टीव्ही
९ मराठीवरून निखिल वागळे यांचा 'सडेतोड' कार्यक्रम बंद झाला आणि चर्चा
सुरु झाली. खरंतर अशा चर्चांमध्ये फार कुणाला रस नसतो. पण ज्यांच्या
बुडाखाली जाळ पेटलाय त्यांना मात्र आगपाखड करावीच लागते. एक विकेट पडली की
पुढचा नंबर कुणाचा, याची धास्ती लागून राहते. त्यामुळे जे घडले त्याला
तात्त्विक मतभेदांचे अधिष्ठान द्यावे लागते. उद्या न जाणो आपली वेळ आलीच तर
तेवढी ढाल सोबत असलेली बरी! एवीतेवी पदभ्रष्ट होणारच आहोत तर किमान
त्यागमूर्ती म्हणून स्वतःची प्रतिष्ठापना करायला काय हरकत आहे?
पत्रकार
निखिल वागळे यांचंही सध्या असंच काहीसं झालंय. भाजपच्या विरोधात जाणारा शो
केल्यामुळे माझा राजीनामा घेतला, असा त्यांचा दावा आहे. गोरक्षकांना आवर
घालण्यासाठी कायद्यात सुधारणा केल्या पाहिजेत का, या विषयावर त्यांनी १९
जुलैला डिबेट शो केला. यावरूनच टीव्ही ९ वर राजकीय दबाब आल्याचं सांगितलं
जातंय. पण खरंच एका दिवसात असा शो बंद करता येतो का? याचं उत्तर मिळत नाही.
'सडेतोड' टीआरपी रेटिंगमध्ये नंबर वन होता, असंही त्यांचे म्हणणे आहे. पण
चॅनलच्या म्हणण्यानुसार या शोचे रेटिंग काही खास नव्हते. त्यामुळे या
कार्यक्रमाची वेळ बदलण्यात यावी, अशी चॅनलच्या टीमची इच्छा होती. हा शो
रात्री ९ ते १० ऐवजी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत व्हावा, असे वागळेंना
सुचवले गेले होते. पण वागळेंना ते मान्य नव्हते, म्हणून रेटिंग
सुधारण्यासाठी त्यांना एक पूर्ण महिना दिला. तरीदेखील काहीच घडले नाही
म्हणून शेवटी चॅनलने आपल्या अधिकारात वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आणि
वागळेंना तसे कळवले. त्या इमेलचा स्क्रीन शॉटसुद्धा सोशल मीडियावर फिरतो
आहे. मग या सगळ्या गोंधळात तत्त्व - निष्ठा असल्या गोष्टी येतातच कुठे?
शेवटी
चॅनल म्हणा किंवा वृत्तपत्र, हे त्यांच्या मालकांचे व्यवसाय आहेत. टीआरपी
घसरला तर जाहिराती घसरतात. कोण स्वतःचे नुकसान करून घेणार? एक काळ होता
जेव्हा निखिल वागळे हे नाव बऱ्यापैकी आदराने घेतले जायचे. आयबीएन लोकमतवरचा
त्यांचा 'आजचा सवाल' गाजत होता. त्याआधीही 'आपलं महानगर' मधून त्यांनी
काही काळ गाजवला होता. पण तो भूतकाळ झाला. त्या भूतकाळाच्या जोरावर -
तेव्हाच्या प्रसिद्धीच्या बळावर त्यांचं सगळंच खरं म्हणता येणार नाही.
निखिल वागळेंनी एके काळी आक्रमक पत्रकारिता केली खरी, पण नंतर त्यांनीच
महेश मोतेवारसारख्या 'समृद्धी जीवन' चिट फंड घोटाळ्यातील आरोपीला साथ दिली.
लाखो गोरगरिबांची आयुष्यभराची पुंजी लुटून उभारलेल्या साम्राज्याचे ते
भागीदार झाले. काळ्या धंद्याच्या बचावासाठी सुरु झालेल्या 'मी मराठी'
चॅनलचे सल्लागार झाले. लोकसत्तेचे माजी संपादक व कथित ज्येष्ठ विचारवंत
म्हणून महाराष्ट्रात आदराने ज्यांचे नाव घेतले जाते, ते कुमार केतकरसुद्धा
यात सामील होते. मग तेव्हा कुठे होते यांचे आदर्श? यांची तत्व?
सामान्यांप्रती कळकळ? जमिनीपासून दोन बोटे वर चालणारे यांचे रथ असे धाडकन
आपटले त्याला सगळेच साक्षीदार आहेत? मग आत्ताच का मीडियाची पवित्रता,
निष्ठा वगैरेंचा साक्षात्कार व्हावा?
निखिल
वागळेंच्या नावावर टीआरपी मिळतो हे खरे असेल तर, महाराष्ट्र १ चे काय
झाले? ' मी मराठी'ची नौका बुडायला आली तेव्हा वागळे आणि टीम सुमडीत बाजूला
झाली. त्यांनतर वागळेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र १ चे लॉन्चिंग झाले. मग
गाजले का ते चॅनल? चार चार महिने तिथल्या कर्मचाऱ्यांना पगार नाही? टीम
लीडर म्हणून किमान त्यांना तरी दिलासा देऊ शकले का हे तथाकथित निर्भिड -
आक्रमक व्यक्तिमत्त्व? थकीत पगारासाठी न्यायालयाचे दार ठोठावणाऱ्या
कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणेही यांना जमले नाही. मग आत्ताच
कशाला पत्रकारितेचा - पत्रकारांचा पुळका आलाय?
म्हणे
विचारांची - अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतेय! अरे कसले आलंय
स्वातंत्र्य? कसले विचार? तळागाळातल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा आव
आणणाऱ्या पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, कुणी माई का लाल
आहे का इथे? स्वतःला श्रेष्ठ समजणारे सगळेच ज्येष्ठ - श्रेष्ठ पत्रकार,
मालकांच्या दावणीला बांधलेले. पॅकेज आणि ग्रुपिझमच्या नादात यांनीच
पत्रकारिता विकायला काढली. मग मालक बदलले - त्यांच्या निष्ठा बदलल्या तर
तुम्हालाही बदलले जाणारच ना? पत्रकारितेपेक्षा पैसा महत्वाचा ठरल्यावर एवढा
बदल तर होणारच. तुमच्या फुकटच्या फेसबुक वॉलवर कुणी विरोधी सूर लावून धरला
तर तुम्ही त्याला ब्लॉक करता. मग ज्या मालकाने लाखो - करोडोंची गुंतवणूक
केलीय तो स्वतःचेच विचार - हितसंबंध पुढे आणणार ना? तुमच्या विचारांचा -
तुमच्या दैवतांच्या 'सत्यनारायण पूजे'चा खर्च ते कशाला करतील?
कालपर्यंत
काँग्रेसच्या हातात सत्ता होती म्हणून हिंदुत्ववाद्यांना झोडपून काढणे,
यालाच निर्भीड पत्रकारिता ठरविले गेले. आज जिकडे तिकडे संघाच्या लोकांची
भरती होतेय, हा यांचा आक्षेप. पण कालपर्यंत संघ विचारांच्या लोकांना -
सावरकर - हिंदुत्त्ववाद्यांना परिघाबाहेर ठेवण्यात तुम्हीच पुढे होतात,
त्याचं काय? 'भारत तेरे तुकडे होंगे' म्हणणारा कन्हैयाकुमार चालतो, याकूब
मेमन न्यायालयात दोषी सिद्ध होऊनसुद्धा त्याच्यासाठी अश्रू ढाळले जातात. पण
सनातनवर विनाचौकशी बंदीची मागणी होते. साध्वी प्रज्ञा सिंग निर्दोष सिद्ध
झाली तरी हिंदू दहशतवादीच असते, अशी यांची पत्रकारिता. यांचे 'डिबेट शो'
म्हणजे सुद्धा विनोदच असतो. आपल्याच विचारांना रेटत बसायचं, विरोधात
नाममात्र कुणाला तरी बोलावून त्याची मुस्कटदाबी करायची, यालाच का चर्चा -
वादविवाद म्हणायचं? 'सनातन'च्या समीर गायकवाडवर चार्जशीट दाखल झाली म्हणून,
संपूर्ण सनातन संस्था गुन्हेगार. पण 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन
समितीच्या आर्थिक व्यवहारांवर चौकशी लागली. मृत माणसांच्या नावावर देणग्या -
खर्च दिल्याचे ताशेरे ओढले गेले. धर्मादाय आयुक्तांनी विरोधकांचे आरोप
मान्य केले', तरीही ते निर्दोष - स्वच्छ अशी सरसकट वर्गवारी.
'शितावरून
भाताची परीक्षा' वगैरे म्हणायला ठीक आहे. पण प्रत्यक्षात सगळेच वाईट किंवा
सगळंच चांगलं असं काही प्रत्यक्षात नसतंच, याचंही यांना भान राहिलं नाही.
'खरं ते माझं' म्हणता म्हणता, ही मंडळी 'माझं ते खरं' मोडवर पोहोचली आणि
तिथेच यांच्याच नव्हे तर पत्रकारितेच्या विश्वासार्हतेच्या अध:पतनाला
सुरवात झाली. ३५ - ४० वर्षे एकाच बाजूची तळी उचलल्यानंतर, आज एकाएकी
अनपेक्षित सत्ताबदल झाल्याने यांच्या नशिबाचे वासे फिरले, त्याला दुसरे कोण
काय करणार? आधीच एकाच बाजूची तळी न उचलता संयत राहिला असता, तर कशाला ही
वेळ आली असती? पॅकेज थोडे कमी मिळाले असते कदाचित पण जनमानसातील प्रतिमा
तरी कायम राहिली असती.
उन्मेष गुजराथी