चॅनल चालवलाय की जत्रेतील बायोस्कोप?

सोशल मीडियावरचे संघ-भाजपचे संमोहित मोदीभक्त असोत,काँग्रेसचे गोंधळी असोत,पवारांचे भोपे असोत,शिवसेनेचे वाघे असोत,किंवा मनसे,वंचित,एमआयएम इत्यादींचे गारुडी,डोंबारी,मदारी-दरवेशी-रायरंद असोत.राजकीय पक्ष,त्यांचे नेते,कार्यकर्ते आणि समर्थक ही सगळी जमात कायम एका भ्रमात जगत असते आणि जगाला संभ्रमित करीत असते.त्यांचे ते कामच आहे.कोणताच पक्ष किंवा उमेदवार जनतेचे कल्याण करण्यासाठी,राज्याचे किंवा देशाचे भले करण्यासाठी राजकारण करत नाही,किंवा निवडणुका लढवत नाही.हा सगळा खेळ सत्तेसाठी असतो.त्यामुळेच हिंदुत्व,पुरोगामीत्व,राष्ट्रीयत्व,जनतेबद्दलचे दायित्व हे सगळे तत्वज्ञान केवळ मुखशुद्धीसाठी असते.
 
खाल्लेल्या शेणाचा वास येऊ नये म्हणून.गायीचं काय अन म्हशीचं काय,ओलं काय आणि वाळलेलं काय शेवटी शेण ते शेणच.त्यात शुचिर्भूतपणा नाहीच.काही म्हणतात त्यांनी गायी म्हशींचे मोठाले पोवटे खाल्ले,आम्ही शेळ्या-मेंढ्यांच्या लेंड्या खाल्ल्या.हा निर्लज्जपणाचा कळस झाला.प्रचारात तुम्ही बघितलेच असेल.एकमेकांच्या बायका पर्यंत गेले हे लोक.आया-बहिणी पर्यंत पोहचले.बाकी मग बोलण्यात मान,मर्यादा,भान काहीच नव्हतं.जाणते तसेच आणि नेणतेही तसेच.पैलवानकी काय,नटरंग काय,आणखी काय काय.रेटा रेटा किती खरी किती खोटी ते जाऊद्या,पण निदान धनंजय मुंडे नेमके काय म्हणाले.कोणाला उद्देशून कोणत्या संदर्भात बोलले याची निदान शहानिशा करायला काय हरकत होती ? म्हणजे त्यांच्या रेटा रेटीचं सोडा ,आपल्या म्हणजे पत्रकारांच्या-प्रसार माध्यमांच्या रेटा-रेटीचं काय करायचं हा मला पडलेला प्रश्न आहे.मला वृत्तवाहिन्यात चालणाऱ्या अँकर्स आणि संपादक-प्रतिनिधींच्या खो-खोच्या खेळाबद्दल काहीही म्हणायचं नाही.खो-खो खेळा,आट्या-पाट्या खेळा ( पाट्या टाका ),लंगडी खेळा,सूर पारंब्या खेळा,लगोऱ्या खेळा,झिम्मा-पाणी,लपा-छापी,धप्पाकुटी खेळा,गोट्या खेळा हरकत नाही.म्हणजे लोकांनी नावे ठेवली म्हणून आदत से मजबूर शिंदळ  छिनालकी थोडेच सोडतात.पण प्रसार माध्यमांनी थोडीतरी मनाची नाही किमान जनाची तरी ठेवली पाहिजे.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आम्ही पहिले,उमेवारांच्या दारात,घराच्या आजूबाजूला दिवसभर आणि रात्री बेरात्री उशिरापर्यंत मोठ मोठ्या खपाच्या नामांकित,मानांकित वर्तमानपत्रांचे पत्रकार,प्रतिनिधीं,जाहिरात विभागवाले,मार्केटिंगवाले,खुद्द कार्यकारी-निवासी,(मूलनिवासी) संपादक,वृत्तसंपादक वगैरे पदावरचे पत्रकार अक्षरशः झुंडीने घिरट्या घालताना दिसले.एखाद्या मंदिर-दर्ग्यासमोर बुभुक्षित भिकाऱ्यांची गजबज असते ना,अगदी त्या प्रमाणे.एखादं जनावर मरून किंवा गळपटून पडलं की  कोल्हे कुत्रे कसे त्याचे लचके तोडतात,जखमात अळ्या पडतात,कावळे,घारी,गिधाडं घिरट्या घालतात,तसा सगळा किळसवाणा प्रकार.आणि आम्ही टिळकांचा,जांभेकरांचा,आचार्य अत्र्यांचा,खाडिलकरांचा,प्रबोधनकारांचा,अनंत भालेरावांचा वगैरे वारसा सांगतो.मी अमक्याच्या तालमीत वाढलो आणि तमक्याच्या मांडीवर लहानाचा मोठा झालो.हे असले दळभद्री भिक्कार धंदे करण्यासाठी ?  

        जाहिराती तर कुठे कोणत्या उमेदवारांच्या फारशा दिसल्या नाहीत,मग उमेदवारांच्या घरात काय कंदुऱ्या -भंडारे होते ? की बातम्यांचे पैसे घेतले ? छापण्याच्या-न छापण्याच्या बोली-दलालीवर ? निवडणूक आयोग,जिल्हा माहिती अधिकारी डोळ्यात काय घालून बसतात या बाबतीत,एक तरी पेपर किंवा वाहिन्यांचा माणूस पैसे घेताना पकडला का ? मोठी गिधाडं जाऊद्यात ,किडे-मुंग्या तरी.सोडून बोला.म्हणजे सगळे आलबेल चालू आहे म्हणायचे.सगळे तांदूळ धुतलेले.मला सांगा सगळ्या वृत्त वाहिन्यांनी मोदी पासून राज ठाकरेंपर्यंतच्या जवळपास सर्व सभा लाईव्ह दाखवल्या.हे काय समाजकल्याणार्थ-जनहितार्थ काम होते ? प्रदीर्घ मुलाखती काय,शाळेची घंटा काय,एबीपी माझा 'मठा'चे साक्षात्कारी गुरु राजीव खांडेकर,आणि आता झी त की काय गेलेले आशिष जाधव असोत,टीव्ही नाईनचे उमेश (कम) कुमावत असोत,एबीपीच्या नम्रता वागळे असो,ज्ञानदा कदम असो,टीव्ही नाईनची निखिला म्हात्रे असो,आणि असे बरेच पायलीचे पन्नास.यांना हिरे म्हणायचे की गारगोट्या हे तुम्हीच ठरवा,पण काय त्यांची बातमीदारी,काय त्यांची अँकरिंग,काय त्यांची भाषा,मोदी-शहा-फडणवीसांनी दाखवली नाही इतकी मस्ती मग्रुरी माज हेकटपणा,आरोगन्सी या ताटाखालच्या मांजरांनी दाखवली.पत्रकार नाहीच,पक्ष प्रवक्तेच.कधी कधी चर्चेत सूत्रसंचालन कोण करतंय हेच कळत नव्हतं.इतके एकांगी विषय आणि सूत्रसंचालकाची भूमिका.म्हणून मी त्यांना समालोचक नाही तर समालोचट म्हणतो.अक्षरशः जत्रेतल्या बायोस्कोप प्रमाणे टीव्ही चॅनल चालवतात.' बंबईची xxx बघा..भारी मज्जा बघा..कुतुबमिनार बघा..गांधी बाबा बघा' यांची नावे फक्त वेगळी होती इतकेच. भारी मज्जा तीच 'अमित शहा बघा..मोदी बाबा बघा..पंकजाताई बघा'
 
कोणत्याही चॅनलने कोणत्याही पक्षाला विशेषतः भाजपाला जनहिताचे प्रश्न विचारले नाहीत,किंवा त्यावर चर्चा केली नाही.मोदींनी सांगितले सत्तर वर्षात जे झाले नाही ते पाच वर्षात केले,एकही वाहिनीने त्याचे सत्यान्वेषण केले नाही.अमित शहा म्हणाले पवारांनी पन्नास वर्षात काय केले ? एकही वाहिनीने त्याचे सविस्तर उत्तर दिले नाही.पवारांचे 'भिज भाषण' आणि 'ईडी' वस्रहरण तेवढे दाखवले.त्यातही अजित दादांचा अज्ञातवास,अश्रुपात,मुंडे बंधू भगिनींचे 'उटणे' ! याला पत्रकारिता म्हणायचे,ही आहे चौथ्या स्तंभाची सामाजिक बांधिलकी ? 
 
-रवींद्र तहकिक 

( भाग दुसरा : लवकरच )