डिजिटल मीडियाचे वारे ...

प्रिंट मीडियात नंबर 1 चा दावा करणार्‍या लोकमतचे मालक आणि मुख्य संपादक राजेंद्रबाबू दर्डा यांनी सोलापूरात काही दिवसांपुर्वी एक सत्य विधान केले आहे. येणारा काळ हा प्रिंट मीडियासाठी अवघड असून,प्रिंट मीडियाची जागा डिजीटल मीडिया घेईल असे त्यांचे विधान होते.याचाच अर्थ प्रिंट मीडियाचे दिवस भरले हे त्यांना सांगावयाचे आहे.
सन 2000 मध्ये म्हणजे सतरा वर्षापुर्वी जेव्हा मी एकमत सोडले तेव्हा टीव्ही मीडिया नव्हता.दूरदर्शन हे ऐकमेव चॅनल होते.नंतर ईटीव्ही सुरू झाला आणि टीव्ही मीडीयाचा खर्‍या अर्थाने उदय झाला.नंतर ईटीव्ही बंद पडला आणि झी 24, एबीपी माझा,आयबीएन लोकमतसह सात - आठ चॅनल सुरू झाले.यातील किती चॅनल चांगल्या पध्दतीने सुरू आहेत ? काही चॅनलची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असून,दोन चॅनल तर बंद पडण्याच्या वाटेवर आहेत.
लोकसंख्या तर वाढली आहे.वाचक पण वाढला आहे मग हा वाचक गेला कुठे ? तर याचे एकमेव उत्तर आहे- डिजिटल मीडिया...
पुर्वी वृत्तपत्र आणि पत्रकारांची मक्तेदारी होती,ती आता राहिली नाही.वाचकांना स्वतःचे मत मांडायला सोशल मीडिया पर्याय आहे.फेसबुक,टयुटर,ब्लॉग आणि व्हॉटस अ‍ॅप च्या माध्यमातून ते आपले मत जगासमोर मांडू शकतात.यु-ट्युबवर व्हिडीओ अपलोड करून जगासमोर ते येवू शकतात.आज प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात न्यूज पोर्टल सुरू झाले आहे.अनेकांनी यू ट्युब चॅनल सुरू केले आहे.यामुळे प्रस्थापित वृत्तपत्रे आणि चॅनलची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या प्रकरणाचा पर्दाफाश करू शकता.
नोटाबंदीनंतर जाहिरात व्यवसाय 30 ते 40 टक्के घटला आहे.त्यात जीएसटीमुळे वृत्तपत्रे आणि चॅनल अधिक अडचणीत आले आहेत.येत्या पाच वर्षात अनेक वृत्तपत्रे बंद पडतील.त्याची जागा ई -पेपर घेतील.
अमेरिकासारख्या प्रगत देशात आता वृत्तपत्रे छापली जात नाहीत,वाचकांना ई-पेपर वाचावा लागतो.काही ठराविक रक्कम भरून युझर नेम आणि पासवर्ड घ्यावा लागतो आणि ई- पेपर वाचता येतो.तीच पध्दत आपल्या देशात येईल.याला किमान दहा वर्षे लागतील.पण येणारा काळ प्रिंट मीडियासाठी अवघड आहे.
उस्मानाबादसारख्या ग्रामीण भागात सन 2011 मध्ये मी उस्मानाबाद लाइव्ह या ऑनलाईन न्यूज पोर्टलची सुरूवात केली होती.त्याच वर्षी सोलापूर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागात मला गेस्ट लेक्चर म्हणून मला बोलावण्यात आले होते.त्यावेळी मी येणारा काळ प्रिंट मीडियासाठी अवघड असून वृत्तपत्रांची जागा ई- पेपर घेतील,असे विधान केले होते.
http://www.dhepe.in/2011/03/
त्यावेळी माझ्या या विधानाची अनेकांनी मस्करी केली होती.काहींनी टींगल केली होती.आता टींगल करणारे तेच विधान करू लागले आहेत.
जाहिरात व्यवसाय कमी झाल्यानेे सर्वच मोठ्या वृत्तपत्रात कॉस्ट कटींग सुरू आहे.त्यात मजिठीया आयोगाचा बडगा येत असल्याने मालक मंडळी बैचेन आहे.त्यांना आता 45 वयाच्या पुढे पत्रकार नको आहे.त्यामुळे ज्यांनी 25 ते 30 वर्षे मीडियात घालवली त्यांना उतारवयात नेमके काय करावे हा प्रश्‍न पडलेला आहे.चांगले लिहिणारे अनेक संपादक आणि पत्रकार सध्या जॉब नसल्याने बसून आहेत.अनेक जुन्या पत्रकारांना हातात माऊस पण धरता येत नाही.त्यांच्यासाठी काळ अवघड आहे.
मीडीयात टिकायचे असेल तर कॉम्प्युटर.डीटीपी,पेजीनिअशन,इंटरनेट आणि सोशल मीडियाचे ज्ञान हमखास हवे.बातमी जशी चांगली लिहिता आली पाहिजे तसे आता सर्व संगणक ज्ञान पाहिजे.तरच तुम्ही या क्षेत्रात टीकाल...नाही तर तुमच्यासाठी मीडियाची दारे बंद झाली म्हणून समजा...
- सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
www.osmanabadlive.in
9420477111
7387994411


सुनील ढेपे यांचे याच विषयांवरील लेख वाचण्यासाठी क्लीक करा

पत्रकारितेचे बदलते तंत्र आणि मंत्र...  

साभार - उस्मानाबाद लाइव्ह