''जळगाव तरुण भारत”च्या अध्यक्षपदावरुन दिलीप चोपडा पायउतार !

“जळगाव तरुण भारत” ची नाशिक आवृत्ती सुरू करण्यासाठी “घिसाडघाई” केल्याच्या कारणामुळे “जळगाव तरुण भारत” चे व्यवस्थापन करणाऱ्या “माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठान” या संस्थेच्या अध्यक्षपदावरुन दिलाप हस्तीमल चोपडा (रा. जळगाव) यांना पायउतार व्हावे लागले आहे. दिलीप चोपडा यांनी गेल्या सहा महिन्यांत “माबप्र” या विश्वस्त संस्थेच्या कार्यपद्धतीला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीला बाजुला सारुन एखाद्या “प्रायव्हेट लिमीटेड” सारखा कारभार सुरू केला होता. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद सोडण्याविषयी हस्ते परहस्ते सूचना दिल्या जात होत्या. दबाव निर्माण करायला दिलीप चोपडा स्वतः म्हणाले, “मी राजीनामा देतो”. त्यावर “माबप्र” च्या संचालक मंडळाने “द्या” म्हणत तो स्वीकारून मंजुरही करून टाकला. दिलीप चोपडा हे जळगाव “तरुण भारत” चे संचालक संपादक सुद्धा आहेत. हे पदही त्यांनी त्यांच्या मर्जीने निर्माण केले आहे. “माबप्र” च्या संचालक मंडळाने अशा पद निर्मितीला मंजुरी दिलेली नाही.
दिलीप चोपडा हे जळगावमधील ट्रान्सपोर्ट, खत, बियाणे व्यावसायिक असून त्यांनी बांधकाम क्षेत्रातही एखाद दुसरा प्रकल्प केला आहे. गेल्या ऑगस्ट 2015 मध्ये दिलीप चोपडा यांची “माबप्र” च्या अध्यक्षपदी निवड झाली होती. सर्व संचालकांना सोबत घेवून काम करण्याची “माबप्र” ची परंपरा आहे. मात्र, दिलीप चोपडा यांनी या परंपरेला दूर सारून स्वतःची “प्रायव्हेट” म्हणता येईल अशी कार्यशैली निर्माण केली होती. त्यांनी स्वतःचे पद संपादक संचालक केले, “माबप्र” चा लोगो बदलून टाकला, विश्वस्त संस्थेच्या लेटरहेडवरून इतर संचालकांची नावे उडवून टाकली, दैनिकाच्या निवासी संपादकपदी “रिटारयर्ड व गात्र शिथील” व्यक्तीला आणून बसविले, निवासी संपादकाकडे प्रुप रिडींगचे काम दिले, दुसऱ्या दैनिकात जाहिरातींच्या हिशोबात घोळ करणाऱ्याला “पंटर” म्हणून आणले व त्याच्याकडे प्रांतिक बातम्यांचे संपादन काम दिले, शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परस्पर अंक सवलत योजना (200 रुपयात 6 महिने) टाकली मात्र, तिचा लाभ झाला नाही. असे अनेक प्रकार अवघ्या चार महिन्यात दिलीप चोपडा यांनी केले. दिलीप चोपडा आणि त्यांच्या “पंटर” कर्मचाऱ्यामुळे “जळगाव तरुण भारत” चे अनेक निष्ठावंत कर्मचारी सोडून गेले व ग्रामीण बातमीदारांनी बातम्या देण्याचे काम थांबविले.
दिलीप चोपडा यांच्या या कार्यशैली बाबत इतर संचालकांत नाराजी होती. मात्र, दिलीप चोपडा कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. संचालक संपादक म्हणून आपले नाव लेखांना छापून यावे म्हणून दिलीप चोपडा यांनी काही लेख इतरांकडून लिहून घेतले तर काही पुरवण्यांमध्ये दुसऱ्यांच्या लेखाला आपले नाव दिले. हे सारे प्रकार संघीय मंडळी व “माबप्र” चे इतर संचालक सहन करीत होते.
दिलीप चोपडा यांच्या कार्यपद्धतीने “तरुण भारत नाशिक” आवृत्ती सुरू करण्यासाठी मनमानीचा कळस गाठला, असे आता इतर लोक बोलतात. नाशिक येथे “जळगाव तरुण भारत” ची आवृत्ती सुरू करण्यासाठी “माबप्र” ची कोणताही संमती नसताना चोपडा यांनी नाशिकमध्ये माणसे शोधणे, परस्पर नियुक्तीपत्र देणे, प्रकाशनाची तारीख परस्पर जाहीर करणे, “चोपडा-धन्यकुमार जैन-ओसवाल- बागमार” असा गोतावळा जमा करणे असेही प्रकार केले. अखेर संघ परिवाराशी संबंधित इतर पदाधिकाऱ्यांना नाशिक येथे धाव घेवून खरी परिस्थिती समजून घ्यावी लागली. नाशिकच्या संघ परिवार व भाजपच्या मंडळींनी वास्तव मांडल्यामुळे दिलीप चोपडा यांनी केलेली घाई गुंडाळावी लागली. आपल्या मनमर्जीला सर्व बाजुंनी विरोध असल्याचे पाहून दिलीप चोपडा दबावासाठी राजीनाम्याचे अस्त्र घेवून समोर आले. मात्र, परिवाराला तो राजीनामा हवाच असल्याने न बोलता अनेक गोष्टी सहज साध्य झाल्या.
(“बेरक्या” ने या विषयावर सतत पाठपुरावा केला. “बेरक्या” कोणत्याही वृत्तपत्र किंवा त्याच्या व्यवस्थापनाच्या विरोधात नाही. मात्र, व्यवस्थापन म्हणून मनमानी करणाऱ्या प्रवृत्तीवर “प्रहार” करण्याचे काम “बेरक्या” करीत राहणार. या विषयाला “तूर्त” पूर्णविराम.)