पत्रकार पोलिसांचा मार का खात आहेत ?


एक काळ होता, माध्यमांचा पोलिसांवर वचक होता..पोलिसी अन्यायाची प्रत्येक बातमी होत असे..गुन्हे हे बीट आजच्या सारखे फक्त पोलिसांची चटण्यासाठी नसे, अन्याय करणा-या पोलिस यंत्रणेला सामान्य जनता सहज म्हणत असे, "तुम्ही अन्याय करणार असाल, पक्षपात करणार असाल किवा न्याय बाजू ऐकणार नसाल तर वृत्तपत्रांकडे या विरोधात दाद मागावी लागेल..शेवटी तेवढाच पर्याय आहे..
 
" पोलीस शहाणे होण्यास एवढा दम पुरेसा असे..कारण माध्यमं खरोखर पोलिसी वृत्तीपासून ते गुन्ह्यांच्या तपासापर्यंत सर्वत्र नजर ठेवून असत. एखाद्या बातमीने पोलिस सूतासारखे सरळ होत..मिडिया आसपास असला तरी पोलिस ठाण्यात नीट काम चाले..आपली वरिष्ठांकडे तक्रार होईल..विषय मंत्रालयापर्यंत जाईल या धास्तीपोटी अनेकांना न्याय मिळे, हा वचक फक्त शिपाई, हवालदारावरच नाही तर ठाण्याचा सर्वेसर्वा असलेल्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकावरही असे..यातून सामान्यांना फार दिलासा मिळे..
 
नंतर एक पत्रकारांची आणि संपादकांची  पिढी आली..जिने गुन्हा केला..पोलिसांना सलाम ठोकणारी ही पिढी होती..आंडू-पांडूला गुळ लावणारी, आयपीएसचे बुट चाटणारी..यातून फक्त राजकारणी टारगेट होऊ लागले..आयपीएस आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी लॉबीने ही सर्व जाणिवपूर्वक तयार केलेली रचना होती..त्यातून राजकारणी विरुध्द पोलिस अधिकारी असा सामना उभा राहिला, राजकीय बीट पाहणा-या पत्रकारांच्या तुलनेत गुन्हे पाहणारे पत्रकार अधिक संघटीत होऊन काम करत राहीले..साहेब माझ्या ओळखीचे आहेत, हे सांगण्यात पत्रकार धन्यता मानू लागले..
 
मध्येच बॉलीवूडला खाकी प्रेम जडले..इतके की सिंघम सारख्या एका सुमारपटात API दर्जाचा एक अधिकारी आणि त्याचे सहकारी थेट गृहमंत्र्याचा पार्श्वभाग लाथा-बुटाने फोडून काढतात..लोक या प्रसंगाला टाळ्या-शिट्यांनी दाद देतात..ख-या पोलिस दलाचा चमचे पत्रकार हाताशी धरून सुरु असलेला प्लान कामियाब झालाची यातून खात्री पटते..अनेक चित्रपट हे दाखवू लागतात की पोलिस बिचारे आहेत, पोलिस प्रामाणिक आहेत पण राजकारणी त्यांना काम करु देत नाहीत,  त्यांचा पगार कमी आहे, त्यांच्यावर फक्त अन्याय होतो, त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून बिघडाले कुठे..? कुणाला गोळ्या घातल्या म्हणून बिघडले कुठे..? 
 
अवैध मार्गाने गडगंज श्रीमंत झाले तर तो त्यांचा हक्क आहे कारण ते दोन नंबरवाल्यांना लूटतात..त्यांचे बळ कमी आहे कारण लोकसंख्या अधिक आहे... हे आणि असे निर्लज्ज समर्थन वारंवार येत राहीले..यातून पोलीसी भ्रष्टाचार आणि अन्याय समर्थानीय झाला..दबंग सारख्या चित्रपटाने हे समर्थन पक्के केले..मधल्या काळात बॉलीवूडकडून चकमकफेम अधिक-यांना हिरोपेक्षा अधिक लोकप्रियता मिळवून दिली..सारा मिडिया त्यांच्या पायात लोळत पडू लागला..हळुहळू फक्त पोलिस दलाला खुश करणा-या, अधिका-यांना लोकप्रिय करणा-या बातम्या झळकू लागल्या, पेपरचे कटींग, बाईटची लिंक घेऊन पत्रकार साहेबांची ओळख घट्ट करु लागले..त्यातून आर्थिक हितसंबंध निर्माण झाले, बहुतेक ठिकाणी पोलीसांच्या सोबत स्थानिक पत्रकार फिरू लागले, लोकांची पिळवणूक करणा-या नव्या टोळीत पत्रकारही सामील झाले, अनेक ठिकाणी मोठ्या संस्थेचे पत्रकारही या टोळीत सामील झाले, अधिका-यांच्या न केलेल्या शौर्याच्या कहाण्या छापल्या जाऊ लागल्या, अर्धा तास कार्यक्रम होऊ लागले..पुढे  हफ्तेबाजी सांभाळणारी एक पत्रकारांची गँग निर्माण झाली, हा त्या अधिका-याचा खास..तो त्याचा.. हे खुलेआम अगदी अभिमानाने सांगितले जाऊ लागले.. डान्सबारच्या काळात ही टोळी मोठी झाली..दोन्ही बाजुने कट काढू लागली..आज त्यातले अनेक मोठे व्यवसायिक, काही बिल्डर तर काही चित्रपट निर्माते झाल्याच्या कहाण्या ऐकायला मिळतात..दुसरीकडे पोलिस कमाईचे थक्क करणारे आकडे ऐकायला मिळतात, क्रिम पोस्टिंग, बॉलीवूड सर्कलमधील उठ-बस..चित्रपट तारखांसोबत अफेयर्स ते राजकारण प्रवेश..अनेकांच्या नावाने समाज निर्मितीचे तत्वज्ञान, उपदेशाचे डोस काय अन काय..असंख्य कहाण्या..
 
  या सर्व घटनांचा परिणाम आज असा झाला आहे की ज्या मिडियाच्या जोरावर पोलिस निर्धास्त झाले त्या मिडियाला वाकवायला, पत्रकारांचा छळ करायला पोलिसांना फार आवडू लागले, व्यवसायाने पत्रकार आहे म्हटल्यावर पोलिस अधिकचा अन्याय करतात, अडवणूक करतात..विरोधात तक्रार आल्याक्षणी गुन्हे दाखल केले जातात..विरोधात बातमी दिली की  कायदेभंगाचे खटले दाखल केले जातात..ग्रामीण भागात खंडणीचे- नक्षलग्रस्त भागात असेल तर नक्षल समर्थक असे गंभीर गुन्ह्यांची कलमं  सर्रास लावली जातात..पोलिसांच्या कचाट्यात सापडलेले पत्रकार अक्षरशः देशोधडीला लागल्याची असंख्य उदाहरणं आहेत..आज गुन्हे पत्रकारिता जवळपास संपली आहे, शिल्लक आहे ती फक्त पोलिस अधिका-यांचे पीआर करणारी..त्यातून पोलिस थेट पत्रकारांवर अन्याय करु लागले तरी इतर पत्रकार या कारवाईचे समर्थन करतात..ही सवयही आता नवीन राहिली नाही..सगळ्यांच्या अंगवळणी पडली आहे..पुर्वी तात्काळ अन्यायाविरुध्द निवेदने घेऊन पत्रकार संघटना मंत्र्यांकडे, सरकारकडे जात असत..कारवाई करुन घेतल्याशिवाय माघार नसे..हळुहळू मंत्री पत्रकार कसे दोषी असतात ते सांगू लागले, पोलिसांची बाजू घेऊ लागले, पोलिसांवर कारवाई तर दूरच उलट मार खाल्लेला पत्रकारच कसा दोषी आहे, मंत्री हे आपल्या दालनात बसुन सांगू लागले, संघटना असेलही असे म्हणत निरुत्तर होऊ लागल्या..
 
आता सापडले आहेत तर वचपा काढण्याची संधी सोडतील ते राजकारणी कसले..!!..प्रकरणात संशय निर्माण करायचा म्हणजे फार काही करावे लागत नाही..हे राजकारण्यांनी जाणले आणि पत्रकारांवर होणा-या अन्यायाविरुद्ध न्याय मिळणे दुरापास्त झाले..यातून पत्रकरिता आणखी बदनाम झाली..पोलिस-राजकारण्यांच्या युतीने पत्रकारितेचा धाक संपवला..पत्रकारांना लाचार करुन टाकले..कालांतराने पत्रकारावर हल्ला झाला की निषेध व्यक्त करत विविध पत्रकार संघटना नेत्यांकडे जाण्याची स्पर्धा करताना दिसू लागले..मंत्री-मुख्यमंत्र्यांसोबत निवेदन देताना हसत फोटो काढुन हा कार्यक्रम संपतो..राजकीय बीट पाहणारे पत्रकार यात पुढे असतात..ते आपापली टोळी घेऊन जातात..घडते एवढेच..पुढच्या घटनेपर्यंत...सगळीकडे शांतता..अलिकडे पत्रकारांवर हल्ला झाला की मंत्री-मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधीच..असेच स्वरुप आज विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी आणले आहे..पत्रकार हल्ला विरोधी कायदा करण्यास कोणतेही सरकार-कोणताही पक्ष इच्छुक नव्हता..म्हणून शेवटी कायदा झाला पण तो ही उपरा..त्या कायद्याचा कसलाही धाक निर्माण झाला नाही..संघटना मात्र या उप-या कायद्याचे श्रेय घेण्याची स्पर्धा करताना दिसतात..
 
.......एकूण अशा स्थितीत फोटोग्राफर, कॅमेरामन ओह सॉरी..फोटो जर्नलिस्ट किवा व्हिडीओ जर्नलिस्टला मारहाण झाली तर काय होणार..? आयपीएस सोडा एखाद्या 12 नापास पोलिस शिपायाने आज एखाद्या संपादकाला खुलेआम चोपले तरीही निषेधाचे इमोजी टाकण्यापलीकडे काहीही होणार नाही...!! 
कोई शक...? 
 
- रफ़ीक मुल्ला