बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार आणि सामजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची बेंगळुरूत निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बंगळुरुतील राहत्या घराबाहेर त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या.
55 वर्षीय गौरी लंकेश बंगळुरुतील राजराजेश्वरी नगरमध्ये राहत होत्या. मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास तिघा आरोपींनी त्यांना घराबाहेर बोलावलं. त्यांच्यासोबत झालेल्या वादावादीनंतर आरोपींनी गौरी यांच्यावर गोळ्या झाडून पोबारा केला.मारेकऱ्यांनी गौरी लंकेश यांच्यावर 50 मीटर अंतरावरुन सात गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, गौरी यांच्यावर हल्ला करणारे कोण होते आणि कोणत्या कारणासाठी त्यांची हत्या करण्यात आली याबाबत अद्याप कोणतीच माहिती पुढे येऊ शकलेली नाही.गौरी लंकेश या साप्ताहिक 'लंकेश पत्रिका'च्या संपादिका होत्या. विविध वर्तमानपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करायच्या. न्यूज चॅनेल्सवर प्राइम टाइममध्ये होणाऱ्या विविध चर्चेच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असायचा.कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.
गौरी यांच्याविरोधात गेल्यावर्षी मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता.
2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली.
2015 मध्ये ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचीही धारवाडमध्ये राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या या दुसऱ्या हत्याकांडाने राज्यात खळबळ माजली आहे.