निखिल वागळे.खरं तर
सिर्फ नाम ही काफी है,असं ज्याच्या बाबतीत हमखास म्हणता येईल असा
पत्रकारितेतील राडा माणूस.खमक्या धमक्या असं सर्वकाही.'साधने'त घडलेला,जेपी
आंदोलनात वाढलेला,शिवसेनेशी भिडलेला आणि 'महानगरा'त ( की महानगर 'ने' ? )
बिघडलेला असा हा 'तसा'सर्वार्थाने अवलिया पत्रकार.पंगा हा त्याचा
स्थायीभाव.त्यांची मते आणि भूमिका बरोबर असोत की चूक निखिल वागळे त्यावर
ठाम असतात.आणि त्यांच्या मते त्यांचेच मत अचूक आणि बरोबर असते.असे असूनही
ते विचारी लोकशाहीवादी,व्यक्ती अभिव्यक्ती आणि विचारस्वातंत्र्यवादी वगैरे
आहेत.म्हंजे स्वतःला तसे मानतात .( कमालच आहे साली !)
निखिल
वागळे सध्या कुठे आहेत ? काय करतात ? वगैरे प्रश्न विचारायचे नाहीत.ते
पुन्हा येतील.नक्की येतील.आणि पुन्हा जातीलही.( हे सुद्धा नक्की !) काही
माणसंच अशी असतात.त्यांचं असं का होतं ? कळत नाही.म्हणजे त्या बाबत काही
तर्क भाष्य करता येत नाही.केलं तरी ते सर्वमान्य होईल याची शाश्वती
नाही.त्यामुळे काही ठाम मत मांडण्यापेक्षा गृहीतके मांडलेली बरी.
- यांचं असं का होतं ?
- भाग एक : अमर्याद निखिल वागळे
निखिल वागळे किती फिरले ? म्हणजे कुठे कुठे आणि कुठून कुठे ?
सोबत,साधना ते काही काळ फ्री लान्स नंतर संदीप पाटील सोबत 'षटकार',त्यानंतर
रोहिणी हट्टंगणी आणि गौतम राजाध्यक्ष सोबत 'चंदेरी' मग 'आपलं महानगर' मग
शिवसेने सोबतचा राडा.मुंबईत,औरंगाबादेत.औरंगाबा देत तर वागळेंना रॉकेल
टाकून जिवंत जाळण्यापर्यंत गोष्ट थराला पोहचली होती.वागळेंच्या पंगेखोर
दुराग्रही हट्टी आणि हेकेखोर स्वभावामुळे, तत्व आणि भूमिकेच्या नावाखाली
आपण म्हणू तेच खरे,तेच अंतिम सत्य या अट्टाहासापोटी महानगर निकाली
निघाला,म्हणजे दिवाळंच निघालं.
वागळेंचे सुदैव एवढेच की नेमक्या
त्याचवेळी मराठी वृत्तवाहिन्यांचे पीक आले.वागळेंना त्यात वाव
मिळाला.वागळेंना या बाबतीत श्रेय द्यावेच लागेल की त्यांनी हिंदी
वृत्तवाहिन्यांचा मराठी प्रेक्षक स्वबळावर मराठी वृत्तवाहिन्यांवर खेचून
आणला.विशेषतः त्यांनी चालवलेल्या दैनंदिन चर्चा आणि त्यांनी घेतलेल्या
मुलाखती.आजचा सवाल,पॉईंट ब्लॉन्क,ग्रेट भेट.त्यांनी हे सगळं गाजवलं.पण
बुजगावण्याने पीक राखलं म्हणून बुजगावणं शेताचा मालक बनत नाही.उभं राहणं
ठीक.म्हणजे शेतमालक खुशीत आला तर फेटा बांधील.पण शेताच्या मालकालाच
दुगाण्या झाडायच्या म्हणजे काय ? म्हणजे कोण खपवून घेईल ? आणि का म्हणून ?
वागळेंच्या या अशा अनाकलनीय टोकाच्या
तडकू भडकू स्वभावामुळे आज
इथे तर उद्या तिथे असे फिरत अखेर वागळे रन आउट झाले.पण त्यांची विकेट अन्य
कोणी नाही तर त्यांनी स्वतःच घेतली.वागळे आणि त्यांचे समर्थक चाहते
वागळेंच्या वृत्त वाहिन्यातील गच्छन्ति आणि बहिष्कृततेला सत्ताधारी भाजप
शिवसेनेला कितीही जबाबदार धरत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही.शेवटी वृत्त
वाहिन्या काय किंवा वर्तमानपत्र चालवणे काय : व्यवसायाचा भाग आहेच.अर्थचक्र
नीट फिरले तरच चॅनलचे चाक फिरेल. पेपरचे मशीन फिरेल.हे आम्ही पत्रकारांनी
समजून घेतलेच पाहिजे.आम्ही कोणाला बहिष्कृत करू शकत नाही.आमच्या
विचारांच्या विरोधी असणारे देखील याच समाजाचा घटक आहेत.त्यांना नाकारून कसे
चालेल ? बरे लोक त्यांना स्वीकारत असतील तर आम्ही नाकारणारे कोण ?
आपल्याला एखादा विचार भूमिका मत किंवा म्हणणे पटत नाही म्हणून त्याला
दमदाटी करणे,त्याला गप्प बसवणे,दरडावून बोलणे,म्हणजे दांडगाई झाली.याला
पत्रकारिता कसे म्हणता येईल ? आणि चर्चेला बोलावलेल्या एखाद्याला अक्षरशः
हाकलून देणे,पिटाळून लावणे हे म्हणजे अतीच झाले.भले तो वर्तक सनातनचा
आहे.सनातनवर दाभोलकर पानसरे कलबुर्गी गौरी लंकेश हत्येचे संशय आहेत.पण ते
अजून सिद्ध व्हायचेत.पोलीस तपास लावतील,न्यायालय शिक्षा देईल.तुम्ही का
पोलीस आणि न्यायाधीश होता ? त्यांना मत मांडू द्या ,तुम्ही मांडा.प्रश्न
विचारा.त्यांच्या उत्तरातील खोटेपणा उघडा पाडा.बस.पेक्षक ठरवतील काय ते.पण
निखिल वागळेंना नेमके हेच मान्य होत नाही.किंवा माहिती असून ते मुद्दामहून
असं काहीतरी करतात.स्वतःची दबंग इमेज निर्माण करण्यासाठी.वागळे कोणापुढे
झुकत वाकत नाहीत.कोणत्याच भावात विकले जात नाहीत असा गोड गैरसमज बाळगण्याचे
कारण नाही.वागळे या बाबतीत मिश्रहारी आहेत.आणि सर्वभक्षी सुद्धा.मी स्वतः
महाविद्यालयीन जीवनात असताना निखिल वागळे यांचे सोबत औरंगाबादच्या आपलं
महानगर मध्ये काम केलेलं आहे.फार जवळून नाही तरी दुरून दुरून का होईना
त्यांच्या कामाची 'शैली'आणि 'पठडी'मला ज्ञात आहे.( अवगत नव्हे ) त्यामुळे
वागळे कसे आहेत ते मला पुरते ठाऊक आहेत.त्यामुळेच सांगतो वागळे पुन्हा
येणार.आजही ते ज्या कोणत्या वृत्त वाहिनीवर येतील त्या वृत्त वाहिनीचा
टीआरपी वाढवतील.यात शंका नाही .मात्र असे असतानाही त्यांना 'जागा'द्यायला
वृत्त वाहिन्या कचरतात. त्या कोण्या पक्षाच्या दबाव आणि दडपणामुळे नव्हे तर
वागळे कधी काय करतील याचा 'नेम' भरोसा नसल्यामुळे.नाहीतरी वृत्त
वाहिन्यांना किंवा वृत्तपत्राला कितीही ठरवले तरी फक्त सरकारच्या आरत्या
ओवाळता येत नाहीतच.तसे केले तर चॅनल गडगडेल.कोण पाहील त्याला ?वृत्तपत्र
रद्दीच्या भावात जाईल ,कोण वाचेल त्याला.एकांगी बाजू घ्यायची ठरवली तरी
सरकार विरोधी बातम्या,वृत्त,चर्चा होणारच.त्याला अडवता येत नाही.अगदी
मुखपत्रांना सुद्धा असं करता येत नाही.हे वागळेंना कळत नाही का ? तर
कळतं.पण वळत नाही.ही नेमकी गोम आहे. वागळेंनी लोकांना बोलू दिले
पाहिजे.वागळे नेमके हेच करत नाहीत.स्वतःचच घोडं दामटतात.लोकांच्या डोक्यावर
मिरे वाटतात.दुसऱ्याला मर्यादेत बोला,असंसदीय भाषा वापरू नका,सगळा
महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय म्हणायचं.आणि स्वतः मात्र जाहीरपणे ' ए मुर्खा
गप्प बस म्हणायचं.पोलीस आयुक्ताला फोन करून 'तुम्ही कुणाशी बोलताय ते कळतंय
का ? माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा म्हणायचं.स्क्रीनवर त्या
अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर व्हायरल करून लोकांना त्याला फोन करा म्हणून
चिथवायचं.एखाद्याला भर कार्यक्रमातून हाकलून लावायचं.याला साधन शुचिता कसे
म्हणता येईल.वागळे हे सगळं अनावधानाने नाही तर जाणीवपूर्वक मुद्दामहून
ठरवून विचारांती करतात.का करतात ? माहिती नाही ! हिमालयात राहणारे काही
नागा साधू म्हणे हटयोग म्हणून काट्यावर झोपणे,विस्तवावर चालणे,स्वतःला
खड्यात गाडून घेणे,एका पायावर उभे राहणे,झाडावर उलटे लटकणे असे अघोरी
प्रयोग करतात.काही जण तर चक्क विषारी नाग विंचू चावून घेतात.त्यातून
त्यांना म्हणे 'समाधी'अवस्था प्राप्त होते.हे सगळं ते गांजाच्या नशेत
करतात.कैफ नेमका कशाचा? माहिती नाही .भक्ती आणि साधनेचा हा नेमका कोणता
प्रकार आहे.? कळायला मार्ग नाही .आमचे आदरणीय निखिल वागळे साहेब नेमकी अशीच
हटयोगी अघोरी पत्रकारिता करतात.यांचं असं का होतं कळत नाही.
--रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक ,दैनिक लोकपत्र
------------------------------ -----------
पुढील सोमवारी वाचा
केबिन कॉक : कुमार केतकर