बेजबाबदार प्रकाश मेहतांची उद्धट उत्तरं, पत्रकाराला धमकी

महाड - येथील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री प्रकाश मेहता यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची अनास्था व दडपशाहीची वर्तणूक आज (गुरुवार) कॅमेऱ्यात कैद झाली. ‘साम‘ टीव्हीचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी विचारलेल्या प्रश्‍नामुळे प्रकाश मेहता यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि तांबे यांच्या अंगावर ते धावून गेले. ‘कोसळलेल्या पुलाविषयी आणि पीडितांच्या नातेवाईकांविषयी प्रश्‍न विचारल्यामुळे मेहता आणि कार्यकर्त्यांचा तोल गेला. विशेष म्हणजे, कालही दुसऱ्या एका दूरचित्रवाहिनीच्या पत्रकारांसह मेहता यांचा वाद झाला होता.
काय आहे प्रकरण:

‘मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून कुठलीही माहिती मिळत नाही. लांबून आलेल्या नातेवाईकांची कुठलीही सोय महाडमध्ये का केली नाही?’ असे प्रश्न विचारताच प्रकाश मेहता यांचा पारा चांगलाच चढला. ‘याबाबत माझा पक्ष काय ते बघून घेईल. असं म्हणत त्यांनी पत्रकारालाच दमदाटी सुरु केली.

इतकंच नव्हे तर, त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी दमबाजी करत हे चित्रीकरण थांबवण्यासाठी सामचे पत्रकार मिलींद तांबे यांना धमकावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं एकीकडे लोकांचे जीव गेल्यानंतरही सरकारचा उद्दामपणा आणि धमकावणं सुरुच असल्याचं दिसतं आहे.