प्रसारमाध्यमांवरील 'कोरोना इफेक्ट' !


कोरोना विषाणू हा मानव जातीच्या इतिहासात आरोग्य क्षेत्रात जशी विभाजनाची एक उभी रेषा मारणारा ठरलाय. अगदी त्याच प्रकारे, प्रसारमाध्यमांच्या इतिहासातही याला महत्वाचे स्थान राहणार असल्याचे आताच स्पष्ट झालेले आहे. यात अगदी 'वर्क फ्रॉम होम'पासून ते मीडियाच्या विविध क्षेत्रांमधील बदलांवर खूप लिहण्यासारखे आहे. कोरोनामुळे मुद्रीत माध्यमाचा अंत जवळ आला असे मानता येणार नाही. मात्र या क्षेत्रात काम करतांना गाफील असणार्‍यांना कोरोनाने जोरदार धक्का दिला आहे. येत्या काही वर्षांमध्ये मीडियात नेमके कसे काम चालणार याची चुणूकदेखील या कालावधीत दिसून येत आहे. कोरोनाचा मीडियावरील परिणाम अनुभवतांनाची काही निरिक्षणे मला नोंदवावीशी वाटत आहेत.


१) मी आधीच आपण लवकरच 'पूल जर्नालिझम'कडून 'पुश जर्नालिझम'कडे वळणार असल्याचे नमूद केले होते. याबाबतचा लेख माझ्या ब्लॉगसह अन्य सोशल प्रोफाईल्सवर उपलब्ध आहे. आपण आजवर 'पूल' जर्नालिझमचा वापर केला आहे. कुणाकडून तरी मी वर्तमानपत्र घेईल, कुणा चॅनलवर बातम्या पाहिल असा फॉर्मेट आजवर प्रचलीत झालेला आहे. तर भविष्यात 'पुश जर्नालिझम' येणार आहे. मला हव्या असणार्‍या बातम्या या माझ्या इनबॉक्समध्ये, चॅटींग मॅसेंजरमध्ये अथवा अन्य टुल्समध्ये मीडिया हाऊसेसकडून 'पुश' केल्या जाणार आहेत. यात मला हवे ते कंटेंट हव्या त्या इको-सिस्टीममध्ये आणि हव्या त्या वेळेस वाचणार वा पाहणार आहेत. कोरोनाच्या कोलाहलात पुश जर्नालिझमचे महत्व अधोरेखीत झाले आहे. अगदी वर्तमानपत्रांचे मालक वा संपादकापासून ते गावातील वार्ताहर वा कंपनीतील शिपाईसुध्दा फक्त आणि फक्त ई-पेपर 'पुश' करतांना दिसून आला आहे. भविष्यात हा प्रकार रूढ होणार असल्याचे आजच लिहून ठेवा.

२) १६ नोव्हेंबर २०१६ रोजी मंत्रालयात माहिती व जनसंपर्क खात्यातर्फे आयोजित कार्यक्रमात मी हायब्रीड मीडियाबाबत अगदी सविस्तर विवेचन केले होते. यात मी सुमारे दोन तास प्रेझेंटेशनसह भविष्यातील संकरीत मीडियाबाबत सूतोवाच केले होते. आज 'हायब्रीड मीडिया' अनिवार्य असल्याचे अधोरेखीत झाले आहे. कुणी वर्तमानपत्रात काम करतोय की चॅनलमध्ये, पोर्टलमध्ये की नियतकालिकामध्ये याचा काहीही फरक पडत नाही. मात्र एकापेक्षा जास्त ठिकाणी उपलब्ध असणारा मीडियाच भविष्यात तग धरू शकणार आहे. आता फिजीकल आवृत्तीला अडचण आल्यावर डिजीटलकडे धाव घेणारी वर्तमानपत्रे ही याचीच उदाहरणे आहेत. आपण 'क्रॉस-प्लॅटफार्म' या प्रकारातील प्रसारमाध्यमांच्या युगात कधीच प्रवेश केलेला आहे. यामुळे कोरोनासारख्या आपत्तीमुळे आपले माध्यम हे काही दिवस बंद राहिले तरी याला माझ्याकडे पर्याय हवा हा धडा मीडिया हाऊसेसला मिळाला आहे. आणि या संकरीत माध्यमात पारंगत असणारेच मीडियातील आपली नोकरी सांभाळू शकतील हे सांगण्यासाठी आता ज्योतिष्याची आवश्यकता उरलेली नाही.

३) कोरोना इफेक्टमुळे मुद्रीत माध्यमात काम करणारे हजारो कर्मचारी व पत्रकारांची मानसिकता बदलत असल्याची बाब ही समाधानकारक मानावी लागणार आहे. मी आधी बातमी लिहत होतो. यात फोटो असायचे. हळूहळू बातमी ही मल्टी-मीडियाने युक्त बनली. यात ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट आले. आता तर सर्व फॉर्मेट एकमेकांमध्ये विलक्षण मिसळून गेले आहेत. मी स्वत: हे सगळे विविध फॉर्म्स मनमुरादपणे वापरतो. यात एखादे माध्यम कमी प्रतिचे वा दुसरे उच्च असा दावा मी कधीही केला नाही. व भविष्यात करणारही नाही. मात्र मी हवेतील गोष्टी सांगतो असे माझ्याच तोंडावर सुनावणार्‍या काही पत्रकार मित्रांना आता बातम्यांची पीडीएफ फाईल वा त्यांच्या पोर्टलची लिंक शेअर करतांना पाहून गंमत नव्हे तर समाधान वाटते. कारण त्यांनी बळजबरीने का होईना बदल स्वीकारलाय हे निश्‍चित. असो. लवकरच वर्तमानपत्रे सुरू होतील. हा कोलाहलदेखील कमी होईल. मात्र कोरोनाने पत्रकारांना एक सकारात्मक धडा दिल्याचे माझे मत आहे.

(वर्क फ्रॉम होम तसेच डिजीटल मीडियातील अन्य घडामोडींबाबत लवकरच सविस्तर व्यक्त होतो.)


- शेखर पाटील
जळगाव 

Post a Comment

0 Comments