महाराष्ट्र माझाच्या नावाखाली रोहन भेंडेने पत्रकारांना गंडवलं !

प्रवीण बर्दापूरकर, शैलेंद्र शिर्के  यांच्यासह अनेकांची फसवणूक

नागपूर - दिल्लीच्या 'राव मिडीया ग्रुप'चं मराठीमध्ये 'महाराष्ट्र माझा' नावानं एक साप्ताहिक सुरु होत आहे असं सांगून रोहन भेंडे नावाच्या एका तरुणानं एका ज्येष्ठ संपादकासह राज्यातील अनेक लहान-मोठ्या पत्रकारांना गंडवलं आहे. स्वतःला राव मिडिया ग्रुपचा CEO आहे असं सांगणाऱ्या या भेंडेने चांगल्या चांगल्या लोकांना फसवलं आहे. भेंडेची 2-3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच हा स्वतःला बच्चू कडूचा नातेवाईक सांगतो. या माणसाने फसवलेल्या राज्यातील पत्रकारांची यादी मोठी असण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला याने The Students Express या नावाचं साप्ताहिक आपण चालवत असल्याचं सांगून लोकांशी संपर्क केला. त्यानंतर काही मोठे मासे गळाला लावले. मराठीमध्ये सुरु होणाऱ्या या साप्ताहिकाचे मुख्य संपादक म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापुरकर यांनी जबाबदारी घेतली होती. पुण्याचे निवासी संपादक म्हणुन शैलेंद्र शिर्के यांनी काम पाहायचे ठरवले होते. या दोघांनी मिळून संपादकीय कामासाठी अनेक लोकही निवडली. भरघोस पगाराच्या ऑफर दिल्या. त्यांना रीतसर ऑफर लेटर देऊन जॉईन व्हायला सांगितलं. 

संपादकीय विभागातल्या या नावांचा वापर करत रोहन भेंडेने राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जात वितरणाचं काम करणाऱ्या लोकांच्या भेटी घेतल्या. त्यांना गडगंज पगाराचं अमिष दाखवत साप्ताहिकाचं काम करण्याची विनंती केली. नंतर वर्गणीच्या नावाने या लोकांकडून लाखो रुपये जमा केले. लवकरच आपलं काम सुरू होत असल्याचंही सांगितलं. त्यापैकी कित्येक जण गेल्या २ महिन्यांपासून पगाराविना काम करत होते.

 धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकल्प अचानक बंद करण्यात आला आहे. रोहन भेंडे हा फ्रॉड निघाला असून त्याने अशाच प्रकारे अनेकांचे पैसे लुटल्याचे आणखी काही प्रकार समोर आले आहेत. प्रविण बर्दापुरकर यांनी देखील आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये हा प्रकल्प स्थगित करत असल्याचे म्हटले आहे पण कारण दिलेले नाही.

राज्यातील 288 मतदारसंघात प्रतिनिधी नेमुन त्यांच्याकडून वर्गणी जमा करुन फंड उभा करायचा आणि त्याद्वारे साप्ताहिक चालवायचे असा काही फंडा भेंडेच्या डोक्यात होता. मुख्य संपादक आणि संपादकाला याची कल्पना होती की नाही काय माहीत. पण अनेकांना यापासून अंधारात ठेवले गेले. दर महिन्याला 288 वार्ताहरांकडून 100 प्रती मिळवणे हे या साप्ताहिक मागचं बिजनेस मॉडल होतं.

288 वार्ताहर x 100 प्रती = 28,800 प्रती x 500 रुपये = 1,44,00,000 रुपये दरमहा x 12 महिने = 17 कोटी 28 लाख रुपये .

असा काही भेंडेचा हिशोब होता. स्वतः प्रवीण बर्दापूरकर यांनी हे काम बंद करण्याबाबत सांगितलं नंतरच्या त्यांच्या एका ईमेल मध्ये हा हिशेब सांगितला आहे.

या साप्ताहिकाला मोठी लोकं जोडलेली असल्याने अनेकांनी विश्वास ठेवत स्वतःच्या नोकरीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर चांगला पगार मिळणार या विश्वासावर कित्येक जण वर्षानुवर्षे नोकरी केलेल्या जागी राजीनामे देऊन नोटीस पिरेडवर होते. दिल्लीची कंपनी असल्याने कदाचित चांगला पगार आहे असं अनेकांना वाटलं. 

पुण्यातुन या साप्ताहिकाचं काम चालेल असं सांगण्यात आलं होतं. यासाठी 2-3 बैठकाही झाल्या परंतू प्रत्येक बैठक वेगळ्या आणि तात्पुरत्या कार्यालयात घेण्यात आली. कामासाठी तयार झालेल्या प्रत्येकाला लवकरात लवकर जॉइन होण्याचा आग्रह करण्यात आला. विशेष म्हणजे जॉइन होण्यासाठी कोणतीही कागदपत्र लागत नव्हती तर 750 रुपयांची वर्गणी द्यावी लागत होती. इतकं असुनही काही ज्येष्ठ पत्रकार सोबत असल्याने आणि चांगला पगार मिळणार या आशेवर अनेकांनी चांगल्या नोकरीवर पाणी सोडलं. आता ना भेंडे समोर यायला तयार आहे ना इतर कोणी.

हाच तो भामटा