पत्रकारांचा अण्णु गोगट्या ...

पु.ल.देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्लीत एक पेन्शनरपात्र आहे. दातांची बत्तीशी उडाली असं सरळ सांगण्या ऐवजी ही वल्ली भाईंना  'दातांचा अण्णु गोगट्या झाला'म्हणून सांगते.कडव्या कोकणस्थांचा वाकडेपणा.सरळ काही बोलायचं नाही, आणि तिढ्या शिवाय काही करायचं नाही. वरल्या पाडातला अण्णु गोगट्या आडाचं पाणी शेंदायला गेला आन पोहऱ्या ऐवजी स्वतःच आडात पडला.तेव्हापासून कोणतीही गोष्ट पडली की त्याचा अण्णु गोगट्या झाला, हा वाक्प्रचारच होऊन बसला.थोडक्यात दातांचा अण्णु गोगट्या झाला म्हणजे दंताजीचे ठाणे उठले.हा संदर्भ इथे यासाठी दिला की आमचे कोकणस्थ आडनावाचे नागपुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकारांसाठी नुकतीच 'बाळशास्त्री जांभेकर निव्रुत्ती वेतन' योजना जाहीर केली आहे.त्याचा जीआर देखील काढला आहे.नेहमी प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी याही योजनेत अटी,शर्ती आणि निकषांची अडथळ्याची शर्यत लावली आहे.त्यात एवढा कडेकोट बंदोबस्त आहे की मुंगीही आत शिरु नये.म्हणजे दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत.म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांचा अण्णु गोगट्या केला आहे.पंगत आहे,निमंत्रण आहे,भोजनही तयार आहे,पण पत्रावळीच नाहीत. वाढप्यांनी वाढायचे तरी कशावर ? त्यातून जे कुणी चालाखीने स्वतःचे थाळे घेऊन येतील त्यांच्याही थाळ्यात चार शिते पडण्याची शाश्वती नाही. तो पीएफ पेन्शनचा लाभार्थी नसावा,त्याला उपजिविकेचे अन्य काही साधन नसावे,तीस वर्षाचा अनुभव, अधिस्विक्रुती धारक असण्याची अट,शिवाय तो ईन्कम टँक्स भरणारा नसावा,वगैरे वगैरे. जीआर सगळ्या पत्रकारांनी वाचला असावा.त्यात कोण कोण बसतील ते जरा आपणच तपासून पहा.पुन्हा हे सरकार महिनाभरात 'म्होरच्या मुक्कामाला' निघणार. म्हणजे पत्रकारांच्या ढोपराला जो गुळ लावलाय तो तोंडात पडणार नाहीच.निर्णय आणि योजनांच्या पक्वांनांचा नुसताच घमघमाट सोडायचा आणि आचमनाला निकषांचे फुलपात्र ठेवायचे.शेतकरी असोत,धनगर असोत,मराठे असोत,मित्रपक्ष असोत सर्वांच्या बाबतीत हेच धोरण.प्रत्येक निर्णय ऐतिहासिक आणि पारदर्शक.पत्रकार
 पेन्शन योजनेचा निर्णय देखील असाच ऐतिहासिक आणि पारदर्शक आहे.धक्कादायक म्हणजे ईतक्या संकुचित 'कडी'तून एखादा ' लवचिक' पत्रकार पार पडून पेन्शन पात्र ठरलाच तर त्याच्या म्रत्यू नंतर पेन्शन बंद होणार. ही विचित्र अट कोणत्या सद्हेतूने आहे हे काही कळले नाही. लोकशाहीच्या चौथ्या स्तभांत आता न्रसिंहा ऐवजी वाळव्या राहातात.त्यामुळेच कदाचित मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसाठी पेन्शन योजना घोषित करतांना पत्रकारांचा अण्णु गोगट्या केलाय.निवडणूका तोंडावर आहेत.लवकरच पत्रकारांचा भादवा सुरु होईल.त्या नादात पत्रकारांना आपले शेपूट कापल्याचे भान राहाणार नाही. आम्हाला खात्री आहे,कोणीही पत्रकार सरकारच्या या 'अटखोर' अडेलतट्टूपणा विरूद्ध खुलेपणाने जाहीर निषेधाचा आवाज उठवणार नाही.कुणी दबका आवाज काढण्याचा प्रयत्न केलाच तर वर्तमान पत्रांचे मालक त्याचा अण्णु गोगट्या करतील.जे स्वतःवरच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिम्मत ठेवत नाहीत त्यांचा अण्णु गोगट्या व्हायला आडाचीही गरज नसते,आचमनासाठी ठेवलेल्या फुलपात्रातही त्यांच्या नाकातोंडात पाणी शिरु शकते.
रवींद्र तहकिक 
औरंगाबाद