सानप यांना निलंबित न केल्यास आमरण उपोषण


लोकपत्रिका संपादिका शिला उंबरे यांनी 
जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले 

उस्मानाबाद - उस्मानाबादचे वादग्रस्त जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना निलंबित करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी लोकपत्रिकाच्या संपादिका शिला उंबरे यांनी केली आहे. सानप यांना निलंबित न केल्यास लातूरच्या माहिती उपसंचालक कार्यालयासमोर 9 जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही उंबरे यांनी दिला आहे.
सानप यांच्यावर नुकताच तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, वर्षभरापूर्वी सहकारी महिलेस त्रास दिल्याप्रकरणी उस्मानाबादेतील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहे.
सानप यांनी बळीराजा चेतना अभियानमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, तसेच शासकीय खरेदी, कंत्राटी कामगार नियुक्तीमध्ये उखळ पांढरे करून घेतले आहे. सानप यांनी काय आणि कसा भ्रष्टाचार केला याचा पाढाच उंबरे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, माहिती महासंचालक,उपसंचालक यांना दिलेल्या निवेदनात वाचला आहे.
सानप यांच्या भ्रष्टाचाराकडे वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणीही उंबरे यांनी केली आहे.