‘लोकमत’ची फेकमफाक;पुण्यात ‘सकाळ’च नंबर 1

वृत्तपत्रांच्या दुनियेत खपाचं मोजमाप ठरवायचा अधिकार फक्त ‘एबीसी’ या संस्थेचा आहे आणि ‘एबीसी’नं पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात ‘सकाळ’च निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर आहे यावर शिक्कामोर्तब केले आहे. असे असतानाही लोकमतने कोणत्यातरी हंसाचा हवाला देत पुण्यात नंबर 1 चा दावा करत पुणे शहरात जवळपास 200 होर्डिग्स लावले होते,त्याचबरोबर काल पान 1 वर सर्व आवृत्तीमध्ये जाहिरात प्रसिध्द केली होती,त्याचा सकाळने चांगलाच समाचार घेतला आहे.सकाळची बातमी जशीच्या तशी प्रसिध्द करीत आहोत...
.........................................................................

पुणे -  झाला,‘लोकमत’चा पुन्हा रडीचा डाव सुरू झाला. पुण्यात लहान मूलही सांगतं पुण्याचं मुखपत्र, या शहराचं ‘नंबर वन’ दैनिक ‘सकाळ’च आहे. कित्येक वर्षे, अनेक दशके यात खंड नाही; तरीही कुठल्या तरी बिनबुडाच्या रोकडा मोजून करून घेतलेल्या तथाकथित सर्वेक्षणाचा आधार घेऊन ‘लोकमत’ची सुरू झालेली फ्लेक्‍स फेकमफाक पुण्यात चेष्टेचा विषय बनला आहे. हेच वृत्तपत्र अलीकडेपर्यंत ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशनचा (एबीसी) आधार घेऊन राज्यात पहिल्या क्रमांकाचा दावा करायचे. ताज्या एबीसी आकडेवारीने ‘सकाळ’च राज्यातही निर्विवाद नंबर वन असल्याचे स्पष्ट होताच ‘लोकमत’चे धाबे दणाणले आणि पुण्यात फ्लेक्‍सवरून कोल्हेकुई सुरू झाली. पुण्यात ‘सकाळ’च्या पहिल्या स्थानाबद्दल कधीच कोणाला शंका नव्हती. राज्यातही ‘सकाळ’ नंबर वन बनताच ‘एबीसी’ची आकडेवारी ‘लोकमत’साठी कोल्ह्याला द्राक्षं आंबट अशा प्रकारची बनली आहे. 

वृत्तपत्रांच्या दुनियेत खपाचं मोजमाप ठरवायचा अधिकार फक्त ‘एबीसी’ या संस्थेचा आहे आणि ‘एबीसी’नं पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात ‘सकाळ’च निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर आहे यावर शिक्कामोर्तब केले आहे. आपल्या कामाने लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या ‘सकाळ’पुढे पीछेहाट झाल्याने ‘लोकमत’चा रडीचा डाव सुरू आहे.

आकडेवारीतच बोलायचं, तर ‘एबीसी’नं प्रमाणित केल्यानुसार ‘सकाळ’चा जुलै ते डिसेंबर २०१५ या काळातला पुण्यातला खप ५ लाख ४५ हजार ९९५ प्रती इतका आहे. तर लोकांची साथ मिळवण्यात सपशेल अपयशी ठरल्याने ‘फेकमत’ निर्मितीत रमलेल्या ‘लोकमत’चा याच काळातला ‘एबीसी’नं मान्य केलेला खप अवघा ७१ हजार ३५४ प्रती इतका आहे.

‘एबीसी’च्याच आधीच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जून २०१३ या सहामाहीत ‘लोकमत’चा राज्यातला एकत्रित खप १४ लाख ४८ हजार ४६३ प्रती इतका होता. जानेवारी ते जून २०१४ या सहामाहीत खपाचा हाच आकडा १४ लाख ६ हजार ४०२ प्रतींवर आला. जुलै ते डिसेंबर २०१४ या सहामाहीत खपाचा हा आकडा आणखी घसरून १३ लाख ८१ हजार ७१२ प्रतींवर आला. जानेवारी ते जून २०१५ या सहामाहीसाठी ‘लोकमत’ने ‘एबीसी’चे खपाचे प्रमाणपत्र घेतलेच नाही. जुलै ते डिसेंबर २०१५ या काळासाठी त्यांनी पुन्हा जेव्हा प्रमाणपत्र घेतले, तेव्हा त्यांचा राज्यातला एकत्रित खप आणखी खाली जाऊन १३ लाख २६ हजार १८८ प्रतींवर आला होता.

‘सकाळ’च्या पासंगालाही ‘लोकमत’ पुरत नाही अशी पुण्यातली स्थिती आहे. ‘सकाळ’च्या तुलनेत पुण्यात ‘लोकमत’ लढतीतच नाही. ‘सकाळ’ची ताकद जवळपास चौपट आहे. साहजिकच सारा प्रचार एखाद्या हिंदकेसरीच्या ताकदीवर जळणाऱ्या मरतुकड्यानं ‘मीच ताकदवान’ म्हणावे असा आहे. आता हे वास्तव पचवता येत नसल्यानं बनावटगिरीवर आधारलेला प्रचार सुरू झाला आहे. ‘लोकमत’ने जी कथित आकडेवारी रस्त्यावर मांडली ती ‘हंसा’ नावाच्या खासगी कंपनीकडून स्वतःच करून घेतलेल्या कथित सर्वेक्षणाची आहे. मुळात असल्या सर्वेक्षणाला माध्यमांच्या जगात कवडीची किंमत नाही. या फुटकळ आणि उठवळ प्रचाराचा अर्थ आपणच आपली आरती ओवाळण्यासारखा आहे. फेकमत तयार करायचा असाच प्रयत्न कोल्हापुरात झाला, तेव्हाही तो तोंडावर आपटला आणि कोल्हापुरात हे वृत्तपत्र गांभीर्यानं घ्यायचे कारण नाही असे जनमानस तयार झाले. असेच पुण्यातही घडते आहे. 

जे अस्तित्वात नाही, ते आहे असं मानून जगण्याला भ्रम म्हणतात. असं सतत भ्रमात राहण्याला भ्रमिष्ट होणं म्हणतात. पुण्यात ‘लोकमत’ने रस्त्या-रस्त्यावर फलक लावून जो तमाशा उभा केला आहे तो याचेच निदर्शक आहे. फलकांवर मिरवून कोणी नेता होत नाही, प्रत्यक्षातही आणि व्यवसायातही. त्या मिरवण्याला सत्याचा आधार नसेल, तर दावे हास्यास्पद ठरतात. पुण्यात ‘सकाळ’ निर्विवाद नंबर वन आहे. हे काही आज घडलेले नाही. यात ‘सकाळ’च्या समाजहितैषी कामगिरीचा वाटा मोठा आहे. ‘सकाळ’चे काम आणि विश्‍वासार्हतेचं नाणं खणखणीत आहे. त्यापुढे कितीही प्रयत्न करून डाळ शिजत नाही हे वर्तमानपत्रांच्या जगात अनेकांनी अनुभवले आहे.

पुणे असो की महाराष्ट्र मराठी माणसाचे ‘सकाळ’शी जडलेले नाते अकृत्रिम आहे. नित्यनवे आहे. ‘सकाळ’मध्ये वाचल्याखेरीज बातमीवर विश्‍वास न ठेवण्याची परंपरा महाराष्ट्रात तयार झाली आहे. यात कुठेच ‘सकाळ’समोर उभे राहता येत नाही, हे वारंवार सिद्ध झाल्यानंतर येणारे नैराश्‍य ‘लोकमत’च्या पुण्यातल्या आगाऊ फलकबाजीतून झळकत आहे. ‘एबीसी’च्या आकडेवारीनंतरही चाललेला हा फेकमत निर्मितीचा डाव पुणेकरांसाठी थट्टेचा विषय बनला नाही तरच नवल. 

लोकांची खरी साथ असलेल्या ‘सकाळ’ला खरंतर अशा भुक्कड प्रयत्नांची दखल घ्यायचे कारणही नाही. पण समाजात अकारण फेकमत पसरू नये यासाठी वास्तव सांगायलाच हवे. तथ्यहीन गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या, तर कदाचित जे नाहीच त्याचा बोलबाला होण्याचा धोकाही असतो. वृत्तपत्रातल्या चढाओढीला इतक्‍या सुमार पातळीवर नेले जात असेल, तर सत्य सांगायलाच हवे. वृत्तपत्रांचा खप प्रमाणित करणारी अधिकृत मान्यताप्राप्त संस्था ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशन (एबीसी) हीच आहे. वाचकसंख्या प्रमाणित करणारी संस्था ‘आयआरएस’ आहे. यातील ‘आयआरएस’ची ताजी आकडेवारी नाही. त्यामुळं अधिकृतपणे वाचकसंख्येचं प्रमाणीकरण झालेलं नाही. मात्र, ‘एबीसी’चं सहामाही ऑडिट सुरूच आहे आणि या संस्थेच्या ताज्या उपलब्ध ऑडिटमधील आकडेवारीनुसार सकाळ महाराष्ट्रातलं पहिल्या क्रमांकाचे दैनिक आहे. ज्या पुण्यातल्या विचारी विवेकी वाचकांसोबत फेकमफाक सुरू झाली आहे तिथे तर ‘सकाळ’ ‘लोकमत’च्या प्रचंड पुढे आहे. ‘सकाळ’ला मिळणारा प्रतिसाद, ‘सकाळ’चे उपक्रम, जाहिरातींना मिळणारा प्रतिसाद हे सारं चोखंदळ पुणेकरांनी अनेकदा जोखलं आहे. साहजिकच ‘लोकमत’चे तथाकथित पहिल्या क्रमांकाचे फलक पुणेकरांनी सकाळी सकाळी विनोद म्हणूनच पाहिले. 

ज्यांना असे विनोद करायचे ते करत राहोत. ‘सकाळ’चे पुण्यातले अढळस्थान निर्विवाद आहे.