डॉ. सुधीर रसाळ यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर

औरंगाबाद : स्वातंत्र्यसैनिक व निर्भीड पत्रकार अनंत भालेराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर झाला आहे. येत्या 17 नोव्हेंबर रोजी समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या कार्याह डॉ. सविता पानट यांनी दिली.

दैनीक मराठवाडाचे संपादक अनंत भालेराव यांच्या पहिल्या स्मृतिदिनापासून अनंत भालेराव स्मृति पुरस्कार देण्याची सुरवात त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानने केली. पत्रकारिता, साहित्य, कला, समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील एका नामवंत व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांना देण्यात आला. कुमार केतकर, अरूण टिकेकर, पी. साईनाथ हे ज्येष्ठ पत्रकार; विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार यांच्यासारखे नाटककार; मंगेश पाडगांवकर, ना.धो. महानोर यांसारखे प्रतिभावंत कवी, ग.प्र.प्रधान, मृणाल गोरे, मेधा पाटकर, अभय बंग, पुष्पा भावे, थोर गांधीवादी गंगाप्रसादजी अग्रवाल, नरेंद्र दाभोळकर ही सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठी माणसे, अनिल अवचट, हार्मोनिअम वादक अप्पा जळगांवकर, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, शिक्षणतज्ज्ञ द.ना.धनागरे, चित्रपट नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

2019 च्या पुरस्कारासाठी मराठी साहित्य, समीक्षा आणि भाषा या क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल डॉ. सुधीर रसाळ यांची निवड करण्यात आली आहे. 50 हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. रसाळ हे मराठी भाषा व वाड:मयाचे नामवंत शिक्षक, पत्रकारितेचे जाणकार म्हणून ओळखले जातात. अनंत भालेराव आणि मराठवाडा यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. सुधीर रसाळ यांनी साक्षेपी समीक्षक, मर्मग्राही विश्‍लेषक संवेदनशील सौंदर्यासक्त रसिक आणि शिस्तप्रिय अभ्यासक अशी स्वत:ची प्रतिमा साहित्य क्षेत्रात निर्माण केली आहे. समीक्षेच्या क्षेत्रातील रसाळ हे एक महत्त्वाचे नाव समजले जाते. त्यांची समीक्षेकवरची 10 पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांचा " कविता आणि प्रतिमा ' हा ग्रंथ या क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. रसाळ यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे वाड:मय निर्मितीचे पुरस्कार मिळालेले आहेत. आजही त्यांचे समीक्षा, संशोधनपर लेखन सुरू असून विंदा करंदीकर यांच्या कवितेची समिक्षा करणारा ग्रंथ लवकरच प्रकाशीत होणार आहे.