संधी साधूंची सिंहासन' बत्तीशी आणि नवा दिगू टिपणीस !


पत्रकारितेत गेल्या दशकात ' न-मुलाखत' नावाचाही एक प्रकार आला होता.आजकाल तो कुठे दिसत नाही ,पण नुकताच तो अजून जिवंत असल्याचा अनुभव लोकमतचे पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी दिला.


अरुण साधूंच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या कादंबऱ्यांवर आधारित विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या पटकथेवर जब्बार पटेलांनी काढलेला 'सिंहासन' हा सिनेमा आठवा,त्यातला राजकारणातले छक्केपंजे पाहून शेवटी वेडा झालेला, निळू फुलेंनी साकारलेला दिगू टिपणीस आठवा,आणि त्या रोल मध्ये 'आपला' अतुल कुलकर्णी बसवा.इथे मी अतुल कुलकर्णी साठी 'आपला' असा आपुलकीचा शब्द यासाठी खर्ची घातला (अर्थातच अक्कलखाती) की मागवून आपल्या अतुल'भाई'नं फडणवीसांप्रमाणे 'मी ब्राम्हण असल्यामुळे  मला टार्गेट केलं जातंय ' असं म्हणायला नको.शिवाय 'भाई'शी आपला (माझा या अर्थी) काही वैयक्तिक पंगा नाही.भाई मला वयाने आणि अनुभवानेही सिनियर आहेत.मी आपला 'नया है वह' !   


प्रकाश आंबेडकरांच्या भाषेत सांगायचे ते श्रीमंत (म्हणजे प्रस्थापित ) आणि मी गरीब (अर्थात विस्थापित) पत्रकार आहे.(हे खासगी संदर्भात घेऊ नका) ससो..स्वारी असो. तर अतुल कुलकर्णीला आपला म्हणण्यामागे आणखीही एक रिजन आहे.कारण याच नावाचं आणखी एक पात्र फिल्म लाईन मध्ये पण आहे,अर्थात हाही (म्हंजे आपला अतुल ) तसा,'पोत्या दादाच' ! आणि नटरंग सुद्धा.(वजन कुठं वाढवायचं,कुठं हलकं करायचं हे आपल्या अतुल कुलकर्णीला सुद्धा चांगलं कळतं.संदर्भ इथेच संपला.) ससो..असो. तर आपला 'हा' कायम मंत्रालय ते सचिवालय,आणि आजी-माजी  मंत्र्यांच्या बंगल्या भोवती घुटमळणारा,सनदी आधिकाऱ्यांच्यात वावरणारा,पोलीस आधिकाऱ्यात बसणारा (ओव्हर) स्मार्ट,'एव्हरी' ग्रीन,अप टू डेट,अपडेट.मॉडर्न दिगू टिपणीस ! ( निखिल वागळेंच्या योग्य वेळी जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 'फडणवीस कॅम्प' च्या 'ढवळ्या यादीत' या 'पवळ्या'चं ही नाव असल्याची 'सूत्रांची' माहिती आहे.) ससो..स्वारी असो !  


   तर झालं काय की आपला हा बॅलन्स अतुल काल-परवा  'मुंबई दिनांक' वरून 'सिंहासन'वर घसरला आणि स्वतःसह बाबूजींची सुद्धा 'बत्तीशी' फोडून बसला.काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.अख्ख्या महाराष्ट्राला कळलं.अतुल कुलकर्णी बातमी पेरण्यात पटाईत आहेत हे माहित होतं,पण ते बातमी उपटतात सुद्धा..हे परवा दिसलं.त्यांनी चक्क राज्यातील काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी आघाडी होऊ नये,रात्रीतून राष्ट्रपती राजवट उठवून पहाटे शपथविधी घेतलेले 'बगूला भगत' फडणवीस सरकार टिकावे,या साठी प्रयत्न केले,आमदारांना फितवण्याचा,धमकावण्याचा प्रयत्न केला,यात एक उदाहरणार्थ महिला अधिकारी पण होती.अखेर शरद पवारांनी सगळे निपटवले...इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे.अतुल कुलकर्णीनी बातमी उपटली.

(असतात एकेकाचे सोर्स).वरतून ती गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावावर खपवली.पण माकडाने चाळा म्हणून सुतारांनी अर्थवट कापलेल्या खोडातली पाचर उपटावी आणि त्यात शेपूट चेंगरून घ्यावे तसे झाले.ससो..स्वारी असो.अनिल देशमुखांनी मुलाखतीत आपण असे काही बोललोच नाही असे सांगत लोकमतमध्ये छापून आलेली बातमी धादांत खोटी असल्याचे म्हटले.


इतकेच नाही तर ते सगळे पत्रकार अतुल कुलकर्णी यांचे 'आत्मसंशोधन' असल्याचे देशमुख म्हणाले.खरे-खोटे काय ते पाहण्यासाठी आम्हीही ती मुलाखत पहिली.तो प्रश्न अतुल कुलकर्णीनीच विचारला होता,त्याला देशमुखांनी होकार-नकार-दुजोरा काहीच दिला नाही,तरी दुसऱ्या दिवशी ती ( धादांत खोटी ) बातमी लोकमतच्या पहिल्या पानावर बॅनरला झळकली.( श्रीमंत पेपर ! ) देशमुखांनी इन्कार केल्यावर त्याबद्दल काही खुलासाही केला नाही.आधी बिळात हात घातला आणि नंतर स्वतःच बिळात लपले !  ससो..सॉरी असो,मुख्य मुद्दा असा की अतुल कुलकर्णी सारख्या मराठी पत्रकारितेत अख्खी हयात घालवलेल्या आणि नाव,प्रतिष्ठा,सन्मान कमावलेल्या.नवोदितांनीच नाही तर समकालीन आणि जेष्ठांनी सुद्धा ज्यांच्या कडून पत्रकारितेचे धडे गिरवावेत इतकी चांगली पत्रकारिता करणाऱ्या माणसाने असा शेणावर पाय का द्यावा ?


ता.क.( फुंकून प्या ) : 

जातीसाठी माती किती खायची ? पत्रकार म्हणून काहीतरी ठेवली पाहिजे,आणि विश्वासार्हता तर जपायलाच पाहिजे ना...भाई ! 


-रवींद्र तहकिक

७८८८०३०४७२ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या