आमच्या वृत्तवाहिन्यांना नेमकं काय चावलंय
कळायला मार्ग नाही.काय बोलावे,किती बोलावे,कोणत्या विषयावर बोलावे याला
काही धरबंधच राहिलेला नाही.व्यावसायिकता वगैरे सगळं ठीक आहे हो.पण लाळ किती
गाळायची,किती सरपटायचं,अकलेचं किती दिवाळं काढायचं याला काही तरी मर्यादा
असायला हवी की नाही .निदान आपण प्रसारमाध्यमात पत्रकार म्हणून काम करतो.लोक
आपल्याला पहातात,ऐकतात,याचं तरी भान.मनाची नाही (च) पण किमान जनाची तरी
काही लाज लज्जा शरम.कमरेचं सोडून वेशीला टांगायचं तरी किती.एकतर सध्या
वृत्तवाहिन्यांवर जे समालोचट आणि समालोचाटिका अहोरात्र आपल्या अकलेचे दिवे
पाजळताना दिसतात ते सगळं उबग आणणारं आहे.काल तर कहरच झाला.निमित्त होते राज
ठाकरेंच्या ईडी चौकशीचे.सकाळी ७ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत तमाम
वृत्तवाहिन्यांवर राज ठाकरे आणि त्यांच्या ईडी भेटीचे महाकव्हरेज चालू
होतं.बातमी एका ओळींचीच होती,राज ठाकरेंची कोहिनुर मधील भागीदारी विक्री
व्यवहार संबंधात ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाची आलेली नोटीस आणि त्या
नोटिसीला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंची ईडी कार्यालयात भेट,आणि अर्थात
चौकशी.आता ही बातमी ताणून ताणून किती ताणता येऊ शकते.पण आमच्या वृत्त
'वहिन्या' म्हणजे विचारू नका.ताकात पाणी घालून सगळ्या पाहुण्यांना पुरून
उरेल एवढा मठ्ठा वाढवण्याची मठ्ठ कला आमच्या तमाम 'वहिन्या' आणि त्यावरील
समालोचट तितक्याच मठ्ठ पणे प्रदर्शित करीत असतात.पहात रहा राज ठाकरेंच्या
चौकशीचे एक्सलीजिव्ह रिपोर्ट, क्षणा क्षणाची अपडेट माहिती फक्त आमच्या
चॅनलवर .चला ग्राउंड झिरोवर.चुकवू नका पहात रहा,फक्त आमचे चॅनल,सर्वात
पुढे..एक पाऊल पुढे,उघडा डोळे,बघा नीट,मराठी माणसांच्या हक्काचं
व्यासपीठ,थेट अचूक बिनधास्त,कुठेही जाऊ नका..वगैरे वगैरे.वृत्त
'वहिन्यां'चे समालोचट सरळ सरळ धमक्याच देतात.बरे बातम्या काय ? तर त्याच
त्या.बोहरी साड्या दाखवतात तशा.एकदा नुसता पदर दाखवायचा.पलटी मारून एकबाजू
दाखवायची,पलटी मारून दुसरी बाजू दाखवायची.तसलाच मामला.लोकही हा सगळा
डोंबाऱ्याचा खेळ मुर्खासारखे ( किंवा नाईलाज म्हणून ) पहातात.अगदी सकाळी
सात वाजता एका वृत्त वाहिनीचा ग्राउंड रिपोर्टर राज ठाकरेंच्या
कृष्णकुंजवर पोहचला.स्टुडिओत समालोचाटिका होतीच.लाईव्ह
कव्हरेज सुरु झालं.राज ठाकरे सध्या काय करताहेत .कृष्णकुंजवर काय वातावरण
आहे.पोलीस काय करताहेत.कार्यकर्ते जमलेत काय,आत कोणी गेले का .बाहेर कोणी
आले का.निव्वळ बाष्कळ,बालिश फालतू प्रश्न.त्याला तितकीच निर्बुद्ध
उत्तरं.पोलीस बंदोबस्त तगडा आहे.कार्यकर्ते जमत आहेत.आत काय चाललय माहिती
नाही,बहुतेक राज ठाकरे टॉयलेट किंवा बाथरूमला गेले असावेत.( काय पण
दिव्यदृष्टी ! ) पुन्हा पुन्हा हेच चालू होतं.आतून कुत्र्यांच्या
भुंकण्याचे,कुकरच्या शिट्यांचे,आवाज आल्याचेही अपडेट सांगण्यात आले.(
निखिला आई थोर तुझे उपकार ) सापाच्या बिळापुढे गारुड्यानी पुंग्या वाजवीत
साप बाहेर पडण्याची वाट पाहावी अगदी त्याप्रमाणे विविध वृत्तवाहिन्यांचे
ग्राउंड रिपोर्टर्स कृष्णकुंजच्या दरवाज्या पुढे कॅमेरे आणि बूम धरून उभे
होते.कुठे फूस वाजलं की तिकडे पळत होते.त्यालाच आम्ही बातमीवर 'पाळत'ठेवून
आहोत असे ठणकावून ( अर्थात प्रेक्षकांना ) सांगत होते.अखेर एकदाचे राज
ठाकरे बाहेर आले .तेही सहकुटुंब.त्यावर अंजली दमानिया म्हणाल्या,ईडीच्या
चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला.झाले नवा विषय मिळाला.त्यातच
काळे ती शर्ट घातले म्हणून काही मनसैनिकांना ताब्यात घेतले.मग काय दुधात
साखरच पडली,दमानिया बाईने त्यात केशर घातले.मग दिवसभर तीच चर्चा.इकडे राज
ठाकरेंनी कोणते कपडे घातले,बूट घातले की चपला.( सॅन्डल घातलेत असे एका
वृत्त वाहिनीने एक्सलीजिव्ह सांगितले ) गाडी कोणत्या कंपनीची,गाडीचा
रंग,नंबर,असं सगळं इत्यंभूत.(एवढं मायक्रो जर्नालिझम यांना शिकवतं तरी कोण ?
नासाच्या एखाद्या अंतराळ यानाच्या प्रक्षेपणाचे सुद्धा एवढे बारकावे शोधले
जात नाहीत.एका वृत्त वाहिनीने तर चक्क ' राज ठाकरेंचा ईडीच्या दिशेने
अंतिम प्रवास सुरु' असे वाक्य उच्चारले.मग ईडीच्या कार्यालयापुढे,राज ठाकरे
एकटेच आत गेले.कुटुंब बाहेरच राहिले.कुटुंब हॉटेलात बसले आहे.हे कमी
म्हणून की काय राज ठाकरे तपास अधिकाऱ्यांना कसे उत्तरे देत असतील,त्यांचा
स्वभाव तापट आहे,ते संयम राखत असतील की खडाजंगी चालली असेल,यावर तर्क लढवले
गेले.काही वाहिन्यांनी या विषयावर चर्चाही ठेवल्या,त्यावर बोलायला पक्ष
प्रवक्ते आणि अभ्यासक तज्ज्ञही भेटले.हा सगळा अत्याचार आता थांबेल मग
थांबेल म्हणून आम्ही दिवसभर ..रात्री उशिरापर्यंत वाट पहात होतो .पण कसचं
काय अन कसचं काय .पाण्यात म्हैस अन वर सौदा. बाजारात तुरी अन भट भटणीला
मारी,मूठभर घुगऱ्या अन सारी रात मचमच चालूच होती.अखेर आम्हीच डोळे मिटले.(
कायमचे नाही हो.झोपलो.आज राज ठाकरेंच्या आधी )
- बोरूबहाद्दर