पोलीस मित्र गजाआड , आता पत्रकारांचा नंबर !


पुणे - ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणी पोलीस मित्र  जयेश कासट  याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर आता  लाचेत वाटेकरी होणाऱ्या पत्रकारांची पाचावर धारण बसली आहे. आपले नाव उघड होवू नये म्हणून काही पत्रकारांनी देव पाण्यात ठेवले आहेत. बेरक्याच्या वृत्तानंतर या प्रकरणाला मोठी वाचा फुटली आहे.


पुणे शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७५ लाख रुपये उकळणाऱ्या आरोपीकडून पोलीस मित्र म्हणून मिरवणारा जयेश कासट ( रा. नारायण पेठ ) याने पाच लाख रुपये खंडणी उकळली होती. जयेश कासट हा पोलिसांच्या  विघ्नहर्ता न्यासचा विश्वस्त आहे. त्याने पोलिसांसाठी विविध उपक्रम राबवून बड्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर संबंध प्रस्तापित केले होते. त्याचे अनेक पत्रकाराबरोबरही  सलोख्याचे संबंध  असून, एक प्रकारची दलाली सुरु होती.

या खंडणी प्रकरणात काही पोलीस अधिकारी आणि पत्रकार गुंतले असून, त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. हे संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचे असून, डॉक्टरांकडून घेण्यात आलेल्या ७५ लाखाच्या खंडणीमध्ये कोणाकोणाचे हात बरबटले आहेत, त्याची चवीने चर्चा सुरु आहे. कासट याने जवळपास १४ पत्रकारांना पाकिटे दिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

यातील प्रमुख आरोपी मनोज अडसूळ उर्फ अत्रे सध्या फरार असून, न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जो अर्ज केला आहे, त्यात जयेश कासट ( रा. नारायण पेठ ) याने पाच लाख खंडणी उकळल्याचा आरोप केला होता. कासट याने प्रकरण मिटवण्यासाठी काही पोलीस अधिकारी आणि पत्रकाराना पैसे वाटप करणार असल्याचे सांगितले होते, असेही नमूद केले होते. मनोज अडसूळ  याने न्यायालयात जो अर्ज केला आहे, त्यात महाराष्ट्राच्या मानबिंदू मधील एका पत्रकाराचे नाव आहे. तसेच एका पोलीस अधिकाऱ्याचा  नातेवाईक पत्रकार आहे.

कासट यास विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये पोलिसी हिसका बसल्यानंतर त्याने काही पत्रकारांची नावे घेतल्याचे समजते. त्यात मोठ्या वृत्तपत्रातील काही क्राईम रिपोर्टर आहेत. कासट याच्या बँक खात्यावरून आजपर्यंत कोणकोणत्या पत्रकारास पैसे ट्रान्सफर झाले तसेच त्याने पेटीएम, फोन पे, गुगल पे वरून कोणत्या पत्रकाराला पैसे पाठवले याची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.


खंडणी प्रकरणी सबका बंधूचा पाय खोलात.....

सध्या  बेरोजगार असलेला सबका बंधू ॲट्रॉसिटीच्या खंडणीच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. कारण एका महिलेच्या विनयभंगप्रकरणी एक सामाजिक कार्यकर्त्याची सव्वा कोटींची ऑफर धुडकावल्यानंतर, डॉक्टर पितापुत्राची 75 लाखांवर मांडवली झाली. यामध्ये बंधुचा सेटिंग पंटर असलेला व लक्ष्मीदर्शनवाल्या पोलिसांसोबत सेटिंग लावण्यात फसलेल्या एका 'बोगस पोलिस मित्रा'ला पोलिसांनीच गिरणीच्या पट्ट्याने पोलिसी खाक्या दाखविला. त्यानंतर त्याने संपुर्ण 'कॅसेट' पुन्हा रिव्हाइंड करत बंधूचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे सबका बंधूची 'पिवळी' झाली असून त्याची झोप उडाली आहे. या प्रकरणात 'मेडिकल'च्या गोळ्या घ्यायची वेळ आली आहे. याप्रकरणी सबका बंधूची चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी काही फिल्डवरचे पत्रकार देखील असण्याची शक्यता आहे.