वृत्तपत्रांचे रद्दडीकरण...



वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. अंतिमतः लोकांना जबाबदार असणारे हे माध्यम नैतिकतेचा कितीही टेंभा मिरवत असले, तरी प्रत्यक्षात समाजमनाचा आरसा असलेल्या वर्तमानपत्रांचा खरा चेहराही आता समोर येत आहे. लॉकडाउनच्या काळात एखाद दुसरा अपवाद वगळता ‘एकजात’ सर्व वर्तमानपत्रे ही अधिक समान असल्याचे ठळकपणे दिसून आले आहे. कोरोनाने अनेक उलथापालथी घडविल्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विश्वासार्हता व मूल्यात्मकता यासाठी ओळखली जाणारी मुद्रित माध्यमेही त्याने उघडी पाडली. हे पाहता या माध्यमास वृत्तपत्रे संबोधावे की ‘अनावृतपत्रे’, असा प्रश्न  पडावा. अंती वृत्तजगताचे हे रद्दडीकरणच या क्षेत्राची 'रद्दी' तर करणार नाही, ही भीती अधिक गडद झालेली पहायला मिळते.

वर्तमानपत्रांचे अर्थकारण हे मुख्यतः जाहिरातीवर अवलंबून असते, हे निःसंशय. लॉकडाउन काळात माध्यमांचे कामकाज काही काळ ठप्प झाले. जाहिरातीचा स्रोत आटला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्याचा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर काही प्रमाणात परिणाम होणे, हे स्वाभाविक म्हणता येईल. तथापि अनेक दैनिकांनी त्याचा अतिबाऊ करीत कर्मचाऱ्यांचे जितके म्हणून आर्थिक शोषण करता येईल, तितके करण्यात धन्यता मानल्याचे दिसून येते. लपूनछपून किंवा आडूनआडून जवळपास बहुतांश दैनिक पेडन्यूजचा आधार घेतात. निवडणूक काळातील जाहिरातींचे पॅकेज म्हणजे पैशाचा धूरच असतो. कुणीही ज्येष्ठ व प्रामाणिक पत्रकार हे मान्य करेल. सणासुदीच्या काळातील जाहिरातींची दिवाळी, त्याचे बातम्यांवर होणारे आक्रमण, याचा कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक पत्रकाराला फटका बसत असतो. अनेकदा बातमीला अपेक्षित जागा मिळत नाही किंवा ती दुसऱया-तिसऱया दिवसावरही ढकलली जाते. बरे इतकी सगळी सोन्याची लंका तेजाळत असताना उत्पन्नवाढीच्या या सुवर्णकाळातही कुठल्या दैनिकाने कर्मचाऱ्यांना वाढीव पगार, भत्ता दिल्याचे ऐकिवात नाही. किंबहुना, हीच दैनिके लॉकडाउनच्या पहिल्याच महिन्यात पार तोट्यात जातात नि पार अर्धीअधिक वेतनकपात करतात, तेव्हा त्याला आश्चर्य म्हणायचे नाही, तर दुसरे काय?

पत्रकारांची तासणी

खरे तर पत्रकार हाही कामगारच. कामगाराला किमान कामाचे तास तरी आखून दिलेले असतात. 8 तास, 12 तास वगैरे. या क्षेत्रात अनेक पत्रकारांना यापेक्षा अधिक तास मोजावे लागतात. वर्षानुवर्षे कोणतीही खळखळ न करता इनामेइतबारे पत्रकार ही भूमिका बजावत आहेत. मात्र, तासनिहाय मोबदल्याची पद्धत नसल्याने तो मिळत नाही. विनोदाची बाब ही, की काही दैनिके आता कामाचे तास मोजू लागले आहेत. काहींचे दिवस कमी करण्यात आलेत. कुणाला ताप्तुरती विश्रांती, तर कुणाला कायमची. इथूनतिथून तासणी सुरू आहे, तीही चुकीच्या निकषांवर.

कपातीतही भेदभाव

नाजूक वळणावर काही कठोर निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरते, हे मान्य करुयात. परंतु, त्यातही आपपरभाव बाळगला जातो. तसे या क्षेत्रात अनेक ठिकाणी निष्क्रिय, अत्यंत सुमार, एक वाक्यही धड लिहिता न येणारे कॉपी पेस्टबहाद्दर कमी नाहीत. पालीसारखे या क्षेत्राला ते चिकटून बसलेत. वास्तविक, वर्तमानपत्रांच्या अवनतीस, दर्जास कारणीभूत असलेल्या या 'सुमारांची सद्दी' या काळात संपली असती किंवा यानिमित्ताने थोडीशी साफसफाई झाली असती, तर हरकत नव्हती. त्यातून पत्रकारितेचेच अंतिमतः भले झाले असते. परंतु, या 'चमच्यांना' वाचवण्यात अगदी वरपर्यंतची सूत्रे हलतात नि प्रतिभावानांचा मात्र गेम केला जातो, हा या व्यवस्थेचा ‘फाटके’पणाच होय.

चाटुगिरी की जय हो...

चापलुसी, चाटुगिरी, चमचेगिरी अन् हुजरेगिरी हा तर अलीकडे या क्षेत्रात टिकून राहण्याचा निकषच बनलाय. जितकी चाटुगिरीची क्षमता अधिक तितका तो अधिक गुणवान, सक्षम, असा सगळा प्रकार आहे. हे चमचे कामापेक्षा बऱ्याचदा 'टिपर' म्हणून काम करतात. कोण काय बोलतो, कुणाबद्दल बोलतो, काय करतो, किती वाजता येतो, जातो वगैरे सगळी माहिती संकलित करण्यासाठी या टिपऱ्यांचा वापर केला जातो. केवळ त्यापोटीच त्यांना पोसण्यात येते. तेव्हा मात्र कोणतीही तूट वा लॉस होत नाही, हे अनाकलनीय. विशेष म्हणजे कुठल्याही अरिष्टातून ही माणसे सहिसलामत सुटतात.

‘प्रभुत्व’ नसणाऱ्या पत्रकारांना अच्छे दिन!

आजही वेगळी स्थिती नाही. आता तर या उपससुंभांनी, कुठल्याच स्तरावर ‘प्रभुत्व’ नसणाऱ्या पत्रकारांनी उचल खाल्लीय. त्यांच्या पेताड पत्रकारितेचे महत्त्व असाधारण वाढलेय. 'माकडांच्या हाती कोलीत दिल्यावर जे घडते, तेच यांच्या हाती कलम आल्याने होणार. हे वादळ निसर्गपेक्षा भयानक आहे. त्यातून सरतेशेवटी माध्यम क्षेत्राचीच हानी होणार आहे.'

संवेदनशीलता, अभ्यास वा समज असलेली माणसे हे पत्रकारितेचे वैभव आहे. मात्र, वर्तमानपत्रीय ‘चौकटी’सारखे त्यांना तेवढ्यापुरतेच सीमित ठेवले जाते. तसे पेपरमधून नित्यनेमाने विचार मुबलक झाडले जातात. जगाच्या वैचारिकतेचा वसा आपणच घेतला आहे, असाच सारा हा आविर्भाव असतो. प्रत्यक्षात इथल्याएवढे कर्मदारिद्र्य कुठेही पहायला मिळत नाही. सांप्रत काळात वाहिन्या, सोशल मीडियाचे आव्हान मोठे आहे. सोशल मीडिया वा वेबसाईटच्या उथळ पत्रकारितेने भ्रमनिरास केला आहे. अशात विश्वासार्हता वा मूल्यात्मकेच्या बळावर आपले स्थान अधिक ठळक करण्याची संधी असताना वर्तमानपत्रांनीही   शेवटी आपली जात दाखवून दिली आहे. जगाला शहाणपणा शिकविणारे हे क्षेत्र प्रत्यक्षात किती संकुचित आहे, याचे लॉकडाउन काळात अधिक तीव्रतेने दर्शन घडलेले पहायला मिळते.

पत्रकारितेच्या भवितव्याबाबत सध्या चिंता व्यक्त होते आहे. ती या व्यवस्थेच्या दृष्टीकोनामुळे अधिक चिंताजनक बनली आहे. पूर्वी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राची रद्दी होत असे. आता ती छापल्याछापल्या होते. अशा टप्प्यावर रद्दडांचा या क्षेत्रातील प्रादुर्भाव, हे वृत्तपत्रे मरणपंथाला लागल्याचे खरे लक्षण मानता येईल.

- तात्याबा खोडमोडे

Post a Comment

0 Comments