'बाबा' गेले अन दशम्याही गेल्या

विषय तोच आहे,म्हणजे 'सुपातले जोंधळे जात्यात का भरडले ?' पण एकटे जोंधळेंच का म्हणून ? आदरणीय पत्रमहर्षी आणि प्रतिपाद्य समाजवादी ( प्रतिपदेच्या 'चंद्रा' प्रमाणे 'बाबां'चा समाजवाद देखील 'कला कला'ने 'कोरी'त वाढून कधी 'पुनवे'चा तर कधी 'आवशी'चा होऊन उगवत मावळत असे.म्हणून ते 'प्रतिपाद्य समाजवादी' ! ) असो तर श्रीमान 'बाबा' उपाख्य म.य .दळवींचे शेपूट धरून दैनिक मराठवाड्यातून जे जे 'मृच्छकटिक' लोकमत मध्ये आले त्या सर्वांनी पत्रकारितेत एक नवीच परंपरा निर्माण केली.या सर्वांनी मिळून सर्वप्रथम 'दैनिक मराठवाडा'चा 'अभिमन्यू' केला.घाव घालणाऱ्यात अनेक रथी-महारथी होते.त्यातले महावीर भाई म्हणजे एक छोटेसे प्यादे होते.
  • यांचं असं का होतं ? 

  • भाग - चार : सुपातले 'जोंधळे'जात्यात का भरडले ?
चक्रव्यूह 'बाबां'नी रचला होता,आयुधे 'दर्डा' नी पुरवली,आणि 'अभिमन्यू वध' संतोष महाजन,अरविंद वैद्य,राम अग्रवाल,महावीर जोंधळे,विद्याभाऊ सदावर्ते,बाबा गाडे या सगळ्यांनी मिळून केला.यात काही नावे राहूनही गेली असतील,कदाचित एखादे नाव अकारण'ही' आलेले असू शकते.काही तपशील 'ऐकीव' आहेत,त्याचे पुरावे देता येणार नाहीत.म्हणजे उपल्बध नाहीत.कोणत्याही घडामोडींचा ढोबळ इतिहास नेहमीच आपल्या समोर असतो.परंतु त्यामागची 'कट कारस्थाने' कधीच समोर येत नाहीत,कारण त्याचे पुरावे नसतात.त्यामुळे इथेही काही तपशीलवार आक्षेप निर्माण होऊ शकतात.परंतु हे तितकेच खरे की, बाबा दळवींनी वयक्तिक महत्वाकांक्षा आणि अनंतराव भालेराव यांच्या बद्दलच्या सुप्त असूया आणि सुडापोटी अनंतराव,समाजवाद आणि दैनिक मराठवाडाशी फारकत घेतली.' नामांतराचा मुद्दा' हे केवळ निमित्त होते.बाबा मध्ये वसलेल्या छुप्या संघोट्याची 'चाणक्य नीती'.मराठवाडा संपवायचाच ही या चाणक्याची 'शेंडीला गाठ'मारून प्रतिज्ञाच होती.,दलित चळवळीतील काही पट्टशिष्य, तसेच बाबा 'प्रेमी' समाजवादी पिलावळ आणि मराठवाडा,अजिंठा मधून फितवलेली 'रसद' एवढ्या भांडवलावर बाबा 'लोकमत'चे सेनापती बनले.आणि मग या हेमाडपंताने दैनिक मराठवाडाचा अभेद्य गड भेदला.साम,दाम,दंड,भेद : सगळी चाणक्य नीती.बाबांनी मराठवाडा दैनिकाचे समूळ उच्चाटन आणि दैनिक लोकमतच्या प्राण प्रतिष्ठेसाठी काय काय पणाला लावले आणि काय काय 'गहाण' ठेवले याची चर्चाच न केलेली बरी.कारण त्यांचे शिष्यगण,भक्तगण आणि 'प्रीती संगमांचे' अनेक लाभार्थी अजूनही जिवंत आहेत.अमुक एकाने अनेक माणसे जोडली असे आपण सहसा म्हणतो,बाबांच्या बाबतीत वेगळी गम्मत आहे,त्यांनी किती माणसे जोडली,किती तोडली, ( किती तुडवली ?) हे अलहिदा.पण त्यांनी अनेक जोडपी जुळवली हे त्यांचे समाजवादी चळवळीला,मराठी पत्रकारितेला,दलित आणि ग्रामीण साहित्य क्षेत्राला,दिलेले अभूतपूर्व योगदान आहे.त्यांच्या या योगदानाचा सांख्यकी सर्व्हे अजून कोणी केलेला नाही,परंतु ही संख्या कमीत कमी पाचशे सहाशे तरी असावी,कदाचित त्याहून अधिक.म्हणूनच वसंत कुंभोजकर बाबांना गमतीने 'जुळारी 'म्हणत.बाबांच्या गुहेत शिष्य म्हणून गेलेला कोणीही रिकाम्या हाती येत नसे.म्हणजे कोणाचा तरी हात हातात घेऊनच यायचा.त्यातही आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह जुळवण्यात बाबांना विशेष रस.बाबांची ही कला आणि लौकिक ऐकून अनेकजण बाबांचे शिष्यत्व पत्करायचे आणि बायको किंवा नवरा पदरात पडून घ्यायचे.पुन्हा त्या जोडप्यांना 'उभयता' नोकऱ्या मिळवून देण्यासाठीही 'बाबा' त्यांचं वलय,वजन आणि शब्द खर्ची घालायचे.त्यामुळे'लव्ह गुरूंच्या'भोवती 'भुंगे आणि मधमाशांचा' गुंजारव कायम असायचा.पत्रकारितेतल्याही अनेकांना बाबांनी बायका आणि बायकांना नोकऱ्या मिळवून दिल्या.त्यामुळे हे लाभार्थी कधीच बाबांच्या शब्दाबाहेर नसायचे,बाबा म्हणतील ती पूर्वदिशा. बाबा वाक्यं प्रमाणम.ही अवस्था.त्यामुळे दैनिक मराठवाडा संपवण्याचा 'बाबांचा प्रण' तडीस गेला.अनेक जण असेही म्हणतील की मराठवाड्याच्या नष्टचर्याचे खापर उगाच बाबा दळवी,दर्डा,लोकमत आणि तत्कालीन मराठवाडा सोडून लोकमत मध्ये आलेल्या महावीरभाई आणि कॅम्पवर फोडू नका.मराठवाडा संपला त्याला कारणीभूत स्वतः अनंतराव भालेराव,विश्वस्त मंडळ आणि अकारण पांघरलेला समाजवाद हे आहे. एका नामांतर प्रश्नाने दैनिक मराठवाडा आणि अनंतरावांचा समाजवादी बुरखा फाटला आणि त्यांचा ब्राह्मणी मनुवादी चेहरा उघडा पडला.म्हणून लोकांनीच त्यांना नाकारले.कालाय तस्मै नमः, त्या साठी आम्हाला नका जबाबदार ठरवू. काळ बदलला.लोकांची अभिरुची बदलली.वाचकांची वर्तमानपत्राकडून अपेक्षा आणि मागण्या बदलल्या.पेपर चालवणे व्यासायिक दृष्ट्या किफायतशीर झाले तरच ते टिकेल हा नवा सिद्धांत आला.चळवळ,विचारधारा,भूमिका या पेक्षा लोकांना वाचायला निरनिराळ्या चवीच्या बातम्या देणे आणि जाहिराती मिळवणे म्हणजेच पत्रकारिता ही नवी व्याख्या तयार झाली.हे परिवर्तन आपोआप झाले की लोकमत ने घडवून आणले हा संशोधनाचा विषय आहे.माझ्या मते पत्रकार आणि वृत्तपत्र व्यवसायाला 'निव्वळ धंदेवाईक स्वरूप आणण्यात आणि धंद्यासाठी कोणतीही पातळी गाठण्याची व्यवस्था निर्माण करण्यात लोकमतचा वाटा हनुमानाचा असेल तर बाबा दळवी त्यातले 'जांबुवंत. आहेत.बाकी मग संतोष महाजन,अरविंद वैद्य,राम अग्रवाल,बाबा गाडे,महावीर जोंधळे इत्यादी वगैरे म्हणजे सुग्रीव,नळ-नीळ-अंगद इत्यादी,विद्याभाऊ सदावर्तेचाही 'खारीचा वाटा' ! विषयाचेही शेपूट मारोती प्रमाणेच लांबले.पण मारोतीच्या बेंबीत बोट घातल्याशिवाय आत नेमकं काय 'ठणका' मारतंय आणि लोक का म्हणून 'गार'च लागतंय, म्हणतात,ते कळणार नाही,म्हणून जरा सविस्तर.चला तर मग,भेटू पुन्हा.याच वेळी,याच ठिकाणी,पुढच्या आठवड्यात.तो पर्यन्त नमस्कार'

 (भाग २)
--रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक ,दैनिक लोकपत्र 
Mobile - 7888030472