खंडणी प्रकरणी 4 बोगस पत्रकारांवर गुन्हा

नांदेड -खंडणी मागितल्या प्रकरणी नांदेड येथील 4 बोगस पत्रकारांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचा अपंग निधी का खर्च केला नाही? सरपंच महिला गावात न राहता परभणी येथे जिल्ह्याच्या ठिकाणी का राहतात? असे प्रश्न विचारून ही बातमी ‘जनमत’ चॅनेलवर न दाखविण्यासाठी 10 हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या घटनेने ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.

सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चँनलवर बातमी दाखविण्याची स्पर्धा लागली आहे. असाच प्रकार ताडकळस पासून जवळच असलेल्या माखणी गावात घडला. मंगळवारी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास एका महागड्या चारचाकी वाहनातून सुटा-बुटातील एक तरुण व सोबत सुशिक्षित असलेली तरुणी व अन्य एक जण गावात आले. त्यांनी गावातील काही व्यक्तींना येथील सरपंच कोण आहेत? असा प्रश्न विचारून मोबाईल नंबर घेतला. लगेच सरपंचाच्या पतीला फोन लावून ‘आम्हाला तुमच्या गावातील विकास कामांची माहिती पाहिजे’ असे सांगितले. गावातील विकास कामांची माहिती एका बंद खोलीत कॅमेऱ्यात कैद करून तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला आलेला अंपगाचा निधी का खर्च केला नाही? तसेच गावच्या सरपंच परभणी येथे जिल्ह्याच्या ठिकाणी का राहतात? असे प्रश्न विचारून ही बातमी चॅनेलवर दाखवण्याची धमकी दिली. तसेच ही बातमी चँनलवर दाखवायची नसेल तर 10 हजार रुपयांचे पॉकेट कारचालकाकडे देऊन टाका असे सांगितले. या बोगस पत्रकारांच्या बोलण्यात एकवाक्यता नव्हती. त्यामुळे शंका आली.

माखणीच्या महिला सरपंचाचे पती अंकुशराव आवरगंड यांनी पैसे देतो परंतु परभणीला चला, असे त्यांना सांगितले. ताडकळस मार्गे परभणीला यावे लागत असल्याने ताडकळसला येताच अंकुश अवरगंड यांनी या चारही बोगस या चॅनलच्या पत्रकारांना थेट ताडकळस पोलीस ठाण्यात आणून झालेली सर्व माहिती पोलिसांना सांगितली. अखेर रात्री उशिरा अंकुश गणपतराव आवरगंड यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात आरोपी राजेश पुंडलिकराव जोंधळे (मराठवाडा ब्युरो चीफ, जनमत चॅनल), मनिषा बालाजी गंदलवार (रा:पेनुर ता.लोहा .जि. नांदेड,) विक्रम एकनाथराव वाघमारे (रा: बळीरामपुर एम.आय.डि.सी.नांदेड) शिवशंकर रमाकांत हिंगणे (रा. बसवेश्वर नगर सिडको नांदेड) यांच्या विरुद्ध कलम 385,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार 26 सप्टेंबर रोजी पूर्णा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली व त्यानंतर जामिनावर सुटका केली.

दरम्यान, याच बोगस चॅनल पत्रकारांविरुद्ध अशीच तक्रार मिरखेल येथील सरपंच विजय कणकुटे व उपसरपंच नागनाथ देशमुख यांनी देखील दिली आहे. परंतु या तक्रारीचा गुन्हा दाखल झाला नाही. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार तेलंग हे करीत आहेत.

गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी
महागड्या नव्या-कोऱ्या कार मध्ये गावात गेल्यानंतर हे बोगस चॅनल पत्रकार आम्ही थेट केंद्र सरकारच्या आदेशावरुन गावातील विकास कामे तपासायला आलो आहोत, असे सांगायचे. केंद्र सरकारने आम्हाला या भागातील काही गावे निवडून दिली आहेत. त्या गावातील सर्व विकास कामे तपासून केंद्र सरकारला अहवाल सादर करायचा आहे आणि त्याची जनमत दिल्ली या चॅनलवर बातमीपण लावायची आहे, अशी बतावणी ते करायचे. सरपंच नाही भेटल्यास गावातील रेशन दुकानदार हे शोधायचे. रेशन दुकानदार नाही भेटल्यास त्या गावातील शाळेचा मुख्याध्यापक शोधून त्याच्याकडून मलीदा लाटायचे. ताडकळस परिसरातील अनेक गावात आता या बोगस चॅनल पत्रकाराने आपणास कसे फसवले? याच्या कथा रंगत आहेत.

सौजन्य - दैनिक सामना