बातम्या विकणारी माणसं ...

बातमी ही विकायची गोष्ट आहे, असं व्यावसायिक गणित जेव्हापासून मालकवर्गानं बसवायला सुरवात केली तेव्हापासून बातम्या विकणारी माणसं (वृत्तपत्र विक्रेते) लाखमोलाची ठरायला लागली. गुळगुळीत कागदावर कितीही हॉट बातम्या छापल्या तरी जोवर त्या विकल्या जात नाहीत तोवर त्याची किंमत काय? वृत्तपत्र हा व्यवसाय आहे आणि व्यवसाय रस्त्यावर उतरुन करावा लागतो. बातम्या विकणारी फौज रस्त्यावरची फौज आहे. या न्यायानं लढाईत जो थेट मैदानातच असतो त्याला त्याचा मान मिळायलाच पाहिजे. तो मिळाला नाही तर राजा कितीही मोठा, पैसेवाला, ताकदवाला, स्किमवाला असला तरी लढाई हरण्याची शक्यता जास्त. याचं भान वृत्तपत्र व्यावसायिकांना आलं आणि म्हणूनच बातम्या लिहीणार्‍यापेक्षा बातम्या विकणारा महत्वाचा ठरायला लागला. फक्त आणि फक्त आपल्या कामाच्या जोरावर पेपरलाईनमध्ये आपली स्वतंत्र लाईन उभी करणार्‍या या जिगरबाज पेपर विक्रेत्यांना सॅल्युट.

पत्रकार कोणीही होतं. आजकाल तर ते सहज सोपं आहे. जसं बीकॉम झालेल्या पोराला बँकेत चेक भरता येत नाही, बीएससी झालेल्या पोराला धड परीक्षानळी धरायला येत नाही आणि बीए झालेल्या पोराला चार वाक्य धड बोलता येत नाहीत तसं बीजे एमजे झालेल्या पोराला दु:खद निधनाची बातमीही धड लिहीता येत नाही. पण तरीही पत्रकार व्हायची एक हौस असते. ती  हौस असते म्हणूनच सारं वांधं झालं आहे. ती जेव्हा खुमखुमी होईल तेव्हाच पत्रकार होता येईल. (ही खुमखुमी असेल तेव्हाच पेपरविक्रेताही होता येईल). फक्त लिहायला येतं इतक्या निकषावर पत्रकार होता येईलही, पण अवघड आहे ते टिकून राहणं. या टिकून राहण्याच्या अनेक कसरती आहेत. त्या बाहेरच्यापेक्षा आतच जास्त आहेत. राजकारण कुठं नाही? मग ते करायचंच तर सार्‍या गोष्टी क्षम्य होतात. जो जास्तीत जास्त जाहिराती देतो तो चांगला पत्रकार अशी व्याख्या यातूनच तयार होते आणि या निकषावरच टिकून राहण्याचे निकष तयार होतात. आता हे निकषही जीवघेणे झाले आहेत. टार्गेट बातम्यांचं नाही तर जाहिरातीचं आहे. मानसिक, भावनीक, कौटूंबीक, व्यावसायिक ओढाताण आता टोकाला गेली आहे. ज्याला जीथंवर ती सोसेल तिथंवर तो टिकतो. ज्याला सोसत नाही तो निसटतो. आणि परिस्थिती अशी आहे की, जो निसटला आहे तो सुखात जगतो आहे. सांगली जिल्हा पत्रकार संघाचा चिटणीस म्हणून मला हे सारं काळजी करण्यासारखं वाटतं आहे. बातम्या विकणार्‍यांवर लिहीताना बातम्या लिहीणार्‍यांच्याबाबतीतही काहीतरी ठोस व्हायला हवं. ते शासन आणि समाज पातळीवर व्हायला हवं. ते होईल यात शंका नाही.

पत्रकाराच्या नशिबीही बातम्या असाव्या लागतात. नाहीतर रोज उठून रस्त्याला खड्डे आणि मोकाट जनावरांच्या बातम्या देत बसावं लागतं. रोज बिटात जायचं. काय आहे काय बघायचं आणि परत यायचं या बातमीदारीचा पण वैताग यायला लागतो. माझ्या नशिबानं मला दोन दंगली, दोन महापुर आणि दरसालचा दुष्काळ कव्हर करायला मिळाला. 2005 चा महापुर. पहिल्यांदाच नदीकाठाला हिसका समजला होता. या अगोदर असं काही अनुभवायला मिळालं नव्हतं. लोकांनाही आणि पत्रकारांनाही. पत्रकारांसाठीही हा नवाच अनुभव होता. मला आठवतं, तेव्हा पंधरा दिवस आम्ही बर्म्युडा आणि टी शर्टवरच होतो. तसेच ऑफीसात येत होतो आणि जात होतो. दिवसभर पुरातच. खूप काम केलं. मी आणि समाधान पोरेनं पुरातनं अनेक गावांना भेटी दिल्या. खूप बातम्या दिल्या. वसंत भोसलेसर बॉस होते. त्यांनी खूप पळवलं. खूप विषय दिले. भरपूर वेगळं लिहून घेतलं. बाहेर पाण्याचा आणि पेपरात बातम्यांचा महापुर आला होता.

गावं  महापुरात अडकली होती. एका सकाळी उठून मी आणि समाधाननं गाडीला किक मारली आणि डिग्रजला जायचं ठरवलं. नांद्रे वसगडेमार्गे. काही अंतर गाडी आत गेली पण चिखलात अडकली. गाडी तिथंच लावून चालत गावात शिरलो. स्मशानागत झालं होतं गाव. नावातूनच कारभार सुरु होता. समाधान फोटो काढत होता. मी नोंदी घेत होतो. आम्ही लोकांशी बोलत होतो. बाहेरुन गावात येणारे आम्हीच पहिले आहोत या अभिमानानं छाती फुगली होती. त्या तोर्‍यात नावेतून पुढच्या चौकात आलो आणि छातीतनं हवा गेली. एका नावेत पेपरचे गठ्ठे घेऊन एक विक्रेता प्रत्येक घरात पेपर टाकत होता. नाव थांबवायची, पेपर टाकायचा, परत नाव हाकायची. चार दिवस जगाशी संपर्क तुटलेली माणसं. पेपरवर झडप घालत होती. भर पुरातनं पेपर घेऊन घरापर्यंत आलेला माणूस त्यांना सगळ्यात जवळचा वाटत होता. एका आईनं त्याची नाव थांबवली. पेपर घेतला आणि त्याच्या हातात चहाचा कप ठेवला. नावेत बसूनच त्यानं चहा घेतला आणि पेपर टाकत पुढं चालला. काही माणसं दुसर्‍या मजल्यावर अडकली होती. या बहाद्दरानं कळकात पेपर अडकवून तो दुसर्‍या मजल्यावर द्यायची आयडियासुध्दा तयार ठेवली होती.

घर तर त्यांचं पण बुडालं होतं पुरात. नुकसान तर त्यांचं पण झालं होतं. जीवाची भिती त्यांना पण होतीच, पण बहाद्दरांनी पेपर वाटायचं काम काही थांबवलं नाही. हेलकावणार्‍या नावेतून जात पेपर घरात देणार्‍या या विक्रेत्याच्या मनात तेव्हा आपणाला किती कमिशन मिळणार हा विचारही शिवला नाही. कारण त्याच्या मनात त्याचं काम व्यवसाय नव्हतं तर व्रत होतं. खुमखुमी असल्याशिवाय हे होत नाही. मनात आलं. आपण पुराच्या बातम्या लिहीतोय खर्‍या, पण त्या पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवणारी ही माणसं नसती तर आमच्या लिहीण्याला तरी काय अर्थ आला असता?..नंतर पुर ओसरेपर्यंत रोज आमच्याही अगोदर पेपरविक्रेते पुरात भेटत राहिले. तेव्हा त्या सार्‍यांचं आभार मानायचं राहून गेलं होतं ते आज मानतो आहे.
आणि या महापुरात तर साक्षात आमचा दोस्त आणि राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी यांचंच घर पाण्याखाली गेलं. फोन लागेना. निरोप देता येईना. सांगली-हरीपुर रोड कधीचाच बंद झाला होता. विकासचं घर बुडालं इतकं समजत होतं, पण त्याच्याकडून पण काही निरोप येईना. आम्ही काळजीत होतो. शिवराज काटकर धडपडत होता. पण काही समजायला मार्ग नव्हता. शेवटी कुणाकडून तरी निरोप आला की विकासनं जमेल तितकं सामान बाहेर काढलं आहे आणि तो बायको पोरांना घेऊन सांगलीत रहायला आला आहे. आमचा जीव भांड्यात पडला. महापुरात विकासचं खुप नुकसान झालं. पै पै करुन उभा केलेला संसार बुडाला होता. मुलगा बारावीला होता. आम्ही सकाळी त्याची चौकशी करायला फोन केला तर हा बहाद्दर पेपर वाटायला बाहेर पडला होता. नावेतून हरीपूर आणि परिसरात पेपर टाकत आपलं कर्तव्य बजावत होता.

विकास सुर्यवंशी, अमोल साबळे, विशाल रासनकर, दिपक वाघमारे, संदीप गवळी, सागर घोरपडे..ही सारी माणसं महापुरात राबत होती. ते हे सारं कमिशनसाठी करत होती का? कमिशनसाठी ती पुरात उतरली होती का? अजिबात नाही. ती अजुन इतकी टोकाची व्यवहारिक झाली नाहीत म्हणून तर हे चक्र सुरु आहे, याचं भान या व्यवसायात असलेल्या सार्‍यांनी ठेवलं पाहिजे. हजार जणांसोबत सांगलीतील 110 पेपर विक्रेत्यांचे संसारही पुरात बुडाले.

दंगलीतही असंच होतं सारं. सांगलीत तर एकदा सोडून तीन तीनदा दंगली झाल्या. जिल्हाधिकार्‍यांनी अगोदर जमावबंदी आदेश लागू केला आणि नंतर कर्फ्यु जारी केला. रस्त्यावर फक्त पत्रकार, पोलीस आणि मोकाट जनावरं. सारी सांगली चिडीचूप. ज्या काही बातम्या मिळायच्या त्या पोलीसांकडून. संघटनांकडून. पत्रकार म्हणून फिरायचीही चोरी झाली होती. पोलीस कुणालाच सोडत नव्हते. पण याही दिवसात एकही दिवस लोकांना पेपर मिळाला नाही असं झालं नाही. रोज ठरलेल्या वेळेला पेपर दारात असायचाच असायचा. हे सारं कोण करत होतं? तर पेपरविक्रेते.

कोल्हापूरात पेपर छपाई होते. तिथून तो सांगली जिल्ह्याच्या कर्नाटक सिमाभागातील गावापर्यंत आणायचे. ही कसरत वर्षानुवर्षांची आहे आणि ती अव्याहतपणानं सुरु आहे. त्यात कुठंही खंड नाही. कोल्हापूरातून पेपरच्या गाड्या भरुन खाली कोकणात उतरतानाची कसरत तर जीवघेणी. रोजची. दाट धुकं. फुटावरचं दिसत नाही अशी परिस्थिती, पण पेपरच्या गाड्या रेल्वेच्या वेगानं धावत असतात. सारं जग झोपलं की पेपरची छपाई पुर्ण होते आणि सारं जग उठायच्या अगोदर पेपर त्यांच्या दारात पडलेला असतो. हा रोजचा चमत्कार करणारी एक फळी महाराष्ट्रात पिढ्यान पिढ्या धावते आहे. पंधरा मिनीटंही गणित मागं पुढं होत नाही. पेपरच्या गाड्या पेपरचे गठ्ठे टाकत पुढं पुढं धावत असतात आणि हे गठ्ठे सॉर्टिंग करुन आपापल्या पिशवीत भरुन घेण्यासाठी भल्या पहाटे विक्रेत्यांची गर्दी अड्ड्यावर होत असते. ऊन वारा पाऊस कशाचीही फिकीर न करता ही माणसं काम करत आहेत. अगोदर आज्जा, मग वडील आणि आता पोरगा. तीन तीन पिढ्यांचा हा व्यवसाय टिकून आहे तो केवळ व्यवसाय म्हणून नाही किंवा घराणेशाही म्हणून नाही, तर या घराण्यांनी या व्यवसायासाठी आपल्या जीवाचं रान केलं आहे आणि कधी कधी तर जीवाची बाजी लावली आहे. बदल्यात त्यांच्या पदरात काय पडलं? याचा विचार ना त्यांनी कधी केला ना या व्यवसायानं. ही माणसं राबत राहिली. धावत राहिली. पेपरसाठी जगत राहिली. त्यांना न्याय मिळायचा कधी?

स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करा, पेन्शन-आरोग्य-शैक्षणिक आदी योजना ताबडतोब लागू करा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या असंघटीत कामगार म्हणून नोंदणी सुरु करा, गटई कामगारांप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी पेपर स्टॉल उपलब्द करुन द्या, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांना राखीव कोटा ठेवा, या व्यवसायाला आवश्यक असणारे साहित्य, अच्छादित स्टॉल, सायकल, रेनकोट, स्वेटर द्या, वरचेवर येणारे आजारपण आणि त्यासाठी लागणारा वैद्यकिय खर्च यासाठी कॅशलेस मेडिक्लेम सुविधा किंवा आर्थिक मदत द्या...या त्यांच्या मागण्या आहेत. एकही मागणी गैर नाही. सार्‍या रास्त आहेत. आणखी किती वर्षं आणि किती सरकारांसमोर त्या मांडायच्या?..सांगलीत राज्यातील पेपर विक्रेत्यांचं अधिवेशन पार पडलं. राज्य उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी, राज्य संचालक मारुती नवलाई, जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, सचिन चोपडे, शिवाजी काकडे, विशाल रासनकर, दत्तात्रय सरगर, अमोल साबळे, रामा कुंभार, देवानंद वसगडे, श्रीपाद पाटील, नागेश कोरे आदी मंडळी त्यासाठी दोन महिने राबली. सांगलीतल्या 110 पेपर विक्रेत्यांची घरं, संसार महापुरात बुडून संपले. ही सारी माणसं पुन्हा जिद्दीनं उभी राहिली आणि आता थेट राज्याचं अधिवेशन यशस्वी करुन दाखवलं. ही बाब आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आहे. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे संचालक गौतम पाटील आणि सारी संबंधीत मंडळी त्यांच्या मागं ठाम उभी राहिली. ही सारी माणसं काही लखपती नाहीत. पेपर विकून आपला संसार चालवणारी साधी माणसं आहेत, पण प्रामाणिक आहेत आणि न्याय्य मार्गानं आपल्या मागण्यांसाठी लढत आहेत. नुसत्या आश्वासनांवर कुणाचं पोट भरत नाही याचं भान सरकारनं आता ठेवलं पाहिजे.

 राज्यात 3 लाखापेक्षाही जास्त पेपरविक्रेते आहेत. सांगली जिल्ह्यात त्यांची संख्या अकराशेच्या आसपास आहे. स्वत:चा संसार सावरता सावरता या लोकांनी इतरांच्या संसारांना अनेकदा हातभार लावला. अनेकांना मदत केली. स्वत:च्या घासातला घास दिला. सांगलीत वृत्तपत्र विक्रेता भवन उभा केलं. अनेक उपक्रम स्वत:च्या पैशांनी राबवले. सामाजिक जबाबदार्‍यांचं भान ठेवलं आणि आपापलं सामाजिक कर्तव्य हमेशा पार पाडलं. आता पेपर विकण्यासाठी रोज रस्त्यावर उतरणार्‍या या लोकांना सरकारनं आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरायला भाग पाडतं आहे. हे सरकारला शोभणारं नाही हे नक्की. सरकारनं बातम्या विकणार्‍या लोकांना बातम्या घडवायला भाग पाडू नये इतकच.

- नंदू गुरव, सांगली
9822655333.