वृत्तपत्राची जागा ईपेपर घेणार - सुनील ढेपे

पुणे - येत्या काळात वृत्तपत्राची जागा ईपेपर घेतील तर अँप, युट्युबच्या माध्यमातून अनेक मराठी चॅनल सुरु होतील. त्याचा प्लॅटफॉर्म डिजिटल राहील, असे  मत ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांनी येथे व्यक्त केले.

पुण्यात कॅलिड्स  मीडिया अकॅडमी येथे आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल मीडिया कार्यशाळेत ते बोलत होते.

कागदाचे वाढलेले भाव, कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या  पगारी, होणारा प्रचंड खर्च पाहिला तर वृत्तपत्र चालवणे कठीण झाले आहे. अनेक मोठ्या वृत्तपत्रांना पेजेसची संख्या कमी करावी लागली. येत्या काळात अनेक वृत्तपत्रे बंद पडतील. त्याची जागा ईपेपर घेतील. ईपेपर सध्या फुकट वाचण्यास मिळत असले तरी  भविष्यात ईपेपर वाचण्यासाठी युझर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल आणि लोकांना पैसे मोजावे लागतील. आजची बातमी आजच आणि आताच यामुळे वृत्तपत्र वाचण्याचा कल हळूहळू कमी होत आहे. त्यासाठी वेगळा कंटेंट द्यावा लागेल. असेही ढेपे  म्हणाले.

न्यूज चॅनलचे भविष्य कठीण आहे. येत्या काळात जियो अँपवर अनेक चॅनल प्रक्षेपित होतील. जियो गीगा फाइबरमुळे हे चॅनल घरोघरी टीव्हीवर दिसतील. युट्युब टीव्हीवर दिसेल. त्यामुळे कमी खर्चात अनेक चॅनल सुरु होतील. त्यामुळे काही तरी नवीन दिले तरच लोक न्यूज चॅनल पाहतील, असेही ते म्हणाले.

येणारा काळ केवळ डिजिटल मीडियाचा राहणार आहे. पत्रकारितेत नव्याने येणाऱ्या प्रत्येक तरुणांना डिजिटल मीडियाचे ज्ञान असायला हवे. तसेच जुन्या पत्रकारांनी स्वतःला अपडेट करायला हवे अन्यथा जुन्या पत्रकारांना प्रवाहाच्या बाहेर राहावे लागेल.असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

पत्रकारितेत येणाऱ्या तरुण पिढीला प्रशिक्षित करण्यासाठी येत्या काळात राज्यभरातील प्रमुख शहरात डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात  येणार असल्याचेही ढेपे यांनी शेवटी सांगितले.
अधिक बातमी वाचा