पत्रकारितेतील सवाई अनंतराव अर्थात अनंत भगवान दीक्षित यांचा एकांती मृत्यू चटका लावून जाणारा आहे.आयुष्याच्या संध्याकाळी शारीरिक व्याधींनी त्रस्त शरीराला सोसाव्या लागलेल्या मरणकळा.त्याहीपेक्षा तुटलेला विद्याव्यासंग,सक्तीची विश्रांती.लादलेलं एकाकी-तुटलेपण,आणि त्यामागची व्याकुळ हतबल असहायता.हे सगळं सहनशीलते पलीकडचं होतं.
केशवसुतांच्या कवितेतील 'कंटकशल्ये बोथटली..राग निमाले' अशी अवस्था.जिव्हाळ्याची माणसं सातासमुद्रापार.आयुष्याची सोबत केलेली जोडीदारीण,एक भावनिक आधार.पण तोही गलितगात्र.कधीकाळचे सखे,सोबती,मित्र,सहकारी,शिष्य,स्नेही,संधीदाते,लाभार्थी अशा बहुतेक सगळ्यांनी 'कालाय तस्मै नम:'म्हणत पाठ फिरवलेली.जवळची म्हणवली जाणारी आप्त मंडळी आलीच कधी भेटायला तर समोर हा जीर्ण शीर्ण अस्थी पंजर झालेला क्लांत देह.भेटणाऱ्यांच्या डोळ्यात करुणा आणि सहानुभूतीचे अंतर.ही एक विकलांगताच.रात्रंदिवस बेडवर खिळून तासनतास छताकडं पाहात,अंदाजानेच घटका मोजीत प्रचंड कोलाहलाने गजबजलेल्या जगात निर्मनुष्य खोलीत भयाण शांततेत नुसतंच पडून राहणं.यातली व्याकुळता ही अवस्था भोगणारच जाणो.आयुष्यभर माणसात आणि पुस्तकात वावरलेल्या,खऱ्या अर्थाने 'कर्म'ठ,व्यासंगी असलेल्या अनंत दीक्षितांना आयुष्याच्या अखेरीस हा सक्तीचा व्याधिग्रस्त एकांतवास भोगावा लागला.मध्यंतरी कोल्हापूरकरांना लिहिलेल्या एका पत्रात अत्यंत सद्गदित होऊन त्यांनी आपल्या मनातील ही सल व्यक्त केली होती.त्यात त्यांनी व्यक्त केलेली खंत म्हणजे एका संस्थान खालसा झालेल्या सम्राटाचा आर्त आणि मूक आक्रोश होता.
जगण्याने छळलेल्या अंतरावांची अखेर मरणाने सुटका केली.६७ वर्षांच्या आयुष्यात जवळपास चाळीसवर्षे त्यांनी पत्रकारिता केली.मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे पण ते अस्सल पुणेकर झाले.पुणेकर म्हणूनच जगले.नोकरी निमित्त प्रदीर्घ काळ ते कोल्हापुरात राहिले.पण पुणेकर म्हणूनच.दैनिक सकाळ ही त्यांची कर्मभूमी.पण त्यांनी संचार, केसरी,लोकमत असाही प्रवास केला.अगदी शेवटी शेवटी ते दिव्य (खरे तर दिव्यांग) मराठीतही असावेत.( असावेत अशासाठी म्हटले की भोपाळहून आलेल्या या दिव्यांग भोपळ्याने आमच्या अनेक दिग्गज आणि जेष्ठ मराठी पत्रकारांना अक्षरशः लेकीच्या घरच्या तूप-रोटीचं अमिष दाखवून भोपळ्यात बसवून अक्षरशः टुणूक टुणूक पळवले आणि विकलांग करून सोडून दिले.अनंतरावांसारखे 'दक्ष' पत्रकार देखील काहीकाळ या सुरमा भोपालीच्या कच्छपी लागले होते.असो) अनंतरावांची पत्रकारिता हस्तिदंती मनोऱ्यातली,साहेबी थाटाची,द्राविडी प्राणायाम करणारी,चौकटिबध्द,पुस्तकी स्वरूपाची होती.
काहीतरी हटके,चौफेर फटके,ऑफबीट वगैरे त्यांचा पिंड नव्हता.किंबहुना त्यांच्या दृष्टीने असे करणे पत्रकारितेतील व्यभिचार होता.सकाळला त्यांनी भाषेची,त्याहीपेक्षा शिष्टाचाराची शिस्त लावली.तसे ते मनाने निर्मळ आणि प्रेमळ होते.विशेषतः कोणाबद्दलही पूर्वग्रह किंवा आकस गैरसमज पोसण्याची त्यांची वृत्ती नव्हती.पण गालावरच्या मशीमुळे ते उग्र आणि करडे वाटत.शिवाय त्यांचा तो कायम धीर गंभीर चेहरा.मुद्देसूद,संथ,उच्चारावर भर देत विद्वत्ताप्रचुर बोलणं.दीर्घ पॉज.हे सगळं नवख्या पत्रकारांच्या अंगावर सर्रकन काटा आणणारं,आणि पोटात भीतीचा गोळा उठवणारं असायचं.बातमीत बाष्कळता आणि स्वतःची अक्कल पाजळलेली,उगाचच अंदाज पेरलेले ते अजिबात खपवून घेत नसत.
लेख असो,बातमी असो पत्रकाने कुणाही बाबतीत आणि कशाच्याही संदर्भात खासगी आकस किंवा लोभ बाळगू नये.तटस्थ पत्रकारिता करावी किंवा मग हा धंदा सोडावा असा त्यांचा दंडक असे.अखेरी अखेरीस काही काळ ते टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांच्या चर्चेतही दिसत.पण तिथला तमाशा पाहून ते बहुदा उबगले असावेत.कारण मग पुढे त्यांनी पत्रकारितेला कायमचा आणि अखेरचा दंडवत घातला.अंथरुणच धरले.परवा तेही सुटले.त्यांच्या बद्दल कोण काय लिहील माहिती नाही.गळे काढणारे पुष्कळ असतील.त्या उडदामाजी काळे गोरे निवडण्यात काही अशीलही नाही.अनंतराव अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत,एक अभ्यासू,धीर गंभीर वृत्तीचा,आखीव रेखीव काटेकोर पत्रकारिता करणारा,कामावर निष्ठा ठेवणारा,उदंड वाचन आणि अभंग चिंतन करणारा गाभारा आता रिता झाला आहे.त्यांचं वक्तृत्व टाळीबाज नव्हतं.पण त्याला अभ्यासाची धार मूल्यवादी किनार होती.साहित्य आणि कलेच्या प्रांतातील त्यांचा संपर्क आणि वावर समृद्ध होता.
आजकालच्या उथळ उतावीळ आणि उनाड पत्रकारितेत दीक्षितांसारखा संयत साक्षेपी पत्रकार कुठे बसणार होता ? हे सगळे त्यांना पाहवले आणि सहावलेही नसते.खरेच सांगतो.म्हणजे हे सांगायलाच हवे.अंतरावांची आणि माझी त्यांच्या उभ्या आणि माझ्या आडव्या आयुष्यात एकदाही भेट झालेली नाही.ते मला नावाने सुद्धा ओळखत नसावेत.ते पत्रकारितेतून निवृत्त झाल्यावर माझं गलबत या बेटाला लागलं.त्यांची माझी गाठभेट झाली नाही हे एका अर्थाने बरेच झाले.त्यांना माझी शैली भावली नसती आणि मला त्यांची पठडी.पण तरीही तो संघर्ष मजेदार झाला असता.ते घडणे नव्हते.असो.शीर्षकात मी त्यांचा उल्लेख 'सवाई अनंतराव'केला.त्याचेही स्पष्टीकरण आवश्यक आहे.दैनिक मराठवाडाचे संपादक अनंतराव भालेराव आणि अनंतराव दीक्षित या दोन व्यक्तिमत्वात अनेक बाबतीत साम्य होते.
आपल्या मतांबाबतीतला दुराग्रह आणि हट्ट हा दोघांचाही स्थायीभाव होता.ते अनंतराव आणि हे सवाई अनंतराव.तत्वांशी तडजोड हा शब्द दोघांच्याही शब्दकोशात नव्हता.त्यामुळेच कदाचित दोघांचीही अखेर प्रतारणेच्या बाणांवर शरपंजरी पडून मृत्यूच्या प्रतीक्षेत तगमगत झाली.त्यांच्या अजरामर वेदनांबद्दल करुणा भाकण्यापलीकडे आपण माणसे करू तरी काय शकतो ? हे ईश्वरा जमल्यास आमच्या संवेदना त्यांच्या आत्म्यापर्यंत पोहचव.कदाचित त्यांच्या खोल जखमेवर एक फुंकर.
-रवींद्र तहकिक
7888030472

0 टिप्पण्या