लाहोर : डेली नयी खबर आणि मेट्रो न्यूज टीव्ही चॅनलसाठी काम करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकार झीनत शहजादी (वय २६ ) हिची पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवरुन गुरुवारी रात्री तिची सुटका करण्यात आली. ठावठिकाणा लागत नसलेल्या भारतीय इंजिनिअरच्या केसवर काम करताना झीनत शहजादी बेपत्ता झाली होती.
गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानातील झीनत शहजादी ही महिला पत्रकार
बेपत्ता होती. तिला पाकिस्तानात परत आणले गेल्याची माहिती समोर आली आहे. ती
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर दिसली. त्यानंतर झीनतला पाकिस्तानात
आणले गेले. १९ ऑगस्ट २०१५ रोजी झीनतचे कथित अपहरण झाल्याची माहिती समोर
आली होती असे न्यायमूर्ती जावेद इकबाल यांनी ‘बीबीसी उर्दू’ला दिलेल्या
मुलाखतीत सांगितले. झीनत नेमकी कुठे होती ते अद्याप समजू शकलेले नाही.
इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे.हमीद अन्सारी हा भारतीय इंजिनिअर नोव्हेंबर 2012 मध्ये बेपत्ता झाला होता.
त्याच्या केसवर झीनत काम करत होती. याच कारणामुळे तिचं अपहरण झाल्याचा संशय
होता.
पाकिस्तानात निहाल हमीद अन्सारी हा भारतीय अभियंता काम करत होता.
त्याच्याबाबत झीनत माहिती मिळवत होती. तसेच त्याच्या कुटुंबाला मदत करत
होती. २०१५ मध्ये पाकिस्तानी सैन्याने निहालला रॉ या भारतीय गुप्तहेर
संघटनेचा एजंट ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच वर्षात ऑगस्ट
महिन्यात झीनत गायब झाली जी थेट आत्ता सापडली आहे. झीनतने हमीद अन्सारीची
आई फौजिया अन्सारीची भेट घेतली होती आणि त्यांच्यातर्फे हमीदच्या
शिक्षेविरोधात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
नेमक्या याच घटनेनंतर झीनत अचानक गायब झाली होती. तिच्या बेपत्ता
होण्याने तिचे कुटुंबही चिंतेत होते. झीनतच्या भावाने माजी पंतप्रधान नवाझ
शरीफ यांच्याकडेही झीनतला शोधण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती.
भारतीय अभियंत्याच्या कुटुंबाची मदत करणे माझ्या बहिणीला महागात पडले अशी
प्रतिक्रिया झीनतचा भाऊ सलमान लतीफने दिली.माझी बहिण झीनत ही फक्त निहालची
मदत करू इच्छित होती. तिने कोणताही अपराध किंवा गुन्हा केलेला नाही, असेही
सलमान लतीफने म्हटले आहे.
झीनत गायब होणे किंवा कथित रूपाने तिचे अपहरण होणे लज्जास्पद आहे अशी
प्रतिक्रिया मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या हिना जिलानी यांनी
दिली आहे. २४ वर्षांची महिला बेपत्ता कशी काय होऊ शकते? महिलांना गायब
करण्याचा ही कोणती पद्धत आहे ? तिला का गायब करण्यात आले याची माहिती समोर
आलीच पाहिजे अशीही मागणी हिना यांनी केली. हमीदला हेरगिरी केल्याच्या
आरोपावरून अटक करण्यात आली होती. तर झीनत शहजादीचा १७ वर्षांचा भाऊ सद्दाम
याने २०१६ मध्ये आत्महत्या केली होती. २०१५ मध्ये जेव्हा झीनत बेपत्ता झाली
तेव्हा पाकिस्तानात या प्रकरणाची चर्चा खूपच रंगली होती.