मुंबई - शेतकऱ्याची पहिली आत्महत्या नेमकी कधी झाली आणि त्यासाठी आंदोलन होतेय हे तुम्हाला माहीत आहे काय? त्या अन्नत्याग आंदोलनात तुम्हीही सहभागी होणार का? असे साधे प्रश्न विचारल्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विरोधी पक्षनेता असताना मी केलेली भाषणे वाच, मग तुला कळेल. तू कोण मला प्रश्न विचारणारा?, असे उत्तर दिले. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनात, प्रसारमाध्यमांकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी कळकळीने बोलणाऱ्या नेत्यांसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ "ब्लेम गेम' आहे की काय, अशी शंका येते.
सकाळचे पत्रकार ब्रह्मदेव चट्टे यांनी रामदास कदम यांना दूरध्वनीवरून प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता ते म्हणाले, "सकाळ'ला दोन वेळा बातम्या आल्या की, एकनाथ शिंदे यांचे सोडून सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या. अशी आमदारांची मागणी होती? कोणत्या आमदाराची मागणी होती ही, ते सांगा आधी, तोपर्यंत मी तुमच्यासोबत बोलणार नाही. तुम्ही मला प्रश्न विचारणारे कोण? तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणी दिला? शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विरोधी पक्षनेता असताना मी केलेली भाषणे वाच, मग तुला कळेल. तू कोण मला प्रश्न विचारणारा?