हैदराबाद - तेलंगाणामधील सिद्दीपेट जिल्हयात एका
तेलगू वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकाराने कर्जाला कंटाळून आपल्याच दोन
चिमुरड्यांना गळा आवळून ठार केले व त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली
आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीनेही विष प्राशन करून आयुष्य संपवण्याचा
प्रयत्न केला. मात्र तिला वाचवण्यात आले आहे. हनुमंत राव (३५) असे या
पत्रकाराचे नाव आहे. तर मीना (३०) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.
हनुमंत एका स्थानिक तेलगू वृतपत्रात काम
करत होता. पत्नी व दोन मुलं असे त्याचे सुखी कुटुंब होते. पण पगार पुरत
नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असे. यामुळे त्याने अनेकांकडून उसने
पैसे घेतले होते. कर्जाचा हा आकडा १० लाखापर्यंत पोहोचला होता. दिलेली मुदत
उलटून गेल्याने कर्जदारांनी हनुमंतच्या मागे पैशासाठी तगादा लावला होता.
यामुळे तो निराश झाला होता. एवढे पैसे आणायचे कुठुन या विचाराने त्याची झोप
उडाली होती. आपली ही अडचण त्याने पत्नीला सांगितली. त्यानंतर दोघांनी
आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. पण आपल्यामागे मुलांचे हाल होतील या
विचाराने त्यांनी मुलांनाही संपवण्याचे ठरवले. बुधवारी रात्री हनुमंत व
त्याच्या पत्नीने आपल्या ५ व ३ वर्षांच्या मुलांची झोपेतच गळा दाबून हत्या
केली. मुलांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर हनुमंतने घराच्या
पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर मीनानेही विष
प्राशन केले.
गुरुवारी सकाळी शेजाऱ्यांनी त्यांचा
दरवाजा ठोठावला असता आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी
दरवाजा तोडला व घरात प्रवेश केला.आतले दृश्य बघून सगळ्यांनाच धक्का बसला.
बेडवर दोघा मुलांचा निष्प्राण देह पडला होता. तर पंख्याला हनुमंतचा मृतदेह
लटकत असल्याचे बघून शेजाऱ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. मीनाही बेडवर
अत्यवस्थ अवस्थेत पडली होती. ती जिवंत असल्याचे बघून शेजाऱ्यांनी तिला
तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असून डॉक्टर तिला
वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
सौजन्य - सामना
सौजन्य - सामना