नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात एका पत्रकाराच्या आई आणि छोट्या मुलीचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे उपराजधानी नागपुरात तसेच राज्यातील पत्रकारांत प्रचंड खळबळ उडाली आहे.
नागपूर टुडे वेब पोर्टलचे क्राईम रिपोर्टर रविकांत कांबळे यांची 54 वर्षीय आई आणि दीड वर्षीय मुलगी शनिवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास पायातील पैजण घेण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या. तेव्हापासून नात आणि आजी बेपत्ता होता. रात्रीपासून कुटूंबियांनी दोघींचाही शोध सुरू केला होता. रविवारी सकाळी फिरायला जाणाऱ्यांना बहादुरा येथील संजुबा शाळेमागील भागातून जाणाऱ्या नाल्यात दोन पोती बेवारस अवस्थेत आढळली. पोत्याच्या आकारावरून शंका निर्माण झाली. यामुळे पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पोते उघडले असता, आजी आणि नातीचे मृतदेहच आढळले.कांबळे कुटूंबियांनी जाऊन बघितले असता दोघींचीही ओळख पटली. आरोपींनी दिघोरी परीसरातून दोघींचे अपहरण केले असावे, त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन त्यांची हत्या केली आणि मृतदेह पोत्यात भरून नाल्यात टाकून दिले. दोघींचाही गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शीनी दिसून येत आहे. हुडकेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या घटनेने संपूर्ण नागपुरात तसेच राज्यातील पत्रकारांत प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेचा अनेक पत्रकार तसेच विविध पत्रकार संघटनेने निषेध केला आहे.
नागपूर टुडे वेब पोर्टलचे क्राईम रिपोर्टर रविकांत कांबळे निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जात होते. बातमी दिल्याच्या कारणावरून त्यांच्या आई आणि मुलीची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान,मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे