आमचा ‘बादशहा’ गेला !

गोविंद तळवलकर नावाची एक व्यासंगी पत्रकार संस्था काल बंद झाली. अर्थात ती लिखाण भांडाराच्या रूपातून तशी जिवंतच राहणार आहे. आज कोणतेही दैनिक त्या संपादकाच्या नावाने ओळखले जात नाही! अतिव्यावसायिकतेच्या नवअवतरणात संपादक म्हणून नेतृत्व करणारा ‘ज्येष्ठ’ म्हणावा असा पत्रकार काळाच्या पडद्याआड जाऊ लागला आहे. काही प्रमाणात तो अधूनमधून डोकावतो हे नक्की. त्यामुळं सगळाच काळाकुट्ट अंधार पडलेला नाही हेही सत्य. प्रसार माध्यमांना आलेल्या आधुनिक वातावरणात एकूणच निःपक्ष, निर्भीड आणि अनेक अर्थाने व्यासंगी, असे दर्शन घडणे अवघड होत असल्याच्या काळात महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ आपल्या लेखणीद्वारे प्रभाव टाकणार्‍या गोविंद तळवलकरांचा वियोग हा अस्वस्थ करणारा आहे. किमान 70 वर्षे अखंडपणे लिहीत असलेल्या तळवलकरांनी 
चौफेर लिखाण केले. आम्हा पत्रकारांसाठी ते अनेक अर्थांनी बादशहाच होते. या बादशहाकडे म्हणे उत्कृष्ट वाक्चातुर्य नव्हते. तो कमी बोलला असेल; परंतु नेमका बोलला असेल. स्वभावाने तो शिष्टही वाटला असेल; पण तो वैशिष्ट्य जपण्यासाठी काही वेळी अबोल राहिला असेल.   तेही अतिशय अभ्यासपूर्ण. त्यांनी गेल्यावर्षी विल्यम शेक्सपिअरच्या 400 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये दोन स्तंभ लिहिले होते. या स्तंभांमध्ये त्यांनी ते बी. ए. चे शिक्षण घेत असताना ज्या प्राध्यापकाने जीव ओतून शेक्सपिअर शिकविला, ते प्राध्यापक त्यांना नंतरच्या काळात बसमध्ये दिसले. त्यांना बसायला जागा दिली. त्यासंबंधी तळवलकरांनी किंग लिअरच्या आयुष्याची कहाणी सांगताना या प्राध्यापकांच्या डोळ्यांत आसवं जमली, तेव्हा माझेही डोळे भरून आले होते, हे तळवलकरांनी त्या प्राध्यापकांना सांगितले. तळवलकरांचा थांबा आल्यानंतर ते उतरू लागले. तेव्हा ते प्राध्यापक तळवलकरांना म्हणाले, ‘तू ज्या रितीने वागलास आणि जुनी आठवण जागी केलीस, ते सर्व मीही कधी विसरणार नाही’! असा एक भावुक प्रसंग त्यांनी शेक्सपिअरच्या आठवणी मांडताना केला आहे. म्हणजे एखादा स्तंभ हा किती प्राण ओतून तळवलकर लिहायचे हे त्यातून दिसते. सत्तांतरासारखे राजकीय लिखाण असो की शेक्सपिअर असो, तो पट उभा करण्याचे सामर्थ्य तळवलकरांच्या लिखाणात होते. म्हणूनच आम्ही येथे तळवलकरांना संस्था असे जाणीवपूर्वक म्हटले आहे. विद्यमान पिढीतील अनेक संपादकांनी गोविंद तळवलकर प्रत्यक्ष अनुभवलेले नाहीत. तसे नसले तर आधीच्या पिढीनं या ना त्या प्रकारे तळवलकरांना पाहिलेले आहे. नुसतेच पाहिलेले नाही तर अनेकांनी प्रत्यक्ष कामही केलेले आहे. मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर हे ‘महाराष्ट्र टाईम्स’चे मराठवाडा प्रतिनिधी म्हणून काम पाहात होते. त्यावेळी त्यांच्या तोंडून तळवलकरांची कार्यशैली ऐकायला मिळालेली आहे. आता साक्रीकरही निवृत्त झाले आहेत. मुंबईत बसून संपूर्ण महाराष्ट्रातील स्थितीचे, घडामोडींचे अवलोकन करणार्‍या अनेक पत्रकारांना आजही मराठवाडा दिसत नाही, तसा तो तळवलकरांच्या काळातही दिसत नव्हता; परंतु तळवलकर हे पत्रकार महर्षी अनंत भालेरावांकडून मराठवाडा समजावून घेत असत, असे ज्येष्ठ पत्रकार संतोष महाजन यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविताना म्हटलेले आहे. ते महत्त्वाचे वाटते. आज एकूणच माध्यमांचा वेग हा सेकंदावर मोजला जातो. जे घडते आहे ते तत्काळ ‘लाइव्ह’ पाहण्याचा हा काळ. या काळात कोणती बातमी कोणत्या क्षणाला शिळी होऊन जाईल किंवा तिचा प्राधान्यक्रम बदलेल, हे सांगणं बरेचदा अवघड होऊन बसतं. याही स्थितीत वर्तमानपत्रांनी आपले लोकशाही यंत्रणेवर ठेवलेले वजन आहे तसेच आहे हे आल्हाददायक म्हणावे. ऑनलाइन आवृत्त्यांमुळे टीव्ही चॅनेलप्रमाणे तत्काळ माहिती प्रसारित केली जात असली तरी दुसर्‍या दिवशी विश्‍लेषणापासून ते अग्रलेखापर्यंत प्रत्यक्ष काय छापून येते? हे तितकेच महत्त्वाचे मानले जाते. वर्तमानपत्र हातात घेऊन वाचल्याशिवाय चैन पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा एकूण स्थितीत गोंविद तळवलकरांनी आपली लेखणी कधीच बाजूला ठेवली नाही, हे त्यांच्याकडून शिकण्या-घेण्यासारखे आहे. 1925 साली डोंबिवली येथे जन्म झालेल्या तळवलकरांनी वयाच्या 91 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आजच्या भाषेत सांगायचे तर आपले पत्रकार म्हणून करिअर त्यांनी शेवटपर्यंत चढत्या भाजणीनं समृद्ध कसे राहील? याचा विचार केला. काही वर्षांपूर्वी ते अमेरिकेत स्थायिक झाले; परंतु, आपले मराठी भाषेतील लिखाण त्यांनी कधी थांबविले नाही. सातत्याने भाष्य करत राहिले. मुळातच, स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरच्या कालखंडात विचारसरणी हा पत्रकारितेचा आधार होता. आता तो किती आहे? हा चर्चेचा विषय आहे! तो संपूर्ण काळ गोविंद तळवलकरांनी अनुभवलेला. त्यांच्यादृष्टीने लोकमान्य टिळक आणि डॉ. एम. एन. रॉय या थोर विभूतींचा त्यांच्यावर प्रभाव होता. तळवलकरांना महाराष्ट्र शासनाने लोकमान्य टिळकांच्या नावाने दिल्या जाणार्‍या गौरव पुरस्काराने सन्मानित करणे असो किंवा तळवलकरांच्या हातून रॉय यांच्या विचारसरणीनुसार चालणारे जिथे जिथे जथ्थे आहेत त्याविषयीचे लिखाण असो, हे त्यांच्या मूळ वैचारिक बैठकीमुळे आलेले योग समजावेत. राजकारण, साहित्य, संस्कृती, शिक्षण अशा प्रांताविषयी लिहिण्यात तळवलकरांचा हातखंडा होता. ‘अग्रलेखांचा बादशहा’ अशी उपाधी त्यांना मिळालेली होती. कोणत्याही क्षेत्रातील गुंता मांडताना पत्रकाराने कधीही सामान्यांना समजणार नाहीत असे शब्द वापरावयाचे नसतात, हे कळणार्‍या संपादकांपैकी तळवलकर होते. त्यामुळेच ते ज्या काळात ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकसत्ता’ या दैनिकांचे संपादक होते, त्यावेळेला मोठा वाचक वर्ग तळवलकर काय लिहितात? हे पाहात असे. आपल्या प्रतिक्रिया नोंदवित असे. तळवलकरांनी केलेले विश्‍लेषण हे अनेक वाचकांना म्हणजेच लोकांना भावते म्हणून तळवलकरांच्या लिखाणाकडे राजकारणीही तितक्याच काळजीत असायचे. ज्येष्ठ लोकनेते शरद पवार व त्यांचे गुरू स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी तळवलकरांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातूनच लिहिले असे म्हणतात; परंतु या दोन्ही नेत्यांविषयी लिहिताना राज्याचे नुकसान त्यामुळे कुठे होणार नाही, याची काळजीही त्यांनी घेतल्याशिवाय तटस्थतेचे प्रमाणपत्र त्यांना कुणी दिले नसते. तळवलकर हे आपल्या सर्वदूर लिखाणामुळे स्वत: एक संस्था बनले होते, हे त्यांच्याविषयी विकीपिडियावर लिहिलेले आहे. एखाद्या व्यक्तिविषयी माहिती लिहिताना इतक्या समर्पक; परंतु एकाच वाक्यात ज्याचे संस्था म्हणून वर्णन उमटते, ते पुरेसे बोलके असते. ‘लोकसत्ता’ मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी ते रुजू झाले त्या पहिल्याच दिवशी त्यांनी अग्रलेख लिहिला होता. येथून तळवलकरांच्या लिखाणाचा प्रवास जो सुरू झाला, तो कधी थांबलाच नाही. दोन दैनिकांशिवाय इंग्लिश दैनिके, नियतकालिके यामधून तळवलकरांनी अनेक प्रकारचे स्तंभलेखन केले. रोजच्या रोज त्या त्या विषयाचा ताळेबंद ठोकून देताना तितकीच मोठी जरब बसविणे हे तळवलकरांसारख्यांना जमते. त्याचे कारण त्यांचे वाचन, चिंतन आणि त्यानंतर वेळोवेळी होणार्‍या सामूहिक चर्चांमध्ये सहभाग यामुळे ते शक्य होत असते. तळवलकरांनी तीन पिढ्यांमध्ये आपल्या लेखनाला मुक्तपणे वाव दिला. अनेक नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेले प्रकाशझोत, जागतिक घडामोडी, साहित्य व इतर क्षेत्रांसंबंधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या 25 आहे. यावरून त्यांनी केवळ आवश्यक त्या शाब्दिक धावा काढून संपादक म्हणून कार्य केले, असे नाही तर या धावा वाचकांनी कायम जपून ठेवाव्यात अशाप्रकारे लेखक म्हणून मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पत्रकार ‘संस्था’ म्हणून त्यांना आदरांजली वाहतो.
डॉ. अनिल फळे 
संचालक-संपादक
दैनिक गांवकरी (मराठवाडा आवृत्ती)
9822337582
 साभार - दैनिक गावकरी, औरंगाबाद