‘डिजिटल पुरस्कारां’मध्ये पुन्हा ‘सकाळ’च नंबर वन

हैदराबाद - वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स’ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस’मध्ये ‘सकाळ’, ‘सरकारनामा’ आणि ‘ॲग्रोवन’ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये ‘सकाळ माध्यम समूह’ दक्षिण आशियात सलग दुसऱ्या वर्षी अग्रेसर ठरला आहे. प्रिंट माध्यमांमध्ये अव्वल असलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’ने आता या पुरस्कारांसह डिजिटल माध्यमांमध्येही आपला निर्विवाद ठसा उमटविला आहे.
‘सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप’साठीचा पुरस्कार ‘ॲग्रोवन’चे मोबाईल ॲप्लिकेशन आणि ‘सरकारनामा’ या संकेतस्थळाला मिळाला. उत्कृष्ट छपाईसाठी ‘सकाळ’ला हा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे छपाईच्या दर्जासाठी ‘सकाळ’ला आतापर्यंत तीनदा हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी देशातून ५७ वृत्तपत्रांचा समावेश होता.
हैदराबादमध्ये सुरू असलेल्या ‘वॅन-इफ्रा इंडिया’ परिषदेत झालेल्या सोहळ्यात ‘वॅन-इफ्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट पेरेग्ने आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅनफ्रेड वेअरफेल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘सकाळ माध्यम समूहा’चे संचालक भाऊसाहेब पाटील, संपादक संचालक श्रीराम पवार, पुणे आवृत्तीचे मुख्य बातमीदार संभाजी पाटील, मुख्य आर्टिस्ट सुहास कद्रे, निर्मिती व्यवस्थापक बाळासाहेब मुजुमले, मुख्य निर्मिती व्यवस्थापक (क्वालिटी कंट्रोल) जयेश गायकवाड, सिनिअर मॅनेजर (ऑपरेशन) नीलम कामठे यांनी पुरस्कार स्वीकारले.
‘ॲग्रोवन’च्या अनोख्या मोबाईल ॲप्लिकेशनमुळे शेतकऱ्यांपर्यंत कृषिक्षेत्र, बाजारभाव, नवे प्रयोग अशा विविध प्रकारची महत्त्वाची माहिती पोचते. ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील बित्तंबातमी देणारे विश्वासार्ह संकेतस्थळ,’ अशी www.sarkarnama.in ची अल्पावधीतच ओळख निर्माण झाली आहे. 

तिसऱ्यांदा मान!
या पुरस्कारामुळे जगभरातील उत्कृष्ट छपाई करणाऱ्या वृत्तपत्रांच्या समूहात ‘सकाळ’चा समावेश झाला आहे. यापूर्वी दोन वेळा ‘सकाळ’ने हा पुरस्कार पटकाविला आहे. जगभरातून २० देशांतील १२१ वृत्तपत्रांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. प्रादेशिक भाषेत ‘सकाळ’ने हा मानाचा पुरस्कार मिळविला. तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये ‘सकाळ माध्यम समूह’ नेहमीच अग्रेसर आहे. आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वालिटी क्‍लब २०१८ ते २०२० या वर्षांसाठी २० देशांतील ६७ प्रकाशनांच्या ५४ वृत्तपत्रांनी हा मानाचा पुरस्कार मिळविला. या वृत्तपत्रांना आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वालिटी क्‍लबचे दोन वर्षांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले.

परिसंवादातही छाप
‘वृत्तपत्र व्यवसायामधील संपादकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक विभागांमधील समन्वय’ या विषयावर आज ‘वॅन इफ्रा’च्या परिषदेमध्ये परिसंवाद झाला. या परिसंवादात ‘सकाळ माध्यम समूहा’चे संचालक संपादक श्रीराम पवार, ‘द हिंदू’चे संपादक मुकुंद पद्मनाभन, ‘जागरण’चे कार्यकारी संचालक संदीप गुप्ता, ‘हिंदुस्तान टाइम्स’चे कार्यकारी संचालक (निर्मिती) शरद सक्‍सेना सहभागी झाले होते.