अनंत दिक्षित : एक निकोप आणि भला माणूस ...

सरांच्या अकाली गेलेल्या मुलीनं, अस्मितानं लिहिलेलं परतीचा पाऊस हे पुस्तक मला वाचायचं होतं. ते पुस्तक पेठेत मिळालं नाही. म्हणून प्रकाशक कोण हे विचारण्यासाठी दिक्षित सरांन गेल्याच आठवड्यात फोन केला. पुस्तकाचे प्रकाशक प्रदीप खेतमर असून ते रसिक मध्ये मिळेल असं सर म्हणाले.सर नेहमीप्रमाणेच अगत्यपुर्वक आणि ओढीनं बोलत होते. सध्या दर दोन दिवसांनी डायलिसिस चालू असल्यानं तब्बेत बरी नसते. ट्रीटमेंटवर खर्च होणारा पैसा, वेळ आणि वेदना यांच्याबद्दल सर बोलले. मला ऎकून वाईट वाटलं. मी आठवड्याभरात भेटायला येतो म्हणालो. तेव्हा मात्र सर खुपच कळकळीनं म्हणाले, नक्की या. लवकर या. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. हललो. खूप कालवाकालव झाली.

पण बाहेरगावी होतो. तर आज बातमी आली की सर गेले. मी नियतीवादी कधीच नव्हतो. पण निसर्ग,नियती किंवा अन्य जे काही असेल ते इतके कठोर का असते? गेली किमान ३० वर्षे माझी सरांशी मैत्री होती. आरपार, नितांत भला माणूस. अत्यंत संयमी. सम्यक. गुणी कन्या, अस्मिता आजारपणानं अकाली गेली. पत्नी, अंजलीताई आजारी असतात. थोरली मुलगी अमृता आणि नात चार्वी स्कॉटलंडला असतात. आता सरही गेले. एव्हढी दु:खं एखाद्या भल्या माणसाच्या वाट्याला का यावीत?

सर कोल्हापूर सकाळला संपादक असताना माझ्या शाहू स्मारकातील भाषणांना प्रेक्षकात येऊन बसायचे. भेटून अभिप्राय सांगायचे. एकदा दुसर्‍या दिवशी त्यांना पुण्याला बैठकीला यायचं होतं. म्हणाले, चला, माझ्या गाडीतून सोबत जाऊ. त्यावेळी ५ ते ६ तास लागायचे कोल्हापूर पुणे प्रवासाला. गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते कळलंच नाही.

पुढं ते पुण्याला आले. मुख्य संपादक झाले. पदाचा दर्जा आणि पगार वाढला तरी सरांच्या वागण्याबोलण्यात किंचितही फरक पडला नाही. दिक्षित आडनाव सोडलं तर सरांचं सगळं वागणं- बोलणं एव्हढं बहुजनांसारखं होतं की कुणी मुद्दाम सांगितल्याशिवाय ते ब्राह्मण असावेत असं वाटायचंच नाही. कॉ गोविंद पानसरे आणि सर जानी दोस्त.

औंधच्या त्यांच्या घरी कितीदा तरी गेलोय. मनसोक्त गप्पा मारल्यात. पुस्तकांची देवाणघेवाण केलीय. विनायकराव कुलकर्णी आणि अनंत दिक्षित या दोघांनी आयुष्यभर बहुजन समाजाबद्दल कळवळा आणि आस्था बाळगली.

भांडारकरवर हल्ला झाला तेव्हा सर पुणे सकाळचे संपादक होते. त्यांनी हेडलाईन केली आणि हल्लेखोरांबद्दल क्ठोर शब्द वापरले. मला त्यांची भुमिका पटली. प्रगतीशील विचारसरणी, मागास-दुबळ्या समाजांविषयी कळवळा आणि वैचारिक स्पष्टता हे त्यांचे गुणविशेष. माझ्याबद्दल त्यांनी कायम आपुलकी बाळगली. हरी, तू बहुजन समाजाचं वैचारिक नेतृत्व करायला हवं असं कायम प्रोत्साहन द्यायचे. कोल्हापूरचा मोकळेढाकळेपणा आणि पुणेरी चकटफू,आप्पलपोटी पेठीयवृत्ती यावर ते सडकून टिका करायचे.

सकाळने त्यांना अवमानकारक पद्धतीनं मुख्य संपादकपदावरून जायला सांगितलं. कटुता न ठेवता त्यांनी पद सोडलं. सिंबॉयसिसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात त्यांना निवासी लेखकाचे पद मिळाले. पण आजारपणामुळे त्यांना कार्यकाळ पुर्ण करता आला नाही.

अधूनमधून सर एखाद्या वाहिनीवरील चर्चेत दिसायचे. अतिशय समतोल बोलायचे. कित्येकदा माझ्या आवडीच्या विषयावर बोलायचं असलं तर फोन करून मुद्देही विचारायचे. कोणताही अहंकार नाही. अतिरेकी भुमिका नाहीत. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी एका मागासवर्गीय अर्थशास्त्रज्ञाची नियुक्ती झाली तेव्हा सरांना कोण नांद झालेला. मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे सरांनी मोहन धारियांच्या घरच्या बैठकीत मन:पुर्वक आभार मानलेले. अलिकडे हे अर्थतज्ञ आपल्या बापाला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधार्‍यांचा पट्टा गळ्यात बांधून मिरवू लागले. सरांना खूप दु:ख झाले. सत्तेचा लोभ, खासदारकीचा लोभ माणसाचं किती आणि कसं पतन घडवतो यावर सर दोनतीनदा बोलले.

मध्यंतरी एका सामाजिक-राजकीय बैठकीत सर भेटले तेव्हा त्यांची तब्बेत खूपच खालावलेली दिसली. चरकलो.

सर एव्हढ्या लवकर जातील असं नव्हतं वाटलं. डेस्टीनी एव्हढी हलकट असते? ती भल्या माणसांशी असं का वागते?

दीक्षितसर, तुम्ही आयुष्यभर मूल्यनिष्ठेनं जगलात. आरपार भलेपणानं जगलात.पानावलेया डोळ्यानं तुम्हाला निरोपाचा सलाम करतो.

-प्रा.हरी नरके

( प्रा. हरी नरके यांच्या फेसबुक वॉलवरून साभार )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या