मुंबई - इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा पत्रकारितेच्या क्षेत्रात
ताण-तणावाचे प्रमाण इतके मोठे आहे की अलिकडच्या काळात हे ताण सोसवेनासे
झालेत. कामाच्या ताणापेक्षाही एकमेकांचे पाय ओढण्याच्या प्रवृत्तीमुळे नाहक
वाढणारा ताण जीवघेणा ठरू लागला आहे. त्यामुळेच ग्लॅमरच्या मोहापायी या
क्षेत्रात येणाऱ्या नवख्या मंडळींचा होणारा हिरमूस आणि होणारी निराशा बघवत
नाही. बड्या वर्तमानपत्रात तर एकदा वरच्या हुद्यावर गेले की खालच्या
मंडळीचा छळ करण्यासाठीच आपल्याला मालकाने बढती दिली आहे, असेच काही
मंडळींना वाटते. खालच्या मंडळींची पार अक्कल काढायलाही ही साहेब मंडळी
मागेपुढे पाहत नाहीत. शिव्या घालणे, कामाचा भार वाढवून त्रास देणे,
अनावश्यक कामे सांगणे, बातम्या किल करणे, कितीही मेहनत करून एखाद्याने
बातमी आणली तर त्या बातमीला न्याय देण्याऐवजी तिला किल कसे करता येईल,
याच्यावरच काम करणे, काम करणारांना काम करू द्यायचे नाही आणि काम न करता
केवळ हुजरेगिरीवर खूष व्हायचे, अशा अनेक तऱ्हा सध्या न्यूजपेपर इंडस्ट्रीत
रूजू लागल्या आहेत. अनेक गोष्टी मालकांना माहिती नसतात. मालकांच्या परस्परच
ही साहेब मंडळीच आपणच मालक आहोत, या रूबाबात संस्थेचे आणि कर्मचाऱ्याचे
नुकसान करू लागले आहेत. बड्या वर्तमानपत्राचे मालक व्यवसाय आणि खप दोन्हीही
घसरू लागल्याने व्याकूळ होऊन डोक्याला हात लावून बसले आहेत तर गलेलठ्ठ
पगार घेऊन संस्थेची वाट लावण्याचा विडाच या साहेब लोकांनी उचलला आहे. आता
गरज आहे ती मालक मंडळींनी डोळे उघडून निट बघण्याची. आपल्या वर्तमानपत्रात
नेमके काय चालले आहे, याची खडा न खडा माहिती घेऊन मालक मंडळींनी जर वेळीच
उपाययोजना केली नाही तर संस्था जशी रसातळाला जाणार आहे तशीच या संस्थेत
प्रामाणिकपणे काम करणारी तरूण मंडळीही निराशेच्या गर्तेत जाणार आहेत.
इंङस्ट्री प्रिंट असो की इलेक्ट्रॉनिक्स, कामाचा ताण नाहक वाढताना दिसतोय.
हा ताण वाढविणाऱ्यानीही वेळीच सावध व्हायला हवे. नाहीतर काळ कोणालाही माफ
करणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.