स्टिंग ऑपरेशन’ने फुटले बिंग, जातीयवादी वार्तांकनासाठी माध्यमांची ‘डील'

नवी दिल्ली  'कोब्रापोस्ट' या शोधपत्रकारिता करणाऱ्या समुहाच्या एका स्टिंग ऑपरेशनमुळे भारतातील प्रसारमाध्यमांमधील गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. जातीयवादी वार्तांकनासाठी देशातील ख्यातनाम १७ वृत्तवाहिन्या व वृत्तपत्र समुहाच्या अधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली. माध्यमांमधील 'कॅश फॉर न्यूज'च्या स्टिंग ऑपरेशनमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. इंडिया टीव्ही, डीएनए, दैनिक जागरण, अमर उजाला आणि स्कूपव्हूप अशा दिग्गज कंपन्याचे प्रतिनिधी या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले आहेत.




कोब्रापोस्टने 'ऑपरेशन १३६' हे स्टिंग ऑपरेशन हाती घेतले होते. सोमवारी कोब्रापोस्टने हे स्टिंग ऑपरेशन प्रसारित केले. यात पत्रकार पुष्प शर्मा यांनी आचार्य अटल या नावाने विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र समुहातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अटल यांनी त्यांचा संबंध उज्जैनमधील एका आश्रमाशी असल्याचे सांगितले होते.

'स्टिंग ऑपरेशनमध्ये १७ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी 'मवाळ हिंदुत्वा'चा मुद्दा रेटण्याची तयारी दर्शवली. पैसे घेऊन तशा बातम्या देण्याची ऑफर त्यांनी स्वीकारली. विशेष म्हणजे या व्यवहाराची पावती मात्र दिली जाणार नव्हती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती, भाजपा नेते अरुण जेटली, मनोज सिन्हा, जयंत सिन्हा, मनेका गांधी आणि वरुण गांधी यांची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याची तयारीही या मंडळींनी दर्शवली. कोब्रापोस्टच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकलेले सर्व अधिकारी हे कंपनीत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे या स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ उडाली.

या कंपन्या अडचणीत
डीएनए, दैनिक जागरण, अमर उजाला, इंडिया टीव्ही, स्कूपव्हूप, प्राईम, पंजाब केसरी, यूएनआय न्यूज, ९ एक्स टशन, समाचार प्लस, आज हिंदी डेली, स्वतंत्र भारत, इंडिया वॉच, एचएनएच २४ बाय ७, रेडिफ डॉटकॉम, सब टीव्ही, हिंदी खबर