पुण्यनगरीचे  'बाबा' गेले !
पुणे -  दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता ऊर्फ बाबा शिंगोटे यांचे आज,(6 ऑगस्ट ) रोजी दुपारी एक वाजता राहत्या घरी गायमुख वाडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

बाबांचा जन्म उंब्रज (ता. जुन्नर) या गावी 7 मार्च 1938 रोजी झाला होता. चौथी शिक्षण झालेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी- व्यवसायासाठी मुंबई गाठली. त्या ठिकाणी सुरुवातीला फळ विक्री, त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले.

 संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे बाबा साक्षीदार होते. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल उमजेल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. 1994 मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायंदैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरू केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली. 

मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, तीन मुली,  सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

 बाबांच्या पार्थिवावर उंब्रज १ येथील पुष्पावती नदीच्या काठावरील गयाबाई अनंता शिंगोटे अमरधाम येथे सायंकाळी साडेपाच वाजता सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबांचे पुत्र संदिप शिंगोटे यांनी बाबांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. 

Post a Comment

0 Comments