कोरोनामुळे मराठी मीडियात ४० टक्के कॉस्ट कटिंग होणार ?


कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे, त्यामुळे लॉकडाऊन वाढत चालला आहे. त्याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे, तसाच मराठी मीडियाला बसला आहे. अंक वितरण करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे, तसेच अंक प्रिंट केला तरी अजिबात जाहिराती नाहीत, त्यामुळे वृत्तपत्र व्यवसाय संकटात सापडला आहे. 

मराठी वृत्तपत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक वृत्तपत्रांनी मार्च महिन्याचे वेतन कपात करून  दिले. एप्रिल महिन्याचे वेतन होईल की नाही अशी भीती आहे. त्यात अनेक वृत्तपत्रानी टप्याटप्याने  ४० टक्के कॉस्ट कटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, असे खात्रीशीर वृत्त आहे. 

 पुण्यनगरीने याची पहिली सुरुवात केली. मुख्य संपादक असलेल्या राही भिडे, सांगली आवृत्तीचे संपादक अशोक घोरपडे यांना नारळ देण्यात आला. तसेच अनेक उपसंपाद्क, रिपोर्टर यांना घरी बसविले असून, त्यांना पुढील आदेश येईपर्यंत घरीच राहा, इतकेच काय तर वेतन मिळणार नाही, असे तोंडी बजावण्यात आले आहे. 

पुढारीने मराठवाडयातील  तोट्यातील अनेक जिल्हा कार्यालय १ मेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे फक्त जिल्हा प्रतिनिधी राहील आणि तो घरातून काम करेल,बाकी सर्व कर्मचाऱ्यांचा राजीनामा घेण्यात येत आहे. 

लोकमतचे मराठवाडा आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन मागच्या वर्षी सेवानिवृत्त होणार होते, पण एक वर्षे मुदतवाढ देण्यात आली होती, यंदा त्यांना कायमचा निरोप देण्यात येणार असल्याचे समजते. दुसरे संपादक चक्रधर दळवी हेही लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. महाजन गेल्यानंतर संपादक म्हणून धर्मराज हल्लाळे यांचे नाव आघाडीवर आहे. हल्लाळे हे ऋषी दर्डा यांचे जवळचे मानले जातात. 

त्याचबरोबरअनेक मराठी वेबसाइट बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हिंदुस्थान टाइम्सने आपली मराठी वेबसाइट बंद केली आहे. त्यामुळे विश्वनाथ गरुडसह अनेक कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही वृत्तपत्र मालकांनी असे धोरण आखले आहे  की, ५५ वर्षांपुढील कोणत्याही कर्मचाऱ्याला पे- रोलवर ठेवायचे नाही. सेवानिवृत्तीचे वय ५५ ठेवायचे . त्यामुळे ज्येष्ठ कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.

पानाची संख्या कमी होणार ... 
जाहिरातीचा एकूण बिझनेस पाहता, साखळी वृत्तपत्रे आपल्या पानाची संख्या कमी करणार आहेत. मुख्य अंक ८ पाने आणि पूलआऊट चार पाने राहील. जिथे होम आवृत्ती आहे, तिथे मुख्य अंक १० पाने राहील.   पूर्वी प्रत्येक जिल्हयाला चार पाने पूलआऊट असायचे. आता दोन आणि तीन जिल्हे मिळून चार पाने पूलआऊट असणार आहेत. त्याचा परिणाम कर्मचारी कपातीवर होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या