पत्रकारावर गुंडांचा जीवघेणा हल्ला

पनवेल- शहरातील प्रतिष्ठितांची सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'कल्पतरू' सोसायटीच्या अंतर्गत वादातून सोसायटीचे चेअरमन, वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी व त्यांचे शेजारी संतोष फटाके यांच्यावर खारघर येथे एका पक्षाच्या गुंड कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर आमदार अनंत गाडगीळ यांनीही अधिवेशनात याप्रकरणी आवाज उठवला. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनीही सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. 

शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता खारघर येथील सेक्टर १२ मधील शिल्प चौकातील चतुर्भुज इमारतीजवळ सूर्यवंशी व फटाके हे दोघे त्यांच्याकडील स्विफ्ट मोटारगाडी उभी करून समोरील कार्यालयात खासगी कामासाठी गेले होते. त्यांनंतर त्यांना विधानभवनात कव्हरेजसाठी जायचे होते. त्यांनी संतोष यांना बेलापूर स्टेशनला ड्रॉप करण्यास सांगितले, मात्र काम उरकून ते दोघे परतल्यानंतर त्यांच्या गाडीच्या पुढच्या दोन चाकांची हवा काढल्याचे निदर्शनास आले. उन्हाळा असल्यामुळे अतिहिटमुळे हा प्रकार घडल्याचे वाटल्यामुळे ते आजूबाजूला चाक दुरुस्तीसाठी शोध घेत असतानाच तेथे दबा धरून बसलेल्या चार - पाच जणांच्या टोळक्याने हातात असलेल्या बेस बॉल बॅट व  हॉकी स्टिकने त्यांच्यात क्षणार्धातच प्राणघातक  हल्ला चढवला. त्यावेळी सूर्यवंशी हे 'आम्हाला का मारत आहात', असे किंचाळून वारंवार विचारात होते. मात्र हल्लेखोर त्यांचे काहीही न ऐकता त्यांना मारहाण करतच होते. हे सर्व हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून आले होते. 

हल्लेखोरांच्या हातून संतोष निसटण्यात यशस्वी झाले. तरीही त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, सूर्यवंशी याना ठार मारण्याच्या हेतूनेच हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यांना खारघर येथील जवळच्याच मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या उजव्या हाताचे हाड तुटले आहे. त्यावर शस्त्रक्रिया केली आहे. पायाला देखील जबर मार बसला आहे. 

हल्लेखोर त्यांनी आणलेल्या मोटारसायकलवरून पळून जाण्यात यशस्वी ठरले. या हल्लेखोरांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे आदेश सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश निलेवाड यांनी दिले आहेत. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अतिरिक्त आयुक्त मधुकर पांडे, परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ राजेंद्र माने यांनी स्वतः उपस्थित राहुन सूर्यवंशी यांची भेट घेतली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे करत आहेत. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक केली नसून पनवेल महानगरपालिकेच्या रणसंग्रामात दहशत माजवण्याचा हेतूनेच हे कृत्य केलं असण्याची शक्यताही  पोलिसांनी वर्तवली आहे. 

या हल्ल्याच्या पाठीमागे कल्पतरू सोसायटीच्या निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे समजते, मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीत सूर्यवंशी चेअरमन म्हणून निवडून आले होते. विरोधकांचा केलेला दणदणीत पराभव  झोंबल्यामुळे, त्यांनी हा भ्याड हल्ला चढविला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे,
 याप्रकरणाची सीसीटीव्ही कव्हरेज ताब्यात घेतले असून लवकरच सखोल तपासणी करून एफआयआर दाखल केला जाईल, असेही नगराळे यांनी सांगितले.