निवडणूक आणि मीडिया

आजचा विषय अर्थातच निवडणूक आणि तंत्रज्ञान ! या निवडणुकीची मला आढळून आलेली वैशिष्ट्ये आणि खरं तर, एकंदरीत बदलेलेली निवडणूक आणि प्रसारमाध्यमांबाबतची माझी काही निरिक्षणे आपल्याला सादर करत आहोत.


१) या निवडणुकीत प्रसारमाध्यमांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात ओसरल्याचे स्पष्ट झाले. केवळ मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमच नव्हे तर बाळबोध स्वरूपातील डिजीटल मीडियालाही याचा जोरदार फटका बसला. मीडियावर फार जास्त पैसा खर्च करण्याऐवजी स्वप्रसिध्दीचे खूप व्यापक, सुलभ आणि अर्थातच मोफत माध्यम जवळपास प्रत्येक उमेदवाराने वापरले. यामुळे प्रिंट मीडियाच्या उत्पन्नावर प्रचंड विपरीत परिणाम झाल्याची बाब उघड आहे.

२) डिजीटल मीडियात गुणवत्ता असणार्‍यांनाच पुढे जाता आले. विशेष करून दोन ओळींच्या बातम्या टाकून भरमसाट शेअरींग करणार्‍यांचा फोलपणा उमेदवारांकडे असणार्‍या थिंकटँकने स्पष्टपणे उघडकीस आणला. ज्यांच्याकडे दर्जेदार कंटेंट आणि विपुल युजर्स आहेत अशा डिजीटल मीडिया हाऊसेसला मात्र यातून अनपेक्षित यशाची संधी लाभली.

३) आपले पोर्टल वा अ‍ॅप कितीही आकर्षक असो, जर आपल्या कंटेंटमध्ये दम नसेल तर युजर्स आपल्याला भाव देत नाहीत. अन् युजर्स नसले तर उत्पन्न मिळणार नाही. कुणाचे युजर्स किती आणि यातून आपल्याला लाभ किती मिळणार याचे गणीत बहुतांश उमेदवारांकडे असल्याचे या निवडणुकीने सिध्द केले.

४) 'व्हिज्युअल स्टोरी टेलींग' या प्रकारात अमर्याद संधी असली तरी अद्याप आपल्याकडे हा प्रकार प्राथमिक अवस्थेत असल्याचे या निवडणुकीने सिध्द केले. भडक चित्रीकरणाला लोकप्रिय गाणी अथवा याच्या विडंबनाची जोड देण्याच्या पलीकडे बहुतांश उमेदवारांचे व्हिडीओ पोहचू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हृदयाचा ठाव घेणार्‍या कॅचलाईन्स, जिंगल्सचा अभावदेखील यावेळी दिसून आला. व्हाटसअ‍ॅपचे स्टेटस्, इन्स्टाग्राम/फेसबुक स्टोरीज अथवा टिकटॉक व्हिडीओजमध्येही कल्पनेचे दारिद्ˆय दिसून आले.

५) या निवडणुकीत जवळपास प्रत्येक पक्षाच्या नेत्यांसोबत स्वत:चा लाईव्ह प्रक्षेपणाचा सेटअप असल्याचे स्पष्ट झाले. तथापि, अगदी प्रो लेव्हलवरील प्रसारण हे भाजपच्याच मुख्य नेत्यांना शक्य झाल्याची बाब उघड आहे. मात्र प्रक्षेपणाचा दर्जा कसाही असला तरी, राज्याच्या अगदी कान्याकोपर्‍यात लाईव्ह व्हिडीओजनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे निश्‍चित.  

६) निवडणुकीच्या काळात बरेचसे उमेदवार एकच बातमी दहा वर्तमानपत्रांना देत असून याचा फारसा प्रभाव पडत नाही. आता डिजीटल मीडियातही हाच प्रकार थोडा वेगळ्या स्वरूपात पहायला मिळाला. एकच व्हिज्युअल स्वत:च्या सोशल प्रोफाईल्सवर शेअर करण्यासह डिजीटल मीडियात देण्यात आल्याचा प्रकार दिसून आला. अर्थात, कॉपी-पेस्ट पत्रकारितेची पुढील आवृत्ती डिजीटल मीडियात सुरू झाल्याचेही सिध्द झाले.

७) फेसबुक आणि युट्युबचे स्वत:चे प्लस वा मायनस पॉइंट आहेत. तथापि, युजर्स एंगेजमेंटचा विचार केला असता फेसबुक लाईव्ह सरस असल्याचे या निवडणुकीने सिध्द केले. व्हाटसअ‍ॅपची लोकप्रियता अबाधित असली तरी या मॅसेंजरवरून शेअर करण्यात येणारे ग्राफीक्स वा व्हिडीओ अन्य युजर्स क्लिक करतीलच याची शाश्‍वती नसल्याने याचा फारसा प्रभाव पडला नाही.

८) या निवडणुकीत वास्तवातला प्रचार हा बर्‍याच प्रमाणात आभासी जगात परिवर्तीत झाल्याचे दिसून आले. पुढील कालखंडात याला अजून गती येण्याची शक्यता आहे. तर वास्तवात असणार्‍या मीडियालाही आभासी विश्‍वातील आपले अस्तित्व मजबूत करण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याची बाब आता उघड झाली आहे.

९) निवडणुकीच्या कालखंडात 'कंटेंट इज किंग' हे पुन्हा एकदा सिध्द झाले. अर्थात, डिजीटल विश्‍वात कंटेंट हे सम्राट असेल तर याला डिस्ट्रीब्युशन आणि कन्व्हर्जन या दोन राण्या असतात हे विसरता येणार नाही. यातील चांगले कंटेंट आणि विस्तृत युजर्सबेस म्हणजेच ''कंटेंट+डिस्ट्रीब्युशन'' ही जोडी पुन्हा एकदा यशस्वी ठरली असून ''कंटेंट+कन्व्हर्जन'' या सूत्राचा उमेदवारांसह राजकीय पक्षांना नेमका काय लाभ होणार हे २४ तारखेला समजणार आहे.

- शेखर पाटील