तुम्हारा चुक्याच...इति दर्डा पुराण !

यवतमाळच्या शिक्षण संस्थेत जे काही घडलं , त्याबद्दल श्री विजय दर्डा यांचं निवेदन वाचनात आलं  
  त्या निवेदनात व्यक्त करण्यात आलेल्या श्री विजय दर्डा यांच्या मतांशी मी पूर्णपणे सहमत आहे .
     आपल्या संस्थेतील एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्यानं अशा घृणित पद्धतीनं वागावं असं विजय किंवा/आणि राजेंद्र दर्डा कधीही कधीही सांगणार नाहीत , याची मला पूर्ण खात्री आहे ; त्यांच्या स्वप्नातही तसा काही ओंगळ-अघोरी विचार तरळेल यावर माझा मुळीच विश्वास नाही .
     गेली तीन साडेतीन दशकं या श्री विजय आणि श्री राजेंद्र दोघां दर्डा बंधुंना मी बघतो आणि ओळखतो आहे ; या दोन्ही भावांच्या ( त्यातही विशेषत: विजय दर्डा यांचा जास्त ! ) विनयशील आणि सुसंस्कृत वागण्याचा ( आणि प्रेमळ तसंच अकृत्रिम आतिथ्याचाही ) अनुभव मला अनेकदा आलेला आहे .
     श्री विजय दर्डा त्यांच्या निवेदनात म्हणतात त्याप्रमाणं , राजकारण आणि मीडियात असल्यानं अनेक शत्रू निर्माण होतात पण, एवढी मोठ्ठीठ्ठी प्रतिक्रिया का उमटली याची कारणं काही एवढीच नसतात . पत्रकारितेत आम्ही आणि दर्डा यांच्या तुलनेत आमच्यासारख्या अनेक लहानांनी मोठ्ठाले पंगे घेतले पण , जनमानस आमच्याविरुद्ध एवढं संघटीत  आणि कधीच उग्र झालं नाही .
     श्री विजय आणि श्री राजेंद्र दर्डा यांच्या विनयशील आणि सुसंस्कृतपणाचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीतील सर्वजण आणि संस्थातील त्यांचे सहकारी चालवत आहेत का , हे बहुदा या दर्डा बंधुंनी तपासून पाहिल्याचं दिसत नाहीये ;       ‘लोकमत’च्या नावाखाली चालणारी दादागिरी आणि लूट रोखण्याचा प्रयत्न झाले असते तर असं कारस्थान रचलं गेलं नसतं असं म्हणायला खूप वाव आहे .
     आपण यवतमाळचं अति ‘दर्डाकरण’ करतो आहोत याचे पडसाद , भविष्यात कधी-नं-कधी उमटणार आहेतच याचा अंदाज कायम सावध असणाऱ्या चाणाक्ष दर्डा यांनी का आला आणि त्यांनी तो बांधला नाही , हे एक कोडंच आहे .   
     श्री राजेंद्र दर्डा यांचा विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाला , तेव्हाच  दर्डा यांच्या संदर्भात कधी तरी तीव्र टोकाची प्रतिक्रिया उमटू शकते याचे संकेत मिळालेले होते ; ते या दोघां दर्डा बंधुंना त्या पराभवानंतरही जाणवले नाहीत हे एक आश्चर्यच आहे ! आणखी एक म्हणजे- त्या निवडणुकीत खुद्द ‘लोकमत’शी संबधित अनेकांनी राजेंद्र दर्डा यांना मतदान केलेलं नव्हतं ; असं का घडलं याबद्दल आत्मपरीक्षण करण्यात आलं की नाही हे मला ठाऊक नाही !  
     बहुसंख्येनं खुजी उंची आणि किरटी वृत्ती असलेल्या खुशमस्कऱ्या आणि सुमारांचं नेतृत्व करण्यातून मिळणारा आनंद म्हणा की नशा , ही एक सूज असते आणि ती सूज केव्हा-न-केव्हा ठणकतेच ; याचं भान सुटल्यामुळे तर हा ‘लोच्या’ झाला नाहीये नं, याचा विचार बहुदा यवतमाळकरांच्या न्यायबुद्धीला आवाहन करतांना विजय दर्डा यांनी केलेला नाहीये असंच हे निवेदन वाचल्यावर जाणवलं .
     शिक्षण संस्था चालक म्हणून दर्डा यांचं म्हणणं कितीही समर्थनीय असलं तरी एका मोठ्या वृत्तपत्र समुहाचे मालक-संपादक म्हणून ते चुकले आहेत कारण यापूर्वी  लैंगिक शोषणाच्या ( आणि अशा अनेक एकारल्या ) बातम्या प्रकाशित करतांना संस्था चालकांचे राजीनामे लोकमत वृत्त समुहाने आक्रमक मोहिमा राबवत मागितले , त्यांना अटक का केली जात नाही ही मागणी लावून धरली , त्यावेळी ‘त्यात संस्था चालकाचा दोष नाही’, असं दर्डा यांनी त्यांच्या ‘माणसां’ना समजवलं नाही . त्यावेळी आततायीपणाचं जे रोपटं ‘लोकमत’नं पत्रकारितेत लावलं त्याला आज आलेलं ‘हे’ फळ आहे !
     यवतमाळच्या बातम्या प्रकाशित न करून तर दर्डा यांनी चुकीचा पायंडाच पाडला नाही तर , त्यांच्याभोवती असणारं संशयाचं धुकं गडद केलं आणि यवतमाळकरांना आणखी उग्र होण्यास सहाय्यच केलं .
     पहिल्या दिवसापासूनच लोकमत वृत्तपत्र समूहाच्या सर्व वृत्तपत्रात ‘हार्ड न्यूज’ आणि स्वत:चं निवेदन प्रकाशित केलं असतं तर विजय दर्डा यांना अशी बदनामी सहन करावी लागली नसती .
     my dear vijaybabu , you have committed unmatchable late in this regard ,!
अंतुले यांच्या सिमेंट घोटाळयाबद्दल ‘पुलं’नी म्हटलेल्या शीर्षकाचा आधार घेऊन म्हणायचं तर, काही म्हणा, दर्डाजी तुम्हारा इसबार चुक्याच...   

// इति दर्डा पुराण समाप्त //  
-प्रवीण बर्दापूरकर,
9822055799 / 9011557099