म्हणे...आमचं पोट बोलतं !

बेरक्या मध्ये,'चॅनल चालवताय की जत्रेतले बायोस्कोप' हा पहिला भाग प्रसारित झाल्यानंतर माध्यमातील अनेक पत्रकार मित्रांचे (नाव न छापण्याच्या अटीवर ) फोन आले.तरी बरं की लेखाखाली माझा मोबाईल नंबर नव्हता.तरी अनेकांनी शोधून मिळवून फोन केलेच.( शोध पत्रकारिता ) अनेकांनी  मान्य केलं (अर्थात खाजगीत,आपल्या भाषेत ऑफ दि रेकॉर्ड ) की तुम्ही लिहिलंय ते खरं आहे.म्हणजे सगळ्या वृत्तवाहिन्या,सगळी वर्तमानपत्रे (म्हणजे माध्यमातले लहान भाऊ,मोठे भाऊ,वंचित-बहुजन,एमआयएम , मनसे, बंडखोर,अपक्ष,मित्रपक्ष,'भिज भाषणाने' 'कोंभ'फुटलेले विरोधी इत्यादी वगैरे ) आता जनसंपर्कांची माध्यमे राहिलेलीच नाहीत.थोडक्यात करमणुकीची साधने बनली आहेत,ती देखील उथळ-उठवळ आंबटशौकिनांच्या करमणुकीची.

आजकाल दिवसभर टीव्हीवरच्या वृत्तवाहिन्यांवर खऱ्या खोट्या बनावट बातम्या आणि अफवांचा रात्रंदिवस उबग यावी इतका अखंड रतीब चालू असतो.पुन्हा त्या खोट्या अफवांवर बनावट बातम्यांवर शहानिशा न करता चर्चा सुद्धा घडवून आणल्या जातात.त्यात वाहिन्यांचे अँकर आणि पक्षांचे प्रवक्ते ( संबंधित विषयातील स्वयंघोषित तथाकथित तज्ज्ञ सुद्धा) तोंडाला येईल ते बोलतात.मला आश्चर्य याचे वाटते की हे विविध पक्षांचे प्रवक्ते,आणि तज्ज्ञ मंडळी या वृत्तवाहिन्यांच्या स्टुडिओत इतक्या तातडीने कसे काय उपल्बध होतात.काही काही महाभाग तर सकाळपासून दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत या नाही तर त्या वाहिन्यांवर वटवट करताना दिसतात .( तिथेच आडोशाला जागा पकडून झोपतात की काय माहिती नाही)  देवही इतक्या क्षणार्धात त्रिलोकात भ्रमण करू शकत नसेल इतक्या झटपट वेष पालटून हे 'बडबडे' लोक या वाहिनीच्या स्टुडिओतून त्या वाहिनीच्या स्टुडिओत कसे काय प्रगटतात या मागचे रहस्य मला एका मराठी वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या परीचितेनेच सांगितले.

सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांचे स्टुडिओ शक्यतो मुंबईतल्या अंधेरी परिसरात,किंवा 'महालक्ष्मी'ला आहेत.त्यामुळे या मंडळींना 'तळ्यात-मळ्यात'करणं सोपं जातं.हे लोक जणू काही ड्युटी असल्या प्रमाणे नित्य नियमाने तिथे जातात.खालच्या मजल्यावरील कॅंटीन मध्ये चहा-कॉफी घेत बसून राहतात.मग आम्ही आम्हाला पाहिजे तो कन्टेन्ट ( तिला नमुना असं म्हणायचं होतं ) त्यातून उचलतो. या मंडळींना आपले विचार प्रदर्शनाचे चॅनलकडून पैसे ही मिळतात म्हणे.वरतून चहा-कॉफी-बिस्किटे-नाश्ता वगैरे सुद्धा.थोडक्यात वृत्तवाहिन्यांवर फक्त अँकर्स किंवा  अन्य कर्मचारीच नाही तर बडबड सेवा पुरवणारेही पैसे कमावतात.जो जास्त वादंग घालेल त्याला जादा मागणी असते म्हणे.  माझ्या लक्षात आलं, ही टवळी मला मूळ विषयापासून भरकटवतेय.मी म्हटलं,हे जाऊदे.तू मला फोन कशासाठी केलास ते सांग.त्यावर ती ( अत्यंत मादक आणि लडिवाळ आवाजात ) म्हणते कशी 'अहो,तहकिक महाराज.तिकडे बसून पत्रकारितेचे इथिक्स सांगणं सोप्पंय हो..इकडे येऊन पहा म्हणजे कळेल आम्हाला काय सर्कस करावी लागते ते.आणि हो,तुम्ही सांगितलंत ते खरंय सगळं पण आमची नावं कशाला टाकलीत ? माझंही नाव आहे त्यात.हे नाय आवडलं मला.नावं ठेवा काय ठेवायची ती,पण नावं नका टाकत जाऊ.' मी म्हटलं 'अच्छा म्हणजे चोरी झाली,दरोडा पडला,खिसा कापला,लूट झाली,ब्लॅक मेलिंग केलं,खंडणी घेतली हे सांगायचं.चोर-दरवडेखोर-खिसेकापू-लुटारू-ब्लॅकमेलर-खंडणीखोर पकडले हेही सांगायचं,फक्त त्यांची नावे सांगायची नाहीत.अप्रतिष्ठा आणि बदनामी होते म्हणून.' या वर आमच्या त्या भगिनींचा अभिप्राय असा की ' चोर-लुटारू -दरवडेखोर-खिसेकापू-ब्लॅकमेलर-खंडणीखोर असतील तर ते वाहिन्यांचे मालक.आम्ही फक्त पंटर.शार्प शुटर,चॅनल मालक 'सुपारी' घेतात आम्ही पार्टीचा 'गेम'करतो.पंटर-शार्पशुटरच्या हातात 'घोडा'असतो.आमच्या हातात 'बूम '! गंधा है पर धंदा है ..काय करणार ? आमचं तोंड नाही,पोट बोलतं ! ' या वर काय बोलावं हे मला पाच मिनिटं सुचलंच नाही.तरी मी म्हणालोच.काहीतरी-थोडं तरी तारतम्य ठेवायला काय हरकत आहे.विधानसभा मतदानानंतर निकालाच्या आधी सगळ्या वाहिन्यांनी जे एक्झिट पोल जाहीर केले ते नेमकं काय होतं ? ' ' खरं सांगू काय.ती सरळ सरळ बतावणी होती.कोणीही काहीही सर्व्हे केलेला नव्हता.ती आकडेवारी कोणी दिली ते आम्हाला माहिती नाही,वरतून आदेश होते,हेच चालवा.आम्ही चालवलं.' हे असं असेल तर निवडणूक आयोगाने अशा भंकस बोगस एक्झिट पोलवर बंदीच घालायला पाहिजे.दुसरा अत्यंत फालतू प्रकार म्हणजे खोट्या बातम्या,अफवा आणि व्हायरल व्हिडीओचे प्रसारण.या सगळ्या बाष्कळ गोष्टींचा आणि जनतेचा काय संबंध ? हा इकडे गेला,तो तिकडे गेला,हा याला भेटला,तो त्याला भेटला,अशी शक्यता आहे,तशी शक्यता आहे.हे सरकार येणार,तमुक फार्मुला,जे घडलेच नाही तेही रंगवून सांगायचे.चॅनलच पक्षांना ऑफर द्यायला लागल्यावर आणि सरकार बनवायला -पाडायला निघाल्यावर राजकीय पक्षांनी करायचं काय ? बरं हा सगळा ओला-सुका कचरा  जनतेच्या माथी का मारता ? पब्लिकचं डोकं म्हणजे काय डम्पिंग ग्राउंड वाटलं तुम्हाला ?  वृत्तवाहिनीतल्या ज्या ट्वळीने मला फोन केला तिनंच चार दिवसापूर्वी 'वर्षा'बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती श्रीमती अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली होती.कन्टेन्ट काय होता माहित आहे ?

" आता आपण आहोत महाराष्ट्राच्या 'राज' महालात ( लोकशाहीत 'राज महाल ! ' ) अर्थात मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'बंगल्यावर.महाराष्ट्राच्या पोटाची चिंता (?)करणाऱ्या (नशीब पोट भरणाऱ्या नाही म्हणाली) मुख्यमंत्र्यांच्या पोटाची काळजी वाहणाऱ्या होम मिनिष्टर अमृता वहिनींच्या किचन मध्ये.वाहिनी काहीतरी करताहेत..काय करताय वाहिनी...काही तरी खास बेत दिसतोय..वाहिनी : हो,गेला जवळपास महिनाभर साहेबांची धावपळ दगदग सुरु होती,आता निकाल लागला आहे.त्यांचे मी पुन्हा येणार,हे वाक्य खरे ठरले आहे.आता जरा उसंत आहे,म्हणून त्यांच्या आवडीचे थालीपीठ,कोथिंबीर-मुगाचे,अळूवड्या,तूप-धिरडे,वगैरे करणे चालू आहे.' हे सगळं इतकं लाळघोटेपणाने चाललं होतं की विचारू नका.मी म्हटलं 'अगं टवळे हे असलं बाष्कळ काहीतरी दाखवण्यापेक्षा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची झालेली वाताहत,त्यांच्या शेतातलं,डोळ्यातलं पाणी,वाहून गेलेली उद्याची स्वप्न हे दाखवलंत आणि त्यांना न्याय मिळवून दिलात तर पुण्य तरी पदरात पडेल.निदान त्यांची दुआ मिळेल.त्यावर ती टवळी म्हणते कशी 'शेतकऱ्यांचे अश्रू दाखवून टीआरपी मिळत नाही,टीआरपी साठी असच काहीतरी लागतं " मी मनोमन टवळीला हात जोडले.टवळीची 'टीआरपी'ची टकळी आजही चालूच आहे,उद्याही चालूच राहील,का ? तर म्हणे त्यांचं तोंड नाही पोट बोलतं !

-रवींद्र तहकिक  

(भाग तिसरा : लवकरच )