लाईनवर मुले मिळत नसल्याचे वृत्तपत्रांचे खप घसरले !


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेत्या मुलांना घरी पेपर टाकण्यासाठी आल्यानंतर पाणी हवे का, असे विचारा, असा संदेश जनतेला दिला आणि त्यानंतर वृत्तपत्र विक्री यंत्रणा किती गुंतागुंतीची आहे, याचा विचार बेरक्या करू लागला...
काही दिवसापूर्वी गोव्यातूनही एक बातमी समजली होती, ती अशी, गोव्यात घरोघरी जाऊन पेपर टाकण्यासाठी मुले मिळत नाहीत, त्यामुळे काही वृत्तपत्रांनी आपले डेपो चौकाचौकातून सुरू करून ज्यांना हवा असेल त्यांनी तेथून पेपर घेऊन जा, अशी विनंती वाचकांना केली आहे. महाराष्ट्रातही असा दिवस यायला फारसा वेळ लागणार नाही. सध्या वृत्तपत्र एजंटांसमोर लाईनवर अंक टाकण्यासाठी मुले मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मिळाले तरी ते फार दिवस टिकत नाहीत. एक तर त्यांना मोबदला अत्यंत अल्प असतो. शिवाय पहाटे उठून घरोघरी जाण्याचे हे कष्टाचे आणि जिकरीचे काम करण्याची अलिकडे मुलांची तयारी नाही. यापेक्षा बस स्थानकात ज्यूस किंवा पाण्याची बाटली विकली तर त्यातून त्यांना चांगला मोबदला मिळतो. त्यामुळे पेपर टाकण्याचे काम करण्यास मुले तयार होत नाहीत. सर्वच एजंट याचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे सध्या वृत्तपत्रांसमोर जसे डिजिटल आणि सोशल मीडियाचे मोठे आव्हान आहे, तसे पेपर लाईनचेही आहे. लाईनवर मुले मिळत नसल्याने एजंटांचा कल अंक वाढ करण्याऐवजी अंक कमी करण्याकडे आहे. 

याचाच परिणाम म्हणून सध्या बड्या साखळी वृत्तपत्रांनाही झपाट्याने खाली येत असलेला खपाचा आकडा रोखायचा कसा, याची चिंता आहे. चार-दोन दिवस अंक घरी आला नाही की वाचक सरळ पेपर बंद करून टाकतात. पेपर ही त्यांची आता दुय्यम गरज आहे. तो आला काय आणि नाही काय, वाचकांना फारसा फरक पडत नाही. सोशल मीडियावरून जगभरातील घडामोडी त्याच्या मोबाईवर आदळत आहेत. अगदी वर्षभरातील प्रिंटच्या खपाचा अभ्यास केला तरी आपल्याला हे सहज लक्षात येईल की आता अनेक योजना सुरू करून आणि गाड्या मोटारींच्या बक्षीसांच्या योजना देऊनही खपाचा आकडा वर सरकायलाच तयार नाही.

अंक वाढ करायला एजंटांची ना नाही. परंतु तो अंक लाईनवर टाकण्याची त्यांची समस्या मोठी आहे. आगामी काळात वृत्तपत्राच्या व्यवस्थापनालाच यावर जालीम औषध शोधून काढावे लागणार आहे. एक तर डेपो तयार करणे नाही तर एअरपोर्टवर जशा एटीएम सारख्या वृत्तपत्रांच्या मशीन्स असतात, तशा मशीन्स लावणे. मुळात नवा वाचक तयार होत नाही. वाचकाचा कल डिजिटल वृत्तपत्राकडे वाढू लागला आहे. सोशल मीडियाचे आक्रमण झपाट्याने सुरू आहे. आणि अशात आता वृत्तपत्रांच्या पारंपारिक यंत्रणा संपुष्टात येऊ लागल्या आहेत. 

सध्या एक तर अगदी स्पष्ट दिसतेय की प्रिंट मीडियाला एकाचवेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोबाईल कंपन्यांनी अगदी अल्पदरात डाटा उपलब्ध केला असल्याने आणि काहीही बघायचे असेल, वाचायचे असेल तर मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर ही गरज लगेच भागत असल्याने वृत्तपत्र हे वाचकांसाठी दुय्यम ठरू लागले आहे. याचा विचार प्रिंट मीडियातील माध्यम धुरीनांनी केला नाही तर गेल्या दहा वर्षात अनेक गोष्टी वेगाने कालबाह्य झाल्या आहेत, हे लक्षात ठेवावे.