प्रिंटला चिंता आॅनलाईनची !

गेली काही महिन्यांपासून मोठमोठ्या साखळी वर्तमानपत्रातून एका वेगळ्या विषयाची चर्चा सुरू आहे. चर्चा आहे आणि त्यासोबत काळजीही आहे. सोशल मीडियाचे वाढते प्रस्त आणि त्याअनुषंगाने प्रिंट मीडियाचे भवितव्य काय, यासंदर्भात ही चर्चा आणि काळजी आहे. आपल्या आजुबाजुला आणि देशभरातच नव्हे तर जगभरातील घटना आणि घडामोडींची माहिती क्षणभरात आपल्या हातातील स्मार्ट फोनवर मिळू लागल्यानंतर आपोआपच वर्तमानपत्रातून (तेही दुसऱ्या  दिवशी सकाळी हाती येणाऱ्या ) बातमी जाणून घेण्याची आणि ती वाचण्याची उत्सुकता कमी होऊ लागली आहे. डिजिटलायझेशन झपाट्याने वाढताना दिसत आहे. यू टूबचा उपयोग करून ग्रामीण भागातूनही न्यूज चॅनल्स सुरू होऊ लागले आहेत. 

प्रिंटचे भवितव्य काय, याची चर्चा बड्या साखळी वर्तमानपत्रांच्या मालकांची झोप उडवू लागली आहे. नोटाबंदीनंतर कार्पोरेट जाहिरातीचा मंदावलेला धंदा मालकांना सतावत आहे. यातूनच कर्मचाऱ्याच्या डोक्यावर मालकांनी कपातीची टांगती तलावर ठेवली आहे. कमीत कमी कर्मचाऱ्याध्ये जास्तीत जास्त काम कसे करुन घेता येईल, याचे ‘मंथन’ सध्या सुरू झाले आहे. साखळी वर्तमानपत्रांचे मालक आता उघडपणे प्रिंटचे भवितव्य सांगता येत नाही, असे म्हणत असतानाच सर्वच साखळी वर्तमानपत्रांनी आधी बातमी आॅनलाईनवर आणि नंतर प्रिंटमध्ये हे धोरण अवलंबिले आहे.

संपादकीय मंडळींना आॅनलाईनला न्यूज देणे कम्पलसरी झाले आहे. त्यामुळे आता डिजिटल न्यूजपेपरचे वारे अधिक वेगाने वाहू लागले आहे. साखळी वर्तमानपत्रांनी काळाची पावले ओळखत आॅनलाईनकडे लक्ष केंद्रीत केले असले तर छोट्या वर्तमानपत्रांनी अजूनही याकडे गांभीर्याने पाहिल्याचे दिसत नाही. त्यांनाही आता काळानुरूप बदल करून घेणे आवश्यक आहे. जपानसारख्या प्रगत देशाने प्रिंट मीडिया गुंडाळायला सुरूवात केली आहे. त्यांनी आपले संपूर्ण लक्ष डिजिटल न्यूजपेपरवर केंद्रीत केले आहे. अवघ्या काही महिन्यांमध्ये प्रिंट मीडिया जपानमधून कालबाह्य झालेला असेल.

मराठी वर्तमानपत्राच्या दुनियेतही आॅनलाईनला प्रचंड महत्त्व आलेले आहे. साखळी वर्तमनापत्रांच्या मालकांनी आॅनलाईनसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार केली आहे. 

प्रिंट मीडियाचे भवितव्य २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर असेल की नाही, याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. व्हाटस अ‍ॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ न्यूजच नाही तर फोटो आणि व्हुजवल्सही स्मार्ट फोनमधून समोर येऊ लागल्याने वाचकांना घटना घडल्याबरोबर त्याचा तपशील हाती मिळू लागला आहे.

प्रिंटसाठी आणखी एक धोका आहे तो हा की भविष्यातील वाचक निर्माण होण्याची प्रक्रिया सध्या थांबली आहे. घरात घेणाऱ्या  वर्तमानपत्राची घडी उघडण्याची तसदीही आजची तरूण पिढी घेत नाही. त्यांना काही जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी स्मार्ट फोन म्हणजे अल्लाऊदिनचा जादूचा दिवाच त्याच्या हाती आहे. त्याची भिस्त त्याच्यावर आहे, त्यामुळे अनेक मोठमोठ्या वर्तमानपत्रांच्या खपाचे गेल्या सहा महिन्यातील आकडे पाहिले तर खपाचा आकडा घसरू लागला असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. घसरणाऱ्या  खपाला बक्षीसांचे आमिष तरी किती दिवस दाखवणार आहेत. मोठमोठ्या जाहिरातदारांचा कलही आता गुगलकडे वळू लागला आहे. थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची घाई असणाऱ्या  जाहिरात कंपन्या स्वत:चे इव्हेंट करून ग्राहकाशी थेट संवाद साधू लागल्या आहेत. सरकारी जाहिरातीनी आॅनलाईनचा सहारा कधीच घेतलेला असल्याने या जाहिरातींचा ओघही खूप मंदावला आहे. अशावेळी भवितव्याची चिंता प्रिंटच्या मालकांनी केली तर त्यात नवल ते काय?
- बेरक्या उर्फ नारद