ओफ्फ...समय समाप्ती की घोषणा !

डिजिटल मीडियात 'बाप माणूस' असलेल्या शेखर पाटील यांनी, दैनिक 'जनशक्ती'ला रामराम ठोकला आहे. यापुढे कोणत्याही पेपरचे काम न करता डिजिटल मीडियात काम करण्याचा निर्णय त्यांनी
घेतला आहे.
शेखर पाटील यांनी जनशक्तीचा राजीनामा का दिला हे स्पष्ट केलेले नाही. मात्र जनशक्ती पेपरला सध्या घरघर लागलेली आहे. पुणे आवृत्ती बंद करण्यात आली आहे, तर मुंबई आवृत्ती सलाईनवर आहे. जळगाव आवृत्ती त्यातल्या त्यात बरी होती तर मुख्य कणा मोडून पडला आहे.
गेले अनेक महिने झाले, जनशक्त्ती कर्मचाऱ्यांच्या पगारी नाहीत. त्यामुळे विक्रांत पाटील ( मुंबई ) , पुरुषोत्तम सांगळे ( पुणे, पिंपरी चिंचवड ) पाठोपाठ आता मुख्य संपादक शेखर पाटील ( जळगाव ) हे जनशक्तीतून  बाहेर पडले आहेत. आता जनशक्तीने गाशा गुंडाळल्यास आश्चर्य वाटू नये ...

शेखर पाटील यांनी जनशक्तीचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट ... 

ओफ्फ...समय समाप्ती की घोषणा !

नमस्कार मित्रांनो, दैनिक जनशक्तिसोबतचा प्रवास आता थांबलाय. शरीराने बाहेर गेलो तरी हृदयाने या परिवाराच्या सोबत राहणार असून यासाठी कोणताही दाखला देण्याची गरज नाहीच. गेल्या १० वर्षात मी अनेकदा सार्वजनीक व्यासपीठांवरून अथवा माझ्या लिखाणातून एक संकल्प वारंवार रिपीट करत होतो. तो म्हणजे, १ जानेवारी २०२० या रोजी मी पूर्णपणे डिजीटल माध्यमात काम करत असेल. मात्र १५ महिन्यांपूर्वीच याला प्रारंभ झाल्याची बाब मला विस्मयकारक वाटते. अत्याधुनीक तंत्रज्ञानाने प्रसारमाध्यमांना व खर तर आपल्या संपूर्ण जीवनालाच ज्या प्रचंड गतीने बदललेय त्यातून 'स्कील्ड' अर्थात टेक्नॉलॉजी+लिखाण/संवाद कौशल्य या क्षेत्रांमध्ये पारंगत असणार्‍यांसाठी अमर्याद संधीचे एक खुले आकाश अस्तित्वात आल्याचे आपण सर्वच जण अनुभवत आहोत. ग्लोबल अ‍ॅक्सेससाठी डिजीटल तर मॉनेटायझेशनसाठी फिजीटल (फिजीकल+डिजीटल) मॉड्युलचा अवलंब हा यशाचा मूलमंत्र असल्याची खुणगाठ मी कधीच बांधली होती. यातून स्वतंत्र मार्ग चोखाळण्याचे धाडस आले. अर्थात यातूनच हा निर्णय मी घेतला.

आपल्या सर्वांच्या मनात असणार्‍या प्रश्‍नाचे उत्तर मी आधीच देऊन टाकतो...ते म्हणजे मी कोणत्याही नवीन ठिकाणी संपादक वा तत्सम पदावर रूजू होत नाहीय. मला आयुष्यात मल्टी-टास्कींगचा खूप लाभ झालाय. यामुळे आता मी यापासूनच प्रेरणा घेऊन 'मल्टी-लेअर करियर'चा अंगिकार करत आहे. यामध्ये कार्पोरेट, पर्सनल, पॉलिटीकल आणि सोशल या चार घटकांचा समावेश आहे. एक टेक्नोक्रॅट म्हणून काम करण्याची संधी मला कार्पोरेट क्षेत्रातून मिळाली आहे. यात एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या मराठीशी संबंधीत प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. तर एका स्थानिक कंपनीला डिजीटल पीआरबाबत मार्गदर्शकाची भूमिकादेखील बजावणार आहे. पर्सनलचा विचार केला असता, टेकवार्ताच्या जोडीला अन्य काही पोर्टल्स तयार झालेली असून याबाबत येत्या काही दिवसांमध्ये अधिकृत घोषणा करणार आहे. तर जळगावातील काही मान्यवरांसोबत 'अतिशय हटके' असे डिजीटल प्रोजेक्टदेखील करत आहे. यात माझी भूमिका ही मार्गदर्शक (मेन्टॉर) म्हणजेच संबंधीत प्रोजेक्ट सक्सेसफुली रन करण्याच्या जबाबदारीची आहे. डिजीटल पॉलिटिकल कँपेनिंगची थेट तसेच सब कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातील कामेदेखील करत आहे. सर्वात शेवटी सोशल अर्थात सामाजिक कामे ! मला आवडणार्‍या आणि प्रेरणादायी ठरणार्‍या व्यक्ती आणि विचार यांना डिजीटल मंचावर आणण्याचे कामदेखील मी करणार आहे. हा समाजाच्या ऋणातुन उतराई होण्याचा मार्ग असून माझ्यापुरता मर्यादीत प्रमाणातील सीएसआर आहे. 

या सर्वांसाठी मी आधी बॅकएंड मजबूत केले. विविध क्षेत्रांमधील मित्रांशी सल्ला-मसलत केली. सर्वात महत्वाचे म्हणजे कुटुंबियांनी यासाठी तात्काळ होकार दिला. जनशक्तिचे मालक कुंदन ढाके हे कधीही मालक वाटले नाहीत. याबाबत मी खूप भाग्यवान ! देशदूतचे संपादक दिवंगत सुभाष सोनवणे साहेब व साईमतचे संपादक/मालक प्रमोद बर्‍हाटे यांच्याप्रमाणे कुंदन ढाके यांच्याकडूनही भरभरून स्नेह मिळाला. इतर सर्वच सहकार्‍यांची नावे येथे घेता येणार नाहीत. मात्र माझी त्यांच्यासोबतची वागणूक अशी होती की ना ते मला विसरतील ना मी त्यांना ! पण जीवनातील काही निर्णय आपण टाळू शकत नाही. एखादा पक्षी हवेतून विहार करतांना कोणतीही पदचिन्हे सोडत नाही; वा पाण्यावर कुणीही स्वाक्षरी करू शकत नाही. याप्रमाणे अगदी शांतपणे कोणत्याही संस्थेतून निघण्याचा शिरस्ता मी कायम पाळला आहे. मात्र मी काम केलेल्या ठिकाणचे ऋणानुबंध इतके मजबूत आहेत, की काळाचे अनेक आघातदेखील याचे काहीही बिघडवू शकत नाही. याचमुळे देशदूत व साईमतप्रमाणे जनशक्ति परिवारातील सर्व घटकांशी असणारे संबंध तहयात कायम राहतील याची मला खात्री आहे.

मित्रांनो...व विशेष करून पत्रकार मित्रांनो, आपल्या क्षेत्रातील बदल जाणीवपूर्वक अनुभवा. आज एखाद्या गावातील दुकानदाराचा स्पर्धक हा त्याच्या शेजारचा दुकानदार नव्हे तर त्यांच्यापेक्षा किफायतशीर दरात घरपोच माल पोहचवणार्‍या ई-कॉमर्स कंपन्या आहेत. याचप्रमाणे पत्रकाराचा स्पर्धक हा दुसर्‍या वर्तमानपत्र वा चॅनलमधील पत्रकार नसून टेक कंपन्या असल्याची बाब जाणून घ्या. तंत्रज्ञानाचा बाऊ न करता या लाटेवर स्वार झाल्यास यातून आपण यातूनही संधी साधू शकतो. मी स्वत: याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. आपल्या शुभेच्छा आणि माझी पॅशन यांच्यामुळे या लाटेवर मी नक्कीच स्वार होणार हा आत्मविश्‍वास आहेच. आपणा कुणालाही डिजीटल तंत्रज्ञान वा त्याच्याशी संबंधीत प्रोजेक्टबाबत कोणतीही माहिती आणि तीदेखील मोफत पाहिजे असल्यास मी माझ्या संपर्काचे डिटेल्स देत आहे. पुनश्‍च आपणा सर्वांचे आभार. येत्या काही दिवसांमध्ये माझ्या आगामी वाटचालीची माहिती आपल्यासमोर येईलच. तोवर थोडा इंतजार का मजा लिजीये !

आपला नम्र
शेखर पाटील
जळगाव
सेलफोन-९२२६२१७७७०
ई-मेल :- shekhar@shekharpatil.com