा. .वाशी) याला एसीबीने जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी दुपारी वाशी येथे करण्यात आली असून,या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह वाशी तहसील कार्यालयाकडे अर्ज करण्यासाठी गेली होती. तेथे विष्णू उघडे याची त्या महिलेशी भेट झाली. उघडे याने त्या महिलेचा प्रस्ताव दाखल करून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान व त्यासाठी आवश्यक असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र अधिकारी, कर्मचार्‍यांना सांगून मिळवून देतो असे सांगितले. तसेच या कामासाठी त्या महिलेकडून २२०० रूपये घेतले. काही दिवसांनी विष्णू उघडे याने तक्रारदार महिलेला १७०० रूपयांची मागणी करून ती देण्यासाठी तगादा लावला. त्यानंतर त्या महिलेने उस्मानाबादेतील एसीबीच्या कार्यालयात तक्रार केली.
महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर उपाधीक्षक अश्‍विनी भोसले यांनी पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी वाशी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. त्यावेळी विष्णू उघडे याने तक्रारदार महिलेकडे तिच्या कामासाठी पैशांची मागणी करून ५०० रूपये स्विकारल्यानंतर कारवाईकरण्यात आली. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोनि आसिफ शेख हे करीत आहेत.


दैनिक सुराज्य (बीड) आणि दैनिक भास्कर (औरंगाबाद) वृत्तपत्राचा वाशी (जि.उस्मानाबाद) येथील वार्ताहर विष्णु उघडे यास पाचशे रूपयाची लाच घेताना अॅन्टी करेप्शन ब्युरोच्या पोलीसांनी रंगेहात पकडून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..
या वार्ताहरावर कुणाचा वरदहस्त होता,याचा तपास संबंधित वृत्तपत्राचे संपादक करतील का ?


वाचा सविस्तर प्रेसनोट